वक्फ बैठकीवर विरोधकांचा बहिष्कार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
वक्फ कायद्यात सुधारणा करणाऱ्या विधेयकावर संयुक्त सांसदीय समितीत चर्चा होत असून बुधवारी या बैठकीवर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी बहिष्कार टाकल्याने कामकाज होऊ न शकल्याचे वृत्त आहे. या विधेयकावर विचार करणाऱ्या समितीला कालावधीवाढ द्यावी, अशी विरोधी सदस्यांची मागणी आहे. मात्र, ही समिती आपला अहवाल याच आठवड्यात संसदेसमोर ठेवण्याची शक्यता आहे. या समितीचा अहवाल 20 नोव्हेंबर पर्यंत संसदेला सादर केला जाणे नियमानुसार आवश्यक आहे. त्यामुळे या समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल नियमानुसार अहवाल सादर करणार आहेत, अशी चर्चा आहे. केंद्र सरकार याच शीतकालीन अधिवेशनात वक्फ कायदा सुधारणा विधेयक संसदेत संमत करुन घेईल, अशीही चर्चा आहे. 2013 मध्ये काँग्रेस प्रणित सरकारच्या काळात वक्फ मंडळाला अनिर्बंध अधिकार देणारा कायदा संमत करण्यात आला होता. वक्फ मंडळ या अधिकारांचा गैरवापर करीत असल्याचा आणि अनेक जमीनी वक्फच्या आहेत असे भासवून ताब्यात घेत असल्याचा आरोप केला जाते आहे. या पार्श्वभूमीवर हे कायदा सुधारणा विधेयक महत्वाचे मानले जात आहे.