ओसाका, क्विटोव्हा यांचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/इंडियन वेल्स
एटीपी आणि डब्ल्युटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या इंडियन वेल्स पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महिलांच्या विभागात जपानची नाओमी ओसाका आणि झेकची पेत्रा क्विटोव्हा यांचे एकेरीतील आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले. पुरुषांच्या विभागात हॉलंडचा ग्रिकस्पूर तसेच जपानचा निशीकोरी यांनी विजयी सलामी दिली. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील झालेल्या सामन्यात कोलंबियाच्या कॅमिला ओसोरिओने जपानच्या नाओमी ओसाकाचा 6-4, 6-4 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत विजयी सलामी दिली. या स्पर्धेत जपानच्या ओसाकाने तब्बल 15 महिन्यानंतर पहिल्यांदाच टेनिसक्षेत्रात पुनरागमन केले होते. आता ओसोरिओचा दुसऱ्या फेरीतील सामना डेन्मार्कच्या टॉसनशी होणार आहे.
अन्य एका सामन्यात झेकच्या पेत्रा क्विटोव्हाला फ्रान्सच्या ग्रेचेव्हाने पराभवाचा धक्का दिला. ग्रेचेव्हाने क्विटोव्हाचा 4-6, 6-3, 6-4 असा पराभव करत दुसरीफेरी गाठली. फ्रान्सच्या कॅरोलिना गार्सियाने अमेरिकेच्या पेराचा 6-3, 6-4 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. गार्सियाचा दुसऱ्या फेरीतील सामना पोलंडच्या द्वितीय मानांकित आणि या स्पर्धेतील विद्यमान विजेती इगा स्वायटेकशी होणार आहे. पुरुषांच्या विभागात हॉलंडच्या ग्रीकस्पूरने सर्बियाच्या केमॅनोव्हिकचा 6-7 (5-7), 6-4, 6-3 असा पराभव करत दुसरीफेरी गाठली. आता ग्रीकस्पूर आणि जर्मनीचा टॉपसिडेड व्हेरेव्ह यांच्यात दुसऱ्या फेरीत गाठ पडेल. इटलीच्या टॉपसिडेड सिनेरवर उत्तेजक चाचणी प्रकरणी तीन महिन्यांची बंदी घातल्याने तो या स्पर्धेत खेळू शकला नाही.