कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विरोधी तंबू रिकामे, भाजपचे 'हाऊसफुल्ल'!

04:07 PM Aug 13, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

सांगली / शिवराज काटकर :

Advertisement

सांगली जिल्ह्यात वसंतदादा घराण्यातील एखादी व्यक्ती भाजपमध्ये येईल, ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे भाजपमध्ये परततील, खा. विशाल पाटील यांचे समर्थक मनोज सरगर इतके मोठे शक्तिप्रदर्शन करतील आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गुलाबराव पाटील यांचे पुत्र पृथ्वीराज पाटील जिल्हाध्यक्षपद सोडून भाजपमध्ये जातील असे कोणी स्वप्नातही म्हंटले नसते. पण ते सत्यात उतरले आहे. अजूनही काहीजण येऊ शकतात, अशी चर्चा आहे. भाजप आपल्या दारावर 'हाऊसफुल'ची पाटी कधी लावते, याकडे इतर पक्षांच्या नजरा लागल्या आहेत.

Advertisement

राज्यातच भाजपकडे सुरू असलेले इनकमिंग इतक्या वेगाने चालू आहे की या वादळात आपला टिकाव लागतो की नाही, या चिंतेने गावोगावचे नेते धास्तावले आहेत. परिणामी मिळेल ती संधी साधत भाजपमध्ये येण्याचा घाट घातला जात आहे. सांगली जिल्ह्यात अजितदादांच्या पक्षात गेलेले माजी खासदार संजय पाटील सुद्धा पुन्हा भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतही चलबिचल सुरू असून, त्यावर खुद्द माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही मौन बाळगावे लागत आहे. हीच अवस्था कॉंग्रेसमध्ये आहे. आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यासमोर हे मोठे आव्हान आहे.

जिल्ह्यात राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. विरोधी पक्षांतील प्रभावी नेत्यांना हळूहळू भाजपमध्ये घेत, त्यांच्या संघटनांची मुळे खिळखिळी करण्यात आली आहेत. अशा अवस्थेत विरोधी पक्षांचे होणार काय असा प्रश्नच आहे. भाजप एकापाठोपाठ एक प्रभावी नेते पक्षात घेत चालला आहे. त्यांच्या गटातील कितीजणांना तिकीट मिळतील याबाबत आत्ताच काही स्पष्ट नसले तरी त्यांच्यातील बेबनावावर लक्ष ठेवून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला रणनीती आखावी लागणार आहे. परिणामी प्रतिक्रियावादी राजकारणात गुंतून पडले तर भाजप पेक्षा काही वेगळे जनतेसमोर घेऊन जाण्यात त्यांना कितपत यश येईल आणि लोक कोणाला अधिक प्रतिसाद देतील हे आता सांगणे मुश्कील आहे.

विरोधी पक्षातील नेत्यांमधील बेबनाव, सत्तेतील विकास निधीची उपलब्धता भाजपकडे केंद्र व राज्य दोन्ही पातळ्यांवर सत्ता असल्याने निधी मिळवणे सोपे, पदाचा दर्जा व निवडणुकीतील संधी, विरोधी बाकावर बसून राजकीय प्रभाव घटण्यापेक्षा सत्तेत स्थान मिळवणेस पसंती दिली जात आहे.

भविष्यातील निवडणुकांचे गणित पाहता महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या यामध्ये भाजपची गाडी पुढे असल्याचे कार्यकर्त्यांचे मत, आपला गट वाचवण्यासाठी नेत्यांची धडपड ही गळतीची प्रमुख कारणे मानली जात आहेत.

सांगली व मिरजमध्ये आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि सुरेशभाऊ खाडे यांनी आपले आसन बळकट करून घेतले आहे. विविध जातीय घटकांना जोडून त्यांनी स्वतःचे बालेकिल्ले मजबूत केले आहेत. बाहेरून प्रभावी नेते आले तरी त्यांच्यावर परिणाम होणार नाही अशी अंतर्गत व्यवस्था त्यांनी तयार केली आहे.

याउलट काँग्रेस आणि राष्ट्रवादीची येथे हालचाल मंदावलेली आहे. आज पक्ष सोडून गेलेले आणि भाजपमधील मूळचे प्रभावी नेते यांच्यातील संभाव्य वाद महापालिकेपासून जिल्हाभरातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीपर्यंत उमेदवार ठरवताना महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आशा वाढवू शकतात. मात्र, फुटण्याऐवजी सत्ताधारी आघाडीतून वेगळे पॅनल काढून लढवण्याची रणनीतीही वापरली जाऊ शकते. अर्थात, ही चर्चा अद्याप दूरची आहे.

पारंपारिक काँग्रेस मतदारांचा काही पट्टा अजूनही मजबूत आहे. पण भाजपचे गावपातळीवरील आव्हान तगडे आहे. नेते आणि पॅनलप्रमुख होऊ शकणाऱ्या मंडळींनी ऐनवेळी साथ सोडल्याने महाविकास आघाडीत मौन पसरले आहे.

या गळतीचा फटका अजितदादांच्या राष्ट्रवादीला सुद्धा बसत आहे. यातील काही नेत्यांची चलबिचल सुरू आहे. माजी खासदार संजय पाटील यांना भाजप परत घेत असल्याचा संकेत मिळत असेल, तर त्यांच्यासोबत आणखी काही नेते परत येऊ शकतात. यापूर्वीच विट्याचे वैभव पाटील यांनी दादांचे जिल्हाध्यक्षपद सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे विरोधी तंबू रिकामे, भाजपाचे हाऊसफुल्ल असे चित्र आहे

आमदार सर्वश्री जयंत पाटील, विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्यासमोर सांगली महापालिकेसह जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका नगरपंचायत आणि भविष्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये अस्तित्व टिकवण्याचे मोठे आव्हान आहे. भाजपमधील निष्ठावंत आणि सक्षम असूनही गटबाजीतून डावललेल्यांना आपल्या तंबूत खेचणे, त्यांच्या मनात विजयाची खात्री निर्माण करून पॅनल उभे करणे हे दिव्य काम असेल. मुस्लिम, दलित, अल्पसंख्यांक, मराठा आणि ओबीसीतील नाराज घटकांना एकत्र करून त्यांची 'व्होट बँक' निर्माण करणे आणि त्यावर आधारित विरोधी पॅनल उभे करणे हे या नेत्यांसाठी अत्यावश्यक ठरणार आहे.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर, सत्यजित देशमुख, सदाभाऊ खोत यांच्यासह अनेक माजी आमदार, माजी लोकप्रतिनिधी, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, प्रकाश ढंग आणि इतर पदाधिकारी आपापले काम करत आहेत. बाहेरच्या पक्षातून येणाऱ्यांना विरोध न करता स्वागत करण्याची भूमिका घेत त्यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. जिल्हास्तरावर विरोधकांची पकड कमी झाल्याने पक्षप्रवेश सोपे झाले आहेत. बुधवारी पृथ्वीराज पाटील यांचा प्रवेश मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. यामुळे काही प्रश्न निर्माण होणार असले तरी विरोधकांचा तंबू मोकळा करून सत्ताधाऱ्यांचे 'हाऊसफुल्ल' होत आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये चलबिचल वाढली असून ते कसे सावरणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

 

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article