ओसाका, गॉफ, स्वायटेक, सिनर तिसऱ्या फेरीत
अमेरिकन ओपन टेनिस : टॉमी पॉल, व्हेरेव्ह, मुसेटी यांचेही विजय, पॉपीरिन, बोर्जेस, व्हेकिक पराभूत
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
जपानची नाओमी ओसाका, अमेरिकेची कोको गॉफ, पोलंडची इगा स्वायटेक, इटलीचा जेनिक सिनर, अमेरिकेचा टॉमी पॉल, जर्मनीचा अलेक्झांडर व्हेरेव्ह, इटलीचा लॉरेन्झो मुसेटी यांनी अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला. महिला दुहेरीत व्हीनस विल्यम्सने पहिला विजय मिळवित दुसरी फेरी गाठली.
कोको गॉफने डोना व्हेकिकचा 7-6 (7-5), 6-2 असा पराभव करीत तिसरी फेरी गाठली. 2021 नंतर या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत पहिल्यांदाच स्थान मिळविताना 23 व्या मानांकित ओसाकानेही आगेकूच करताना अमेरिकेच्या हेली बाप्टिस्टचा 6-3, 6-1 असा पराभव केला. ओसाकाने आतापर्यंत चार ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली असून चारही हार्ड कोर्टवर मिळविलेली आहेत. त्यातील दोन यूएस ओपनमध्ये आणि दोन ऑस्ट्रेलियन ओपनमधील आहेत. 2020 मध्ये तिने येथे जेतेपद मिळविल्यानंतर 2021 मध्ये ती तिसऱ्या फेरीत, 2022 मध्ये पहिल्या तर 2024 मध्ये दुसऱ्या फेरीत पराभूत झाली होती. महिला एकेरीच्या अन्य सामन्यात विम्बल्डन चॅम्पियन स्वायटेकने हॉलंडच्या सुझान लामेन्सचा 6-1, 4-6, 6-4 असा पराभव केला.
महिला दुहेरीत 45 वर्षीय व्हीनस विल्यम्सने 2014 नंतर पहिला विजय मिळविताना लैला फर्नांडेझसमवेत खेळताना सहाव्या मानांकित ल्युडमिला किचेनॉक व एलेन पेरेझवर 7-6 (7-4), 6-3 अशी मात केली. यापूर्वी व्हीनसने बहीण सेरेना विल्यम्ससमवेत भाग घेतली होती.
पुरुष एकेरीत जागतिक अग्रमानांकित व विद्यमान विजेत्या जेनिक सिनरने अॅलेक्सी पॉपीरिनचा 6-3, 6-2, 6-2 असा पराभव करून तिसरी फेरी गाठली. सिनरने 2024 व 2025 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आणि 2024 मध्ये यूएस ओपनमध्ये जेतेपद मिळवित त्याने हार्ड कोर्टवर सलग 23 सामने जिंकले आहेत. जर्मनीच्या तिसऱ्या मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्हने जेकब फीयर्नलीवर 6-4, 6-4, 6-4 अशी मात केली. 14 वा मानांकित अमेरिकेचा टॉमी पॉल व पोर्तुगालचा बिगरमानांकित नुनो बोर्जेस यांची लढत तब्बल साडेचार तास रंगली होती. या रंगतदार ठरलेल्या लढतीत पॉलने 7-6 (8-6), 6-3, 5-7, 5-7, 7-5 असा विजय मिळविला. रात्री उशिरा सुरू होऊन उत्तररात्री 2 वाजता संपली. या स्पर्धेच्या इतिहासातील उशिरा संपलेली ही दुसऱ्या क्रमांकाची लढत होती.