3000 मृतांसाठी ‘मूव्ही नाइट’ आयोजित
दफनभूमीत लावली स्क्रीन
थायलंडमध्ये अत्यंत अजब गोष्ट दिसून आली आहे. येथील दफनभूमीत फिल्म स्क्रीनिंग करण्यात आले आणि ते देखील 3 हजार मृतांसाठी. देशाच्या नाखोन रत्चासिमा प्रांतात हा प्रकार घडला आहे. येथील दफनभूमीत चित्रपट पाहण्याच्या अनुभवाला नव्या पातळीवर नेण्यात आले आहे. ईशान्य थायलंडमधील ही दफनभूमी चिनी लोकांच्या सुमारे 3 हजार वंशजांचे विश्रामस्थळ मानले जाते.
अधिकाऱ्यांनी येथे रांगेत खुर्च्या लावल्या आणि अनेक वर्षांपूर्वी या जगाचा निरोप घेतलेल्या लोकांच्या स्मरणार्थ चित्रपटांचे प्रदर्शन केले. दफनभूमीत बहुतांश करून चिनी लोकांच्या वंशजांची थडगी आहेत, जे थायलंडमध्ये राहण्यासाठी आले होते. चित्रपटाचे स्क्रीनिंग 2-6 जून या कालावधीत करण्यात आले होते. ओपन-एअर फिल्म शोदरम्यान केवळ 4 कर्मचारी उपस्थित होते आणि चित्रपट दररोज संध्याकाळी 7 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत दाखविण्यात आले.
कर्मचाऱ्यांनी यावेळी आकर्षक भोजनाचीही व्यवस्था केली होती. तेथे मृतांच्या सन्मानाप्रित्यर्थ कागद देण्यात आले. खाण्यासोबत घरांचे मॉडेल, वाहन आणि कपडे तसेच दैनंदिन गरजेची सामग्री ठेवण्यात आली होती. आत्म्यांना शांती मिळावी आणि त्यांना आधुनिक मनोरंजन प्रदान करण्यासाठी सवांग मेट्टा थम्मासाथन फौंडेशनकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
केवळ जिवंत लोकांनाच चित्रपटांचा आनंद का मिळावा असे फौंडेशनने म्हटले आहे. दफनभूमीत चित्रपट दाखविण्याच्या विचाराबद्दल प्रारंभी भीती वाटली होती. परंतु प्रोजेक्टवर काम पुढे सरकल्यावर भीती दूर जाऊ लागली. हा अनुभव अत्यंत वेगळा आणि सकारात्मक होता असे कार्यक्रमाच्या आयोजकांनी म्हटले आहे.