For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी अध्यादेश

01:11 PM May 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव धारवाड रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी अध्यादेश
Advertisement

बेळगाव-कित्तूर तालुक्यातील गावांचा समावेश : नव्या रेल्वेमार्गामुळे प्रवासाचा कालावधी कमी होणार

Advertisement

बेळगाव : बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर रेल्वेमार्गासाठी सरकारने भूसंपादनाचा अध्यादेश बजावला आहे. कित्तूर व बेळगाव तालुक्यातील काही गावांचा या अध्यादेशामध्ये समावेश करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात बेळगाव तालुक्यातील 3, तर कित्तूर तालुक्यातील 12 गावांमध्ये रेल्वेमार्गासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे. प्रवासाचा कालावधी कमी व्हावा व इंधनाची बचत व्हावी या उद्देशाने बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर असा नवा रेल्वेमार्ग केला जाणार आहे. यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात निधीची तरतूदही करण्यात आली. धारवाड जिल्ह्यातील भूसंपादनाची प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण करण्यात आली आहे. परंतु बेळगाव जिल्ह्यातील भूसंपादनाचे काम संथगतीने सुरू होते. काही शेतकरी न्यायालयात गेल्याने भूसंपादनाला ब्रेक लागला होता.

एकूण 73 कि. मी. लांबीचा हा रेल्वे मार्ग असून करवीनकोप्प, बागेवाडी, एम. के. हुबळी, हुलीकट्टी, कित्तूर, तेगूर, ममीगट्टी, कऱ्याकोप्प अशी नवीन रेल्वे स्थानके तयार करण्याचा प्रस्ताव आहे. या रेल्वे मार्गासाठी बेळगाव जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 407 एकर, 28 गुंठे जमीन संपादित केली जाणार आहे. त्यापैकी एक एकर 12 गुंठे जमीन पडीक आहे. तर उर्वरित 406 एकर 16 गुंठे जमीन ही पिकाऊ आहे. पहिल्या टप्प्यात कित्तूर व बेळगाव तालुक्यातील काही गावांमध्ये भूसंपादन करण्यात येणार आहे. यासाठी केआयडीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भूसंपादनासाठीचा अध्यादेश बजावला आहे. आठ दिवसांपूर्वीच बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी व रेल्वे प्रशासनाची आढावा बैठक झाली होती. या बैठकीत भूसंपादनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. त्यावेळी त्यांनी रेल्वे मार्गासाठी लवकरच भूसंपादन केले जाईल, असे सांगितले. दोन टप्प्यात भूसंपादन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती.

Advertisement

भूसंपादनामध्ये या गावांचा समावेश

पहिल्या टप्प्यामध्ये कित्तूर तालुक्यातील गावांचा अधिक प्रमाणात समावेश करण्यात आला आहे. बेळगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी विरोध दर्शविल्यामुळे भूसंपादन दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे. बेळगाव तालुक्यातील बागेवाडी, मुत्नाळ, हुलीकट्टी व कित्तूर तालुक्यातील मरिगेरी, शिवनूर, निच्चनकी, कित्तूर, बसापूर, शिगीहळ्ळी के. ए., उगरखोड, होनीदिब्ब, हुलीकट्टी के. ए., हुंचीकट्टी, काद्रोळी व एम. के. हुबळी या गावांचा अध्यादेशात समावेश करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.