ओसाका, अॅनिसिमोव्हा, सिनर उपांत्य फेरीत
अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम : कॅरोलिना मुचोव्हा, इगा स्वायटेक, मुसेटी स्पर्धेबाहेर, दुहेरीत युकी भांब्रीचे सर्वोत्तम प्रदर्शन
वृत्तसंस्था/न्यूयॉर्क
जपानची नाओमी ओसाका, अमांदा अॅनिसिमोव्हा, जेनिक सिनर यांनी अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत एकेरीची उपांत्य फेरी गाठली तर कॅरोलिना मुचोव्हा, दुसरी मानांकित पोलंडची इगा स्वायटेक यांना पराभवाचा धक्का बसला. पुरुष दुहेरीत भारताच्या युकी भांब्रीने प्रथमच ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवित आजवरची सर्वोत्तम कामगिरी केली. 23 व्या मानांकित ओसाकाने 11 व्या मानांकित कॅरोलिना मुचोव्हाचा 6-4, 7-6 (7-3) असा पराभव केला. 2021 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकल्यानंतर ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळण्याची ओसाकाची ही पहिलीच वेळ आहे. माजी अग्रमानांकित असलेल्या ओसाकाने आधीच्या फेरीत तिसऱ्या मानांकित कोको गॉफला पराभवाचा धक्का दिला होता. मुचोव्हाने सेटच्या मधल्या वेळेत टाईमआऊट घेत वेदना देणाऱ्या डाव्या पायावर पट्ट्या लावून घेतल्या होत्या. आधीच्या फेरीतही तिने असा प्रकार केला होता. गेल्या वर्षीच्या यूएस ओपनमध्ये मुचोव्हाने ओसाकाला उपांत्यपूर्व फेरीत हरविले होते तर यावर्षी जानेवारीत झालेल्या ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये ओसाकाने तिच्यावर विजय मिळवित 2-2 अशी बरोबरी केली होती.
स्वायटेकला धक्का
दुसऱ्या एका उपांत्यपूर्व सामन्यात आठव्या मानांकित अमांदा अॅनिसिमोव्हाने द्वितीय मानांकित व 2022 च्या विजेत्या इगा स्वायटेकचे आव्हान 6-4, 6-3 असे संपुष्टात आणत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. दोनच महिन्यापूर्वी स्वायटेकने विम्बल्डन स्पर्धेच्या अॅनिसिमोव्हाला एकतर्फी हरवून जेतेपद मिळविले होते. त्याची परतफेड अॅनिसिमोव्हाने येथे केली. ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठण्याची तिची ही तिसरी वेळ असून येथे तिने पहिल्यांदाच हा टप्पा गाठला आहे. अॅनिसिमोव्हाची उपांत्य लढत चार ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या जपानच्या ओसाकाशी होईल.
सिनरची मुसेटीवर मात
विद्यमान विजेत्या इटलीच्या जेनिक सिनरने जेतेपद स्वत:कडेच राखण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले असून त्याने आपल्याच देशाच्या दहाव्या मानांकित लॉरेन्झो मुसेटीचा 6-1, 6-4, 6-2 असा सहज पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. या अग्रमानांकित खेळाडूची उपांत्य लढत शुक्रवारी 25 व्या मानांकित फेलिक्स ऑगर अॅलियासिमेशी होईल. अॅलियासिमेने आठव्या मानांकित अॅलेक्स डी मिनॉरला चार सेट्सच्या चुरशीच्या लढतीत 4-6, 7-6 (9-7), 7-5, 7-6 (7-4) असे हरविले. सिनरने सलग पाचव्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धांच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले आहे. त्याने अंतिम फेरी गाठल्यास यावर्षीच्या चारही ग्रँडस्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठण्याचा तो बहुमान मिळवेल. मुसेटी या स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठण्याच्या प्रयत्नात होता. यापूर्वी त्याने फ्रेंच ओपन आणि 2024 मध्ये विम्बल्डनमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.
युकी भांब्रीचे सर्वोत्तम प्रदर्शन मायकेल व्हीनससमवेत दुहेरीच्या उपांत्य फेरीत
युकी भांब्रीने आजवरची सर्वोत्तम कामगिरी करताना न्यूझीलंडच्या मायकेल व्हीनससमवेत उपांत्य फेरी गाठली आहे. या इंडो-किवी जोडीने 11 व्या मानांकित निकोला मेक्टिक व राजीव राम यांना 6-3, 6-7 (8-10), 6-3 असा पराभवाचा धक्का दिला. आधीच्या फेरीतही या जोडीने चौथ्या मानांकित केविन क्रॅवीट्झ व टिम पुएट्झ यांचे आव्हानही संपुष्टात आणले होते. पुढील फेरीत त्यांचा मुकाबला ब्रिटनच्या सहाव्या मानांकित ज्यो सॅलिसबरी व नील स्कुपस्की यांच्याशी होणार आहे. 33 वर्षीय भांब्रीचे हे सर्वोच्च प्रदर्शन असून कनिष्ठ विभागातील तो माजी अग्रमानांकित व 2009 मधील ऑस्ट्रेलियन ओपनचा कनिष्ठ विभागाचा चॅम्पियनही आहे. या निकालाने भांब्रीने दुहेरीतील भारतीय खेळाडूंचा वारसा पुढे चालविला आहे. लियांडर पेस, महेश भूपती, रोहन बोपण्णा यांनी याआधी चमकदार केलेली आहे.