विरोधकांनी दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेणे बंद करावे- आमदार ऋतुराज पाटील
कसबा बावडा प्रतिनिधी
माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून आणि आमच्या पाठपुराव्यातून कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागासाठी कोट्यावधी चा निधी मंजूर करून त्यानुसार भागातील विविध विकास कामे सुरू आहेत, आम्ही केलेल्या या कामाचे श्रेय विरोधकांनी घेऊ नये. असा टोला दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी नाव न घेता माजी आमदार अमल महाडिक यांना लगावला. ते राजलक्ष्मी नगर येथील पूर संरक्षक बांधकामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, माजी नगरसेविका दीपा मगदूम, दत्तात्रय बामणे शामराव चौगले उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, आम्ही सरकारकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे खेचून आणलेल्या निधींच्या माध्यमातून मतदार संघात विविध विकास कामे सुरू आहेत. पण आम्ही आणलेलला निधी विरोधक आपणच आणल्याचे सांगत आहेत. त्यांनी तसे पुराव्यानिशी स्पष्ट करावे.
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 मधून तत्कालिन पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या निशीतून कोल्हापूर शहरातील विविध पूरबाधित ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यासाठी सुमारे 2 कोटी 11 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये रामानंदनगर येथील शाहूकालीन बंध्रायानजीक पूर संरक्षक भिंत बांधण्यासाठी 1 कोटी 20 लाख, राजलक्ष्मीनगर येथील ओढा आणि सोसायटी येथील ओढा या दोन्ही ठिकाणी 79.43 लाखांच्या निधीतून 155 मीटर लांबीची संरक्षक भिंत बांधली जाणार आहे. या कामाचे उदघाटन सोमवारी सायंकाळी 6 वाजता आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरिकांसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.