तानाजी गल्ली रेल्वेगेट कायमस्वरुपी बंद करण्यास विरोध
गेटमनची नियुक्ती करून वाहतूक ‘जैसे थे’ ठेवण्याची मागणी
बेळगाव : तानाजी गल्ली येथील रेल्वेगेट कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय नैर्त्रुत्य रेल्वेने घेतला आहे. परंतु, हे रेल्वेगेट बंद झाल्यास कपिलेश्वर व जुना धारवाड रोड येथील उड्डाणपुलांवर प्रचंड गर्दी होणार आहे. तसेच परिसरातील नागरिकांना मोठी गैरसोय सहन करावी लागणार असल्याने रेल्वेगेट बंद न करता ते आहे त्या स्थितीत सुरू ठेवावे, ही मागणी जोर धरू लागली आहे. 10 मार्चपासून रेल्वेगेट कायमस्वरुपी बंद केले जाईल, अशी सूचना नैर्त्रुत्य रेल्वेने फलकाद्वारे नागरिकांना केली आहे. शहरात होणारी वाहतूक कोंडी पाहता रेल्वेकडून या ठिकाणी उड्डाणपूल उभारला जाणार होता. उड्डाणपुलासाठी प्राथमिक पाहणीही झाली.
परंतु, उड्डाणपूल झाल्यानंतर भांदूर गल्ली, ताशिलदार गल्ली येथील व्यापाऱ्यांची काय दशा झाली? याचा अनुभव गाठीशी असल्याने नागरिकांनी सुरुवातीपासूनच उड्डाणपुलाला विरोध केला. खासदार जगदीश शेट्टर यांना व्यापारी, नागरिक व रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. त्यावेळीही उड्डाणपूल नको, अशीच भूमिका तानाजी गल्ली, फुलबाग गल्ली, महाद्वार रोड येथील नागरिकांनी घेतली. त्यामुळे नैर्त्रुत्य रेल्वेने हा उड्डाणपूल रद्द केला. परंतु, त्याचवेळी स्पष्ट केले की, रेल्वेगेट कायमस्वरुपी बंद राहील. त्यावेळी नागरिकांना रेल्वेगेट बंद राहण्याचे गांभीर्य समजले नाही. परंतु, आता मात्र या निर्णयाला कडाडून विरोध होऊ लागला आहे. तानाजी गल्ली रेल्वेगेट कायमस्वरुपी बंद करण्याच्या निर्णयामुळे कपिलेश्वर व जुना धारवाड रोड येथील उड्डाणपुलांवर प्रचंड गर्दी होणार आहे.
भविष्यात वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता
समर्थनगर, माणिकबाग परिसरातील नागरिकांना शहरात येण्यासाठी तानाजी गल्ली रेल्वेगेट उपयुक्त ठरत होते. परंतु, हे गेट बंद झाल्यास वाहनचालकांना कपिलेश्वर अथवा जुना धारवाड रोड उड्डाणपुलाचा वापर करावा लागेल. त्या ठिकाणी उड्डाणपुलावर जाण्यासाठी अतिशय लहान साईडपट्ट्या असल्याने भविष्यात वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता आहे.
- प्रकाश राऊत
रेल्वेगेट बंद करण्याऐवजी सुरू ठेवणे योग्य ठरेल
कपिलेश्वर व धारवाड रोड उड्डाणपुलावर सध्याच इतकी वाहतूक कोंडी आहे की, येथून रिक्षा चालवणेही अवघड होते. त्यातच जर तानाजी गल्ली येथील रेल्वेगेट बंद झाले तर वाहतूक कोंडीत अधिक भर पडेल. तसेच त्यामुळे रेल्वेगेट बंद करण्याऐवजी ते आहे तसेच सुरू ठेवणे योग्य ठरेल.
- संजय चतुर, रिक्षाचालक
शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होणार
फुलबाग गल्ली, फोर्ट रोड येथे अनेक शाळा-महाविद्यालये आहेत. अनेक विद्यार्थी सायकल तसेच दुचाकीवरून ये-जा करतात. रेल्वेगेट बंद झाल्यास शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होईल. त्याचबरोबर वाहतूक कोंडीही वाढण्याची शक्यता असल्याने रेल्वे प्रशासनाने फेरविचार करावा व नागरिकांच्या हितासाठी रेल्वेगेट सुरू ठेवावे.
- विनायक हुलजी
दोन्ही उड्डाणपुलांवर भार पडणार
तानाजी गल्ली रेल्वेगेट परिसरातून मोठ्या प्रमाणात वाहतूक सध्या सुरू आहे. परंतु, ती बंद झाल्यास बाजूच्या दोन्ही उड्डाणपुलांवर भार पडेल. या दोन्ही उड्डाणपुलांचे सर्व्हिस रोड अतिशय अरुंद व काही ठिकाणी बंद आहेत. त्यामुळे सर्व्हिस रोडचा निपटारा करून मगच रेल्वेगेट बंद करावे.
- पवन शिरोडकर