रास्त धान्य दुकानदारांकडून नविन रेशनकार्डाच्या नावाखाली लूट!
पुलाची शिरोली / वार्ताहर
बंद केलेले रेशनकार्ड पुन्हा सुरू करण्यासाठी गावातील कांही दुकानदारांनी प्रत्येकी एक हजार रुपये प्रमाणे वसुल करण्याची मोहीम उघडली आहे. यासाठी तालुक्यातील एका अधिकाऱ्याचा वरदहस्थ असल्याच्या चर्चा ग्रामस्थांमध्ये आहेत.
महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न ४४ हजार रुपये व शहरी भागातील कुटुंब प्रमुखाचे उत्पन्न ५४ हजार पेक्षा जास्त आहे अशी सर्व रेशनकार्ड धारकांना स्वस्त धान्यांचा पुरवठा बंद केला आहे. या नियमानुसार पुलाची शिरोलीत सुमारे दोन हजार रेशनकार्ड धारक कुटुंबे अन्नधान्य लाभापासून बंद (वंचित ) आहेत. हि सरासरी आकडेवारी ग्रामीण भागातील २५ टक्के व शहरी भागातील ४५ टक्के इतकी आहे. हि बंद रेशनकार्ड सुरू करून देण्यासाठी माळवाडी कोरगावकर काँलनी व छत्रपती शिवाजी नगर येथील स्वस्त धान्य दुकानदारांनी पैसे गोळा करण्याचे दुकानच उघडले आहे. हे दूकानदार लाभार्थी असलेल्या लोकांना धान्य देताना चालढकल करीत आहेत. पण बंद पडलेल्या कार्ड धारकांना भेटून पैसे गोळा करण्यात अधिक व्यस्त आहेत.याची वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घ्यावी. व ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना न्याय द्यावा.व संबंधित रेशन दुकानदारावर कारवाई करावी. अशी मागणी ग्रामस्थांच्यातून होवू लागली आहे.
योजनेत मोफत नांवे समाविष्ट केली जातील !
ग्रामसभेचा ठराव व उत्पन्नाचा दाखला ह्या निकषाच्या आधारे प्राधान्य योजनेत नांवे मोफत समाविष्ट केली जातात . यासाठी स्वस्त धान्य दुकानदार , एजंट अथवा मध्यस्थ यांनी पैशाची मागणी केल्यास देवु नयेत. तसेच त्यांच्या विरुद्ध तात्काळ तक्रार दाखल करावी. संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल.
चंद्रकांत काळगे पुरवठा अधिकारी