महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भारतात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन

06:59 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ढाका

Advertisement

बांगला देशमधील घटनांचा विचार करण्यासाठी भारतात परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन मंगळवारी सकाळी केले होते. या बैठकीला जवळपास सर्व पक्षांचे प्रमुख नेते उपस्थिती होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीही या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत जयशंकर यांनी बांगला देशातील गेल्या दोन दिवसांमधील घटनाक्रम स्पष्ट केला. शेख हसीना भारतात आल्याची अधिकृत माहिती दिली. भारताच्या सीमा सुरक्षित असल्याचे आणि बांगला देशातील घटनांचा भारताच्या सुरक्षेवर परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट केले. या परिस्थितीत भारत स्वत:च्या हितरक्षणासाठी जी पावले उचलणार आहे, त्याला सर्व पक्षीयांनी पाठिंबा आणि समर्थन घोषित केले असून या आव्हानात्मक परिस्थितीत देश एकजूट असल्याचा संदेश सर्वांपर्यंत पोहचविण्याची आवश्यकता  सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली, अशी माहिती जयशंकर यांनी बैठकीनंतर दिली.

Advertisement

राहुल गांधी यांचे मत

जयशंकर यांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्यांची मते व्यक्त केली. बांगला देशातील सध्याच्या परिस्थितीत भारताच्या परराष्ट्र धोरणाची दिशा कोणती राहणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारच्या या संबंधातील धोरणांना आणि पुढच्या पावलांना आमचे समर्थन असेल. शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत. विरोधी पक्ष सरकारच्या पाठीशी राहतील. बांगला देशातील अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत ही स्थिती चिंताजनक आहे, असेही प्रतिपादन राहुल गांधी यांनी व्यक्त केल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

शेख हसीना अद्यापही भारतातच

बांगला देशात बंड झाल्यानंतर पलायन केलेल्या त्या देशाच्या प्रमुख नेत्या शेख हसीना यांनी प्रथम त्रिपुराची राजधान आगरतळा येथे आगमन केले. त्या बांगला देश लष्कराच्या सी-130 विमानाने भारतात आल्या. नंतर त्या उत्तर प्रदेशातील हिंडन विमानतळावर उतरल्या. अद्यापही त्या हिंडन विमानळावर भारतीय वायुदलाच्या सुरक्षित निवासस्थानात आहेत. त्यांच्यासमवेत त्यांची बहीणही आहे. त्यांना भारतात सुरक्षा देण्यात आली आहे. त्या मंगळवारी सौदी अरेबियाच्या माध्यमातून लंडन येथे जातील असे वृत्त होते. तथापि, त्यांना अद्याप ब्रिटनने राजाश्रय दिलेला नाही. तसेच ब्रिटनमध्ये येण्याची अनुमतीही दिलेली नाही. त्यामुळे ती मिळेपर्यंत तरी त्या भारतातच राहतील अशी माहिती आहे. ब्रिटनने त्यांना अनुमती नाकारल्यास त्या आश्रयासाठी अन्य सुरक्षित देशाचा विचार करु शकतात.  तथापि, या प्रक्रियेला वेळ लागू शकतो. तोपर्यंत भारत हेच त्यांच्यासाठी सुरक्षित स्थान आहे. बांगला देशातून पलायन करण्यापूर्वी त्यांनी भारत सरकारला याची कल्पना दिली होती. भारतानेही त्यांना येथे येण्यास अनुमती दिली होती.

हे चीन-पाकिस्तानचे संयुक्त कारस्थान

बांगला देशमधील सत्तापालट हे चीन आणि पाकिस्तानचे संयुक्त कारस्थान आहे, असे प्रतिपादन भारताच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी केले आहे. बांगला देशमध्ये भारताच्या विरोधातील सरकार स्थापन करणे हे या दोन्ही देशांचे ध्येय होते. पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय आणि चीन यांनी बांगला देशमधील आंदोलनाला पाठबळ दिले. बांगला देशात अनेक पाकिस्तानवादी शक्ती कार्यरत असून त्यांचाच प्रामुख्याने सहभाग या आंदोलनात होता. जमाते इस्लामी या धर्मांध संघटनेची छात्र शिबिर ही विद्यार्थी संघटना या आंदोलनात अग्रभागी होती. भारताशी मैत्री असलेले अवामी लीगचे सरकार या पाकिस्तानवादी आणि धर्मांध शक्तींना नकेसे होते. ते उलथविण्याचा प्रयत्न अनेकदा करण्यात आला होता. यावेळी मात्र तो यशस्वी होताना दिसून आला, असे गुप्तचरांचे म्हणणे आहे

अनेक महिन्यांचे सुनियोजित प्रयत्न

जमाते-इस्लामीच्या माध्यमातून पाकिस्तानच्या आयएसआयने बांगला देशात आपले पाय रोवले आहेत. अनेक दशकांपासून बांगला देश आपल्या कह्यात ठेवण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे. शेख हसीना हा त्यांच्या मार्गातील काटा होत्या. त्यामुळे गेल्या कित्येक महिन्यांपासून त्यांना उखडण्यासाठी जमाते इस्लामी ही संघटना कार्यरत होती. विद्यार्थ्यांना हाताशी धरुन देशभर हिंसाचाराला आगडोंब माजविण्याची ही योजना होती. या कारस्थानात बांगला देशच्या लष्कराच्या काही अधिकाऱ्यांनाही हाताशी धरण्यात आले होते. अशा प्रकारे वातावरण निर्मिती केल्यानंतर शेख हसीना यांची सत्ता उलथविण्यासाठी शेवटचा घाव गेल्या दोन महिन्यांमध्ये घालण्यात आला. अखेरीस हसीना यांना पलायन करावे लागले. यापुढच्या काळात भारताला सावध रहावे लागेल, असे गुप्तचरांनी स्पष्ट केले.

बंडाला चीनचे आर्थिक पाठबळ ?

पाकिस्तानच्या माध्यमातून चीन बांगला देशात आपल्याला अनुकूल सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून करीत आहे. शेख हसीना यांनी भारत आणि चीन यांच्याशी असलेल्या संबंधांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, चीनला या देशात भारतविरोधी आणि चीनला अनुकूल असणारे सरकार हवे आहे. त्यामुळे बांगला देशातील बंडाला आर्थिक पाठबळ पुरविण्याचे काम चीनने केले असावे, असाही भारतातील गुप्तचरांचा कयास आहे. गेल्या काही महिन्यांपासून चीनच्या सरकारच्या हातातील प्रसारमाध्यमे शेख हसीना यांच्या विरोधात प्रचार करण्यात आघाडीवर दिसत होती. त्याचवेळीचे हे स्पष्ट झाले होते.

राजकीय संघर्षात हिंदूंचा बळी 

शेख हसीना आणि त्यांची अवामी लीग तसेच त्यांचे विरोधात आणि बांगला देशमधील धर्मांध शक्ती यांच्यातील सत्तासंघर्षात बांगला देशमधील हिंदूंचे मरण ओढवले आहे. सोमवारी रात्रीपासून इस्लामी धर्मांधांनी तेथील हिंदूंना लक्ष्य करण्यास प्रारंभ केला आहे. राजधानी ढाक्यासह 27 शहरांमध्ये हिंदूंची शेकडो घरे पेटवून देण्यात आली आहेत. तसेच अनेक हिंदू मंदिरेही जाळली गेली आहेत. मूर्तींची विटंबना करण्यात येत आहे. इस्कॉन या आंतरराष्ट्रीय हिंदू संस्थेचे अनेक आश्रम आणि मंदीरे बांगला देशात आहेत. त्यांची नासधूस करण्यात आली असून अनेक हिंदूंना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत. शेख हसीना यांनी देश सोडल्यापासून या देशातील हिंदू उघड्यावर पडले असून त्यांचे संरक्षण करणारी कोणतीही यंत्रणा तेथे नाही. त्यामुळे त्यांच्यावर अक्षरश: जीव मुठीत धरुन जगण्याची वेळ आली आहे, अशी माहिती तेथील प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. मंगळवारी संध्याकाळपर्यंत 50 हून अधिक मंदिरे जाळण्यात आल्याचे वृत्त आहे. हजारो हिंदू बेघर झाले असून त्यांना आसरा देण्यासाठी कोणीही तयार नाही. अशा परिस्थितीत या हिंदूच्या भवितव्य अंध:कारमय झाले असल्याचे दिसून येते. अंतरिम पर्यायी सरकार लवकर स्थापन झाले तरी हिंदूंना लक्ष्य करण्याची प्रक्रिया थांबणार नाही. राजकीय हिंसाचारात हिंदूंचा नाहक बळी जात असल्याचे स्पष्ट दिसते.

 

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article