लेखा संचालकपदी तेरेझा फर्नांडिस यांना नियुक्त करण्याचा आदेश
खास प्रतिनिधी/ पणजी
मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या न्या. भारती डांगरे आणि न्या. निवेदिता मेहता यांनी तेरेझा फर्नांडिस यांना चार आठवड्यात लेखा संचालकपदी नियुक्त करण्याचा आदेश दिला आहे.
तेरेझा फर्नांडिस आणि राजेश महाले यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत लेखा खात्याच्या ज्येष्ठता यादीत दोघांचा क्रमांक असताना सहाव्या क्रमांकावर असलेल्या दिलीप हुमरस्कर याना संचालकपदी बढती देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता.
हुमरस्कर हे 31 ऑगस्ट 2024 मध्ये निवृत्त होणार असताना, त्यांना एका वर्षाची मुदतवाढ देऊन नियमभंग केल्याचा आरोप याचिकादारांनी केला होता. ज्या अधिकाऱ्याला संयुक्त संचालक आणि उप-लेखा संचालकपदी किमान तीन वर्षांचा अनुभव असेल त्या अधिकाऱ्यालाच लेखा संचालकपदी नेमण्याचा नियम असूनही या दोन्ही याचिकादारांना डावलले जाऊन अन्याय झाला असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. त्यात महाले हे 31 मे 2025 रोजी सेवानिवृत्त झाले असल्याने या पदावर तेरेझा फर्नांडिस या एकमेव लायक उमेदवार असल्याचा दावा करण्यात आला.
न्यायालयाने दोन्ही पक्षाच्या बाजू समजून घेतल्यावर अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांना सरकारची बाजू मांडण्यास सांगितली. त्यावर लोकसेवा आयोगाने फर्नांडिस यांना संचालकपदी नेमण्याची शिफारस केली असल्याचे सांगितले. तसेच राज्य सरकारने ही शिफारस मान्य करून फर्नांडिस यांना संचालकपदी नेमण्याची प्रक्रिया सुऊ केल्याचे त्यांनी नमूद केले. उच्च न्यायालयाने एजीचे म्हणण्याचे नोंद करून तेरेझा फर्नांडिस यांना चार आठवड्यात लेखा संचालकपदी नियुक्त करण्याचा आदेश दिला. याचिकादारांना न्याय मिळाला असल्याने त्यांनी आपली याचिका मागे घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली असता ती स्वीकारून सदर याचिका निकाली काढली आहे.