For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खोर्लीचे सरपंच, उपसरपंच अपात्र आदेश रद्दबातल

07:00 AM Oct 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
खोर्लीचे सरपंच  उपसरपंच  अपात्र आदेश रद्दबातल
Advertisement

नव्याने सुनावणी घेण्याचा म्हापसा न्यायालयाचा आदेश

Advertisement

खास प्रतिनिधी / पणजी

खोर्लीचे सरपंच गोरखनाथ केरकर आणि त्यांच्या पत्नी तथा उपसरपंच सुप्रिया केरकर यांना पंचसदस्य म्हणून अपात्र ठरविण्याचा तिसवाडीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) अनिल धुमस्कर यांनी दिलेला आदेश म्हापसा न्यायालयाने रद्दबातल ठरवताना, या प्रकरणी नव्याने सुनावणी घेण्याचा आदेश दिला आहे.

Advertisement

सरपंच गोरखनाथ  केरकर आणि  उपसरपंच सुप्रिया केरकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून स्वत:च्या फायद्यासाठी ठराव मंजूर केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. स्वत:च्या मालकीच्या बांधकामांना पंचायतीकडून घर  क्रमांक आणि ना हरकत दाखला देण्याच्या प्रक्रियेत दोघांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपाप्रकरणी पुरसो धुळपकर आणि होनू धुळपकर यांनी बीडीओकडे दोघांच्या अपात्रतेची याचिका दाखल केली होती.  याचिकेवरील सुनावणीनंतर, तिसवाडीचे गटविकास अधिकारी धुमस्कर यांनी गोवा पंचायत राज कायदा-1994च्या कलम-12(1) (डी) आणि कलम- 55 (4) अंतर्गत सरपंच आणि उपसरपंच असलेल्या या दोघांना 6 ऑक्टोबर 2025 रोजी अपात्र ठरविले होते.

अंतरिम स्थगिती देण्यास नकार

या प्रकरणी बीडीओच्या आदेशाला म्हापसा सत्र न्यायालयात दाखल केलेल्या आव्हान याचिकेवर शनिवारी सुनावणी झाली. त्यावेळी  बीडीओने दोन्ही पक्षांना पुरावे सादर करण्याची आणि सुनावणी घेण्याची पुरेशी संधी देऊन त्यानंतर कायद्यानुसार प्रकरणाचा निर्णय द्यावा, असा आदेश न्यायालयाने दिला. या न्यायालयाने खटल्याच्या गुणवत्तेवर कोणतेही मत व्यक्त केलेले नाही आणि सर्व मुद्दे नव्याने निर्णय घेण्यासाठी खुले ठेवण्यात आले असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. तसेच बीडीओच्या वादग्रस्त निकालाला स्थगिती देण्यासाठी कोणतेही कारण नाही, म्हणून याचिकादारांचा अर्ज फेटाळण्यात येत असल्याचेही म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.