For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विरोधक मूर्ख, चुकीच्या बातम्यांमुळे संभ्रम

01:17 PM Oct 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
विरोधक मूर्ख  चुकीच्या बातम्यांमुळे संभ्रम
Advertisement

सकाळपासून संध्याकाळपर्यंत 20 टक्के सूट : वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे स्पष्टीकरण

Advertisement

पणजी : वीजबिलाचे दर वाढवण्याच्या विषयावरुन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी विरोधकांना ‘मूर्ख’ संबोधून त्यांची खिल्ली उडवली असून प्रसार माध्यमांनी दिलेल्या चुकीच्या बातम्यांमुळे विरोधकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे ढवळीकर यांनी म्हटले आहे. शिवाय सर्वसामान्य जनतेला सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेतील वीज वापरास 20 टक्के सूट दिल्याचा दावाही ढवळीकर यांनी केला आहे. पर्वरी येथे मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ढवळीकर यांनी स्पष्टीकरण दिले की, प्रसार माध्यमांतील बातम्यांमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. वीज दरवाढीबाबत वीज खात्याच्या कार्यालयात जाऊन घेराव घालण्याची विरोधकांची कृती मूर्खपणाची असल्याचे त्यांनी नमूद केले तसेच ते प्रसारमाध्यमांवरही घसरले. पत्रकारांनी वीजदरवाढीचा प्रथम अभ्यास करावा आणि नंतरच प्रश्न करावेत, असा सल्लाही ढवळीकर यांनी दिला.

विजेचा गैरवापर थांबवण्यासाठी जादा दर

Advertisement

सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत जे लोक कमीतकमी वीज वापरतील त्यांना 20 टक्के सवलत मिळणार आहे. सायंकाळी 5 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजेपर्यंत विजेचा वापर करणाऱ्यांना 20 टक्के जादा दर द्यावा लागणार आहे. सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी विजेचा चुकीचा वापर तसेच अपव्यय होतो. विजेचा गैरवापर झाल्यामुळे वीज वाया जाते म्हणून त्यावर निर्बंध येण्याकरीता 20 टक्के जादा दर लावण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वसामान्य जनतेला या दरवाढीचा फटका बसणार नाही, अशी तरतूद करण्यात आली असून जे विजेचा जादा वापर करतील, त्यांना जास्त बिल द्यावे लागेल, असेही ते म्हणाले.

राज्यात वीजनिर्मितीसाठी प्रयत्नशील

गोव्यात वीजनिर्मिती करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून 100 मेगावॅट वीज तयार व्हावी म्हणून प्रक्रिया सुरु केल्याचे ते म्हणाले. राज्यात वीज तयार करणे आता महत्त्वाचे असून त्यात स्वयंपूर्ण होण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

डिसेंबरपासून स्मार्ट वीजमीटर बसवणार

येत्या डिसेंबर 2025 पासून स्मार्ट वीजमीटर बसवण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी वेगळा खर्च येणार नाही. ते बसवण्याचे काम वीज खातेच करणार असल्याचे ढवळीकर यांनी नमूद केले.

Advertisement
Tags :

.