देशातील प्रश्नांवर विरोधकांचे मौन
सांगली :
देशातील धर्माच्या राजकारणाने भारताला धोक्याच्या स्तरापर्यंत पोहोचविले आहे. अशावेळी विरोधी पक्ष अर्धांगवायू झालेल्या अवस्थेत आहे. विरोधी पक्षाने स्वत:ला सावरत या हिटलरशाही सरकारचा जोरदार विरोध केला पाहिजे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार बैठकीत विरोधकांना सल्ला दिला.
अॅड. आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला विश्वगुरु समजतात. पण ते अमेरिकेतून परतल्यापासून शेअर बाजार पूर्णपणे ढासळला. ऊपया कधीच घसरला आहे तर डॉलर दिवसेंदिवस महागच होत आहे. देशातील जीएसटी संकलन घटले असून अर्थव्यवस्थेवर मोठे संकट आले आहे. या साऱ्या प्रश्नांवर विरोधी पक्षाने मौन पाळले आहे. कुंभमेळ्याचे मार्केंटींग करणे निषेधाचे असून तिथे झालेल्या दुर्घटनेत एक हजारहून अधिक लोक मेले. पण प्रशासनाने फक्त छोटा आकडा जाहीर केला. या मृतदेहांवर अंत्यविधी कसे केले? हे प्रशासनाने सांगावे. ते हिंदू संघटनांनीही विचारावे.छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोन्ही राजांनी प्रेरणादायक इतिहास निर्माण केला. पण आता मराठा समाजाने त्यातच अडकून न राहता नवा इतिहास निर्माण करावा.
अॅड. आंबेडकर पुढे म्हणाले, गेल्या विधानसभा निवडणुकीत 76 लाख मतदान झाल्याचे आयोगाने जाहीर केले आहे. हे संशयास्पद असून आम्ही त्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी 18 मार्च रोजी होईल. यावेळी आयोगाने न्यायालयात खरे सांगावे, यासाठी नागरिकांनी त्यावर नैतिक दबाव आणणे गरजेचे आहे.