सेमीकंडक्टर निर्मितीत भारताला संधी
सेमी कंडक्टरच्या निर्मितीसाठी भारताने पुढाकार घेतला असून याकरिता कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. अलीकडेच केंद्र सरकारने गुजरातमधील साणंद येथे सेमी कंडक्टर कारखाना स्थापण्यासाठी मायक्रॉनच्या प्रस्तावाला मंजूरी दिली होती. या कारखान्याच्या निर्मिती कार्याला वेग आला आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमीटेड तैवानमधील पॉवर चिप सेमीकंडक्टर मॅनिफॅक्चरिंग कॉर्प यांच्या सोबत भागीदारी करून सेमी कंडक्टर निर्मितीचा कारखाना स्थापित करणार आहे.
गुजरातमधील धोलेरा येथे होणाऱ्या कारखान्यासाठी 91 हजार कोटी रुपये गुंतवणूक केली जाणार आहे. याचसोबत टाटा सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट प्रायव्हेट लिमीटेड ही कंपनी आसाममध्ये मोरीगावात सेमीकंडक्टर युनिट सुरु करणार आहे. यात जवळपास 27 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. येत्या 10 वर्षामध्ये 10 सेमीकंडक्टर निर्मिती कारखाने उभारण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर दहा वर्षात 10 फॅब उभारण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. सरकारकडे चिप पॅकेजिंग प्लांटसह सेमीकंडक्टर प्लांट स्थापन करण्यासाठी 20 प्रस्ताव आले होते. यापैकी 5 प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून 1.52 लाख कोटी रुपये गुंतवणूक यामध्ये केली जाणार आहे. इतर प्रस्तावांना मंजुरी देण्याच्या प्रक्रियेला सरकारने धार चढविली आहे.
चिपचा वापर कार, विमान यासह मोबाईल यासारख्या खूप साऱ्या वस्तुंमध्ये हमखास केला जातो. मोबाईलच्या माध्यमातून पैसे खर्च करताना सेमी कंडक्टरची भूमिका यात महत्त्वाची असते. लॅपटॉपसारख्या अत्यंत महत्त्वाच्या उपकरणासाठी या चिपचा वापर केला जातो. सध्याला जगभरातील चिप डिझाईनच्या कार्याचा आढावा घेतल्यास भारतात 20 टक्के इतके प्रमाण दिसून आले आहे. भारतात 50 हजारहून अधिकजण चिप डिझाईनच्या क्षेत्रामध्ये आपले अमुल्य योगदान देत आहेत. इंटेल, ए.एम.डी., क्वॉलकॉम या सारख्या सेमीकंडक्टर कंपन्यांची संशोधन आणि विकास केंद्रे भारतातच स्थापित आहेत. सध्याला भारत जागतिक चिप मागणीच्या बाबतीमध्ये फक्त 5 टक्के इतका पुरवठा करतो आहे. वर्ष 2026 पर्यंत हे प्रमाण दुप्पट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीड वर्षांपूर्वी इंडिया सेमीकंडक्टर मिशनची सुरुवात केली होती. यामध्ये त्यांनी गुंतवणुकीसाठी आवाहन केले होते. 2026 पर्यंत भारतातून 80 अब्ज डॉलर्सच्या सेमीकंडक्टर चिपची विक्री होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. भारतामध्ये डिझाईन संबंधीत प्रणाली बऱ्यापैकी अस्तित्वात असून निर्मितीच्या बाबतीमध्ये मात्र अद्याप बराच पल्ला गाठायचा आहे. इन्टेल व मायक्रॉन या कंपन्या आपल्या चिपचे डिझाईन आणि सेमीकंडक्टर उत्पादनाचे पॅकेजिंग व टेस्टिंग भारतीय अभियंत्यांकडून करून घेते. मात्र अमेरिका, तैवान, चिन आणि काही युरोपीय देशांमध्ये यानंतर चिप बनवली जाते. हीच मोठी अडचण भारतामध्ये चिप निर्मितीच्या बाबतीत पहायला मिळते. आगामी काळामध्ये या क्षेत्रामध्ये भारताला आघाडी घ्यायची असल्यास सुमारे अडीच लाख प्रशिक्षितांची गरज लागणार आहे. सरकार सध्याला चिप्स टू स्टार्टअप योजनेतंर्गत 85 हजार अभियंत्यांना प्रशिक्षण देत आहे. डचमधील चिप निर्माती कंपनी एनएक्सपी एक अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक भारतात करायला तयार झाली आहे. सेमीकंडक्टर निर्मितीच्या माध्यमातून 3 हजार जणांना कंपनी नोकरी देऊ शकणार आहे. 2026 पर्यंत सेमी कंडक्टर भारतीय बाजारपेठेतील उलाढाल 63 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचणार आहे. एनव्हीडीया व एएमडी यांनी संशोधन, विकास केंद्रे स्थापन केली आहेत. फेब्रुवारीतच सरकारने 1.30 लाख कोटींच्या गुंतवणूकीतून टाटा समूह व सीजी पॉवर यांना निर्मितीसाठी प्रोत्साहन म्हणून मंजुरी दिली आहे. दुसरीकडे एल अँड टी यांनीही सेमीकंडक्टर निर्मितीकरीता 300 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्याची तयारी केली आहे. पुढील 3 वर्षात ही गुंतवणूक टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. 15 उत्पादने या वर्षअखेर तयार करण्याचे अभिवचन कंपनीने दिले आहे. पंतप्रधान मोदींनी या चिप उद्योगाला चालना देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली आहेत. सेमीकंडक्टर निर्मितीतली ही संधी साधण्यासाठी नेटाने प्रयत्न करण्याची भविष्यात गरज असणार आहे.