श्रीलंकेत विरोधी पक्षनेत्याची हत्या
गोळीबार करून हल्लेखोर फरार : तपास सुरू
वृत्तसंस्था/कोलंबो
श्रीलंकेतील विरोधी पक्षनेते लसांथा विक्रमेसेकरा यांची बुधवारी त्यांच्या कार्यालयात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. 38 वर्षीय विक्रमेसेकरा हे वेलिगामा सिटी कौन्सिलचे अध्यक्ष होते. ते त्यांच्या कार्यालयात लोकांशी भेटत असताना एका बंदूकधारी व्यक्तीने घुसून रिव्हॉल्व्हरमधून अनेक गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. गोळीबारानंतर मारेकरी घटनास्थळावरून पळून गेला. मारेकऱ्याला पकडण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. हत्येमागील हेतू काय होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
विक्रमेसेकेरा हे विरोधी पक्ष समगी जना बालावेगायाचे (एसजेबी) सदस्य होते. वेलिगामा कौन्सिलच्या नियंत्रणासाठी त्यांच्या पक्ष आणि सत्ताधारी पक्षामध्ये राजकीय लढाई सुरू होती. गेल्यावर्षी राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर ही कोणत्याही राजकीय नेत्याची पहिली हत्या आहे. त्यांच्या सरकारने कायदा आणि सुव्यवस्था पुनर्संचयित करण्याचे आश्वासन दिले होते. यावर्षी श्रीलंकेत हिंसक गुन्हेगारी वाढली असून यांचा मुख्य संबंध ड्रग्ज टोळ्या आणि संघटित गुन्हेगारीशी आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 100 हून अधिक गोळीबारात किमान 50 लोक मारले गेले आहेत.