हिंडलगा येथील वेंगुर्ला मार्गावरील भुयारी गटार कामास विरोध
आंबेवाडी क्रॉस येथे चालू असलेल्या कामास विरोध : रस्त्याच्या एका बाजूने पाणी नेण्याची गरज
वार्ताहर/हिंडलगा
बेळगाव-वेंगुर्ला रोडवरील हिंडलगा ते सुळगा चार पदरी रस्ताकामास प्रारंभ झाला असून हे काम गेले वर्षभर चालू आहे. या रस्त्यावर आंबेवाडी क्रॉसजवळ लेप्रसी हॉस्पिटल व केंद्र कारागृह, शिवमनगर भागातून येणारे पाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साचून रहदारीला अडथळा होत असतो. याकरिता या पाण्याचा निचरा योग्य होण्यासाठी ग्राम पंचायतमार्फत सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदने दिलेली आहेत. दक्षिण भागातून येणारे सर्व पाणी रस्त्यावरून सखल भागाकडे जाते. मागीलवर्षी हेच पाणी काही घरातून गेल्याने घरांची पडझड होणार होती. परंतु ग्राम पंचायतने तत्परता दाखवून जेसीबी लावून या पाण्याला जाण्यास वाट करून दिली होती.
यावेळी देखील ग्राम पंचायतर्फे आंबेवाडी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटार होण्यासंदर्भात प्रयत्न केले होते. परंतु हे काम झालेलेच नाही. परंतु सध्या रस्त्यावरील पाणी जाण्यासाठी भुयारी गटार मारले जात आहे. त्याला ग्राम पंचायत, ग्रामस्थ व शेतकऱ्यांचा विरोध आहे. याला कारण वरून भागातून आलेले दुर्गंधीयुक्त पाणी सखल भागातील सर्व शेतात जाऊन भातपिके व इतर सर्व पिके नष्ट होणार याचा धोका ओळखून यापूर्वीच सर्व पाणी रस्त्याच्या एका बाजूने गटार करण्यासाठी प्रयत्न केला आहे. हे सर्व पाणी निचरा होण्यासाठी लेप्रसी हॉस्पिटल बाजूने सरळ सुळगा भागाकडे असलेल्या नाल्यापर्यंत व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाने केली असून यापूर्वी असाच प्रयत्न केला आहे.
200 मी. खोदाईची गरज
पाणी निचरा होण्यासाठी गटार कामाला विरोध नसून पाणी एकाबाजूने जाण्यासाठी पाण्याला वाट करून द्यावी. अवघे 200 मीटर खोदाई केल्यास पाणी योग्यप्रकारे निचरा होते. तसेच शेतकऱ्यांचे व येथील घरमालकांचे देखील हित साधल्यासारखे होईल. याकरिता दि. 18 रोजी कामबंद करून गटार वळविण्यासाठी ग्राम पंचायत व शेतकऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले. हे निवेदन सार्वजनिक बांधकाम खात्याचे सेक्शन ऑफिसर संगमेश यांनी स्वीकारले. हे निवेदन ग्राम पंचायत अध्यक्षा मिनाक्षी हित्तलमणी, उपाध्यक्षा चेतना अगसगेकर, सदस्य रामचंद्र मनोळकर, रामचंद्र कुद्रेमणीकर, यल्लाप्पा काकतकर तसेच शेतकरी, कृषी पत्तीनचे चेअरमन रमाकांत पावशे, बाळू पावशे, श्रीकांत जाधव, राजू कुपेकर, सोमनाथ कुपेकर, म. ए. समिती युवा आघाडी अध्यक्ष विनायक पावशे, अनंत कडोलकर, विजय पावशे व ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते. बऱ्याच वर्षांपासून वरील भागातून येणारे सर्व पाणी रस्त्यावर न येता एका बाजूने जाण्यास मार्ग करावा, ही मागणी पूर्वीपासूनची आहे. तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.