रासई येथील विजय मरिन्सला सील ठोकण्याचा आदेश
आणखी एकाचा बळी, अधिकाऱ्याला अटक
प्रतिनिधी / राय
रासई -लोटली येथील विजय मरिन शिपयार्डमध्ये शुक्रवारी सायंकाळी झालेल्या भीषण स्फोटात जखमी झालेल्यांपैकी आणखी एकटा दगावला. त्यामुळे या दुर्घटनेत आतापर्यंत तिघांचे बळी गेलेले आहेत. या एकंदर प्रकरणाला जबाबदार धरुन उपजिल्हाधिकाऱ्यांनी शिपयार्डला सील लावण्याचा तसेच अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. या शिपयार्डमध्ये झालेल्या दुर्घटनेचा संपूर्ण तपशील देण्याचा आदेशही प्रशासनाने दिलेला आहे. त्याचबरोबर या शिपयार्डमध्ये सुरक्षेसंबंधी पुरेशी यंत्रणा होती का, स्फोट होण्यामागील कारण काय तसेच उद्योगाना लागू असलेल्या नियमांचा भंग करण्यात आला आहे का यासंबंधी सविस्तर अहवाल सादर करण्याचा आदेशही उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे.
दरम्यान, मायणा -कुडतरी पोलिसांनी साइट सेफ्टी ऑफिसर राजू बोरो याला अटक केली आहे. लोटली येथील ‘विजय मरिन वर्कशॉप’मध्ये बांधकाम सुरू असलेल्या सागरी जहाजावर शुक्रवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमाराला अचानक भीषण आग लागून दोन कामगारांचा मृत्यू झाला होता व पाचजण गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर सध्या केळोशी येथे राहणारा मूळ आसाम राज्यातील साइट सेफ्टी ऑफिसर राजू बोरो याला मायणा-कुडतरी पोलिसांनी अटक केली आहे.
बाहेर पडण्यासही वेळ मिळाला नाही
शुक्रवारी संध्याकाळी सुमारे 5.15 ते 5.30 या दरम्यान ही दुर्घटना घडली. विजय मरिन शिपयार्डच्या वर्कशॉपच्या अंतर्गत सध्या बांधकाम सुरू असलेल्या सागरी जहाजावर अनेक मजूर काम करत होते. याचवेळी अचानक जहाजाच्या एका भागात आग भडकली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले त्यावेळी कामगारांना बाहेर पडण्यासही वेळ मिळाला नाही.
या दुर्घटनेत कामगार मोहम्मद बाबुल, अभिषेक सिंह, मनीष चौहान, संतोष कुमार तसेच तीन अज्ञात व्यक्ती गंभीररित्या भाजले. त्यापैकी सेर अली व विनोद दीवान यांनी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचारादरम्यान प्राण सोडले तर संतोष कुमार याचा बांबोळी येथील सरकारी इस्पितळात उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला.
प्राथमिक चौकशीत असे उघड झाले की, सेफ्टी ऑफिसर राजू बोरो यांनी कामगारांना आवश्यक अशी सुरक्षा उपकरणे पुरवली नव्हती तसेच त्या ठिकाणी अग्निसुरक्षेसंबंधी पुरेशी उपाययोजनाही केली नव्हती. यामुळे कामगारांच्या जीवाला धोका निर्माण झाला आणि आग फैलावल्याने गंभीर परिणाम झाले.
घटनेनंतर पोलिसांनी राजू बोरो याला अटक केली असून त्याच्याविऊद्ध मायणा-कुडतरी पोलिस स्थानकात (गुन्हा क्रमांक 83/2025) गुन्हा नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता- 2023 च्या 281, 115, 118, 106(1) कलमाखाली गुन्हा नोंदविला गेला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक सागर कामत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
उपाययोजना कागदोपत्रीच
या घटनेनंतर वरील शिपयार्डच्या कामगारवर्गात संताप पसरला आहे. ‘सुरक्षेच्या नावाखाली केवळ कागदोपत्री उपाययोजना दाखवल्या जातात, प्रत्यक्षात साइटवर साधे अग्निशामक उपकरणही नसते’ अशी कामगारांची प्रतिक्रिया मिळाली. प्रशासनाने सर्व औद्योगिक व बांधकाम प्रकल्पांची सुरक्षा तपासणी तातडीने करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.