तालुक्यातील समस्या निवारणासाठी जनस्पंदन कार्यक्रमाचे आयोजन करा
शिवस्वराज्य संघटनेची तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
खानापूर : खानापूर तालुक्यातील सार्वजनिक समस्या निवारण करण्यासाठी आमदारांच्या अध्यक्षतेखाली जनस्पंदन कार्यक्रम घेण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन शिवस्वराज जनकल्याण संघटनेतर्फे तहसीलदाराना दिले. निवेदनाचा स्वीकार शिरस्तेदार मॅगेरी यांनी करून आपण याबाबत वरिष्ठांना माहिती देवू, असे आश्वासन दिले. यावेळी शिव स्वराज्य संघटनेचे उपाध्यक्ष रमेश धबाले, खजिनदार मुकुंदराव पाटील, अॅड अभिजीत सरदेसाई, सुनील पाटील, संदेश कोडचवाडकर, मिलिंद देसाई, भाऊ पाटील, हनुमंत पाटील, ऋतिक पाटील, बाळू सावंत, यल्लाप्पा कदम आधी उपस्थित होते.
यावेळी रमेश धबाले म्हणाले, तालुक्यात सर्वसामान्यांना आपल्या शासकीय कार्यालयातील कामासाठी अनेक समस्यांना तेंड द्यावे लागत आहे. तालुक्यात सर्वच विभागात समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. शेतकरी, सर्वसामान्य जनता या समस्यांत भरडली जात आहे. तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. बस व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. संध्या सुरक्षा योजना, विधवा पेन्शन योजना, उताऱ्यामधील त्रुटी, सरकारी कार्यालयात रखडलेली कामे, शासकीय इस्पितळात अपुरी असलेली सुविधा, हेस्कॉमकडून वारंवार खंडित होणारी वीज, ग्रा. पं. मधून ग्रामीण भागातील नागरिकांची होत असलेली पिळवणूक यामुळे तालुक्यातील जनता मेटाकुटीला आली आहे. समस्या निवारण करण्यासाठी आणि सामान्य माणसाला तातडीने न्याय देण्यासाठी जनस्पंदन कार्यक्रमाचे तातडीने आयोजन करावे, अशी मागणी यावेळी संघटनेतर्फे केली.