‘गृहलक्ष्मी’च्या हप्त्यावरून विरोधक आक्रमक
मंत्र्यांनी सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप : सिद्धरामय्यांच्या हस्तक्षेपानंतर पडदा
बेळगाव : महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गृहलक्ष्मी योजनेसंबंधी विधानसभेत चुकीची माहिती दिली आहे का? असा प्रश्न शुक्रवारी विधानसभेत उपस्थित करण्यात आला. मंत्री जी माहिती देतात त्यावर आम्ही विश्वास ठेवतो. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गृहलक्ष्मी योजनेची माहिती देताना सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केला. शुक्रवारी प्रश्नोत्तराच्या तासानंतर विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी हा मुद्दा उपस्थित केला. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी 9 डिसेंबर रोजी आमदार महेश टेंगिनकाई यांनी गृहलक्ष्मी योजनेची रक्कम पूर्णपणे देण्यात आली आहे का? यासंबंधी प्रश्न विचारला होता. ऑगस्टपर्यंतची रक्कम लाभार्थीच्या खात्यात जमा करण्यात आल्याचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले होते.
दिशाभूल अधिकाऱ्यांकडून की मंत्र्यांकडून?
फेब्रुवारी व मार्चमध्ये हुबळी-धारवाड परिसरात या योजनेची रक्कम जमा झाली नाही. याकडे महेश टेंगिनकाई यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. तरीही पूर्ण प्रमाणात रक्कम जमा केल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. आपण महिला बालकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती मिळविली आहे. हुबळी-धारवाड, हावेरी, गदग जिल्ह्यात रक्कम जमा झाली नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी लेखी स्वरुपात दिली आहे. याचा अर्थ काय होतो? मंत्र्यांनी सभागृहाची दिशाभूल केली की अधिकाऱ्यांकडून दिशाभूल सुरू आहे? असा प्रश्न आर. अशोक यांनी उपस्थित केला.
...हा हक्कभंग नव्हे : सिद्धरामय्या
सभागृहात चुकीची माहिती देण्यात आली आहे. रात्रीच्या डिनर पॉलिटिक्समुळे सरकारमध्ये गोंधळ आहे. हा गोंधळ दूर करा, तरच सभागृह व्यवस्थित चालेल, असा सल्लाही विरोधी पक्षनेत्यांनी दिला. भाजपचे सुनीलकुमार यांनी तर सभागृहाची दिशाभूल करणे, आमदारांना चुकीची माहिती देणे म्हणजे हक्कभंग होत नाही का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हा हक्कभंग होत नाही. जर फेब्रुवारी आणि मार्चची रक्कम अदा केली नसेल तर ती त्वरित जमा करण्याची सूचना देतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर या विषयावर पडदा पडला.