For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजाराम कारखान्याच्या बदनामीसाठी विरोधकांचा मोर्चा- माजी आमदार अमल महाडिक

07:26 PM Jan 02, 2024 IST | Abhijeet Khandekar
राजाराम कारखान्याच्या बदनामीसाठी विरोधकांचा मोर्चा  माजी आमदार अमल महाडिक
MLA Amal Mahadik
Advertisement

खासगीकरण केलेल्या डी.वाय. पाटील कारखान्यावरही मोर्चा काढण्याचा इशारा

कोल्हापूर प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनावेळी अवकाळी पडलेला पाऊस, मराठा आंदोलन अशा अनेक कारणांमुळे जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांचे तोडणी वेळापत्रक बिघडले आहे. पण केवळ राजाराम कारखान्याबद्दल वाटणाऱ्या मत्सरातून विरोधकांनी मोर्चा काढला आहे. हा मोर्चा केवळ स्टंटबाजी असून कारखान्याची बदनामी करण्याच्या उद्देशाने विरोधकांनी मोर्चा काढल्याचा आरोप माजी आमदार अमल महाडिक यांनी केला. तसेच कारखाना बदनामीचे षडयंत्र रचत प्रशासनाला जर कोणी वेठीस धरत असेल तर आपण जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहे. वेळप्रसंगी खरी परिस्थिती समोर आणण्यासाठी खासगीकरण केलेल्या डी.वाय. पाटील कारखान्यावरही मोर्चा काढण्याचा इशारा महाडिक यांनी दिला.

Advertisement

विरोधी सभासदांचा ऊस तोडण्यास राजाराम कारखान्यातील सत्ताधारी टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीने प्रादेशिक सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आमदार पाटील यांनी प्रसंगी राजारामा कारखान्यावर धडक देण्याचा इशारा दिला. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत माजी आमदार महाडिक यांनी या मोर्चाला प्रत्यूत्तर दिले.

माजी आमदार महाडिक म्हणाले, पोटनियम बदलाच्या संदर्भात मंगळवारी प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्या कार्यालयात सुनावणी होती. या सुनावणीवर अप्रत्यक्षरीत्या दबाव टाकण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. त्यांच्या मोर्चात शेतकरी कमी आणि कार्यकर्तेच जास्त होते. मोर्चाला केवळ 150 लोक उपस्थित होते. त्यातही 25 भर सभासद वगळता इतर सर्व कार्यकर्तेच होते. उपस्थित असलेल्या पंचवीसभर सभासदांपैकी बहुतांश सभासदांचा ऊस कारखान्याने तोडला असून त्यांच्या बँक खात्यावर पैसे ही जमा झाले आहेत. सतेज पाटील नेतृत्व करत असलेल्या कारखान्यामध्ये काय परिस्थिती आहे, हे यापूर्वीही सांगितले आहे पण त्याबाबत त्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची त्यांची सवयच असल्याचा आरोप माजी आमदार महाडिक यांनी केला. पत्रकार परिषदेला राजाराम कारखान्याचे संचालक दिलीप पाटील, तानाजी पाटील, संतोष पाटील, श्रीकांत पाटील आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement

.