शिवाजी रोडवरील नाल्याची भिंत फोडण्यास विरोध
मनपा अधिकाऱ्यांनी घेतला काढता पाय : सफाईचे काम रेंगाळले, भिंत न फोडता स्वच्छता करण्याची स्थानिकांची मागणी
बेळगाव : पावसामुळे लेंडी नाल्याला शहरातून मोठ्या प्रमाणात पाणी जमा होते. हा नाला दरवर्षीच कचऱ्याने तुडुंब भरला जातो. काही महिन्यांपूर्वी शिवाजी रोड येथे मोठ्या प्रमाणात कचरा साचून होता. तो काढून टाकण्यात आला. मात्र, पुन्हा याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून तो कचरा काढण्यासाठी संरक्षण भिंतच फोडण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केला. मात्र, त्याला स्थानिक लोकांनी तीव्र विरोध केला आहे. यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला आहे.
शहरामध्ये प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. परिणामी पावसाने वाहून या बाटल्या मोठ्या गटारींमध्ये साचून रहात आहेत. शिवाजी रोडवरील या लेंडी नाल्यामध्ये वारंवार मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा साचून रहात आहे. सर्वात जास्त प्लास्टिक बाटल्यांनी हा नाला तुडुंब भरला आहे. तो साफ करण्यासाठी सोमवारी महानगरपालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले. जेसीबीने कचरा काढणे अशक्य असल्यामुळे संरक्षण भिंत पाडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्याला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला.
भिंत न फोडता सफाईची मागणी
महानगरपालिकेचे जेसीबी नादुरुस्त असल्याने भाड्याने जेसीबी घेण्यात आला. मात्र हा जेसीबी लहान असल्याने त्या ठिकाणी पोहोचणे अशक्य झाले. परिणामी संरक्षक भिंतच फोडण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थायी समितीचे अध्यक्ष जयतीर्थ सवदत्ती यांनी भिंत फोडून साफ करा, असे सांगितले. मात्र, नागरिकांनी भिंत फोडल्यानंतर त्या ठिकाणी धोका निर्माण होणार आहे. तेव्हा भिंत न फोडता त्याची सफाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी सिद्धार्थ भातकांडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
मागील जेसीबीच्या मालकाचे भाडे थकले
महानगरपालिकेकडे असलेले जेसीबी खराब झाले आहेत. मागील वेळीही भाड्याने जेसीबी घेण्यात आला होता. त्याचे भाडे देखील दिले गेले नाही. त्यामुळे आता मोठा जेसीबी मिळणे अवघड झाले. दुसऱ्या मालकाकडून जेसीबी आणण्यात आला. मात्र, या जेसीबीच्या माध्यमातून तो कचरा काढणे अशक्य झाले. याबाबत या परिसरात मनपाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत होती.