For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवडणुकीचा कचरा..?

06:23 AM Nov 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
निवडणुकीचा कचरा
Advertisement

महाराष्ट्र विधानसभेची रणधुमाळी सुरू असतानाच तिकडे अमेरिकेतील प्रचारही आता चांगलाच शिगेला पोहोचला आहे. लोकशाहीवादी राष्ट्र म्हणून अमेरिका व भारत या दोन्ही देशांकडे पाहिले जाते. भारतातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुका अलीकडेच पार पडल्या. तर अमेरिकेत या निवडणुका होऊ घातल्या असून, पाच नोव्हेंबरला त्याकरिता मतदान होणार आहे. या निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार आणि विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचे पारडे काहीसे जड असल्याचे विश्लेषक सांगतात. अशी सगळी अनुकूल स्थिती असताना अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी ट्रम्प यांच्याविषयी काढलेले उद्गार अनपेक्षितच म्हटले पाहिजेत. ट्रम्प तुम्ही आणि तुमचे समर्थक कचरा आहात, अशा शेलक्या शब्दांत बायडन यांच्यासारख्या संयत नेत्याने ट्रम्प यांच्यावर टीका करावी, हेच मुळात विश्वास वाटावे, असे नाही. ट्रम्प आणि त्यांचे राजकारण मागच्या काही वर्षांत जगाने जवळून पाहिले आहे. एखाद्या मुद्द्याचा कसा उपयोग करून घ्यावा, त्यातून नाट्या निर्माण कसे करावे, यामध्ये ते माहीर आहेत. त्यामुळे बायडेन यांच्या वक्तव्यानंतर ट्रम्प यांनी कचरासेवकाची वेशभूषा करून कचऱ्याच्या गाडीवरून प्रचार केल्याचे दिसून आले. आपला उल्लेख कचरा करून बायडेन आपला आणि पर्यायाने अमेरिकी नागरिकांचा द्वेष करतात, असा आरोप करायलाही ते विसरले नाहीत. एकूणच या मुद्द्यावर राजकीय लाभ उठविण्याचा ट्रम्प यांचा निश्चितच प्रयत्न असेल. कमला हॅरिस यांनी मात्र या मुद्द्यावर हात झटकत ट्रम्प यांची विखारी कारकीर्द आपण अनुभवली आहे. मात्र, मला समस्त अमेरिकी नागरिकांचे प्रतिनिधीत्व करायचे असल्याचे सांगत सारवासारवीचा प्रयत्न केला आहे. हा मुद्दा निवडणुकीत निर्णायक ठरणार का किंवा कसे, हा वेगळा विषय आहे. मात्र, अमेरिकेसारख्या प्रगत व पुढारलेल्या देशातही प्रचाराची पातळी कशी खालावते, याचे कचराप्रकरण हे उत्तम उदाहरण ठरावे. देशातील महाराष्ट्र व झारखंडमध्येही निवडणुकीचे रण पेटले आहे. प्रचारसभांना सुऊवात झाली नसली, तरी राजकीय नाट्या, भावनांचा कल्लोळ, राजकीय कुरघोड्या याने येथील अवकाळ व्यापला आहे. यामध्ये पवार काका पुतण्यांमधील शाब्दिक युद्धाने जनमानसाचे चांगलेच मनोरंजन होऊ लागले आहे. लोकसभेत बहीण सुप्रियाविरोधात पत्नी सुनेत्रा यांना रिंगणात उतरविण्याचा माझा निर्णय चुकीचा होता. आता माझ्याविरोधात युगेंद्र पवार यांना बारामतीतून मैदानात उतरवून शरद पवार गटाने तीच चूक केल्याकडे दादा लक्ष वेधतात. राजकारणी चुका करतात आणि प्रांजळपणे त्या कशा कबूल करतात, याचा हा वस्तूपाठच रहावा. मागच्या काही दिवसांमध्ये अजितदादांच्या एकूण वागण्याबोलण्यामध्ये बराच बदल झाला आहे. पिंक पॉलिटिक्स या साऱ्याला कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. युद्ध असो वा निवडणूक सध्या रणनीतीला महत्त्व आहे. दादांनीही म्हणे एका कंपनीकडे हे काम सोपविले आहे. त्यामुळे दादांमधील नम्रताभाव हा त्याचाच भाग असण्याची शक्यता अधिक होय. मात्र, तेच दादा सांगलीत जाऊन आर. आर. आबांनी माझा केसाने गळा कापला, असे वक्तव्य करतात, तेव्हा ‘मूळ स्वभाव जाईना’ या वाक्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. राजकीय, सामाजिक जीवनात कधी काय बोलावे, याचे तारतम्य असले पाहिजे. निवडणुकीचा काळ हा तर सर्वाधिक संवेदनशील. अशा वेळी अशी विधाने करणे म्हणजे बूमरँगलाच आमंत्रण. दादांनीच तेच केले, असे दिसते. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचा उल्लेख भटकती आत्मा असा केला होता. या विधानाने पवारांची लोकसभेची लढाई सोपी झाली. हे पाहता आता प्रचाराच्या टप्प्यात महायुतीच्या नेत्यांना अधिक सावधपणे बोलावे लागेल. तिकडे पालघरमध्ये शिंदेसेनेने विधानसभेची उमेदवारी नाकारल्याने अज्ञातवासात गेलेले आमदार श्रीनिवास वनगा तिसऱ्या दिवशी घरी परतले. त्यांचा ढसाढसा रडताना व्हायरल झालेला व्हिडिओ, उद्धव ठाकरे यांना देवमाणूस म्हणून त्यांनी दिलेली उपमा, याचे दर्शन उभ्या महाराष्ट्राला झाले. सत्तेकरिता वनगा यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली व शिंदेंच्या गटात ते सामील झाले. आता उमेदवारी कापल्यानंतर त्यांना उद्धव यांच्यामध्ये देव दिसला, यातून आपले राजकारणी किती स्वार्थी आणि मतलबी झाले आहेत, हेच अधोरेखित होते. खरंतर यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांनी निवडणुकीचाच कचरा केला आहे, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरू नये. कोण कुठल्या पक्षात आहे, कोण कुठून निवडणूक लढवतोय, हेच कळेनासे झाले आहे. दादा गटाचा माणूस शरद पवार गटाचा उमेदवार, भाजपचा नेता शिंदे गटाचा उमेदवार किंवा महायुतीचा घटक महाविकास आघाडीकडून नि आघाडीचा यूतीकडून लढतोय, अशी सगळी स्थिती. राजकीय नेत्यांना आता विचारधारेशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही. ते पूर्णपणे प्रोफेशनल झाले आहेत. आपल्याला जेथून संधी मिळेल, तिथून ते लढायला तयार असतात. मुख्य म्हणजे राजकीय पक्षांनादेखील आता कुणीही चालतो. हे बघता निकालानंतर महाराष्ट्राचे चित्र काय असेल, याची कल्पना करवत नाही. राज्यात सत्तास्थापनेसाठी 144 जागांची आवश्यकता आहे. हा आकडा गाठण्याकरिता युती व आघाडीमध्ये चुरस राहील. परंतु, तसा तो गाठता आला नाही, तर कुणीही कुणाबरोबर जाऊन सरकार स्थापना केल्यास आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही.  लवकरच प्रचाराला सुऊवात होईल. या टप्प्यात प्रचाराचा पातळी न सोडण्याची जबाबदारी आघाडी व युती या दोहोंची आहे. पक्षापक्षांमध्ये स्पर्धा असण्यात काही गैर नाही. मात्र, या निवडणुकीत वैचारिक, नैतिक प्रदूषण होणार नाही, याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे. सध्या संपूर्ण देश दीपोत्सवाच्या प्रकाशात न्हाऊन निघाला आहे. अशा या मंगलसमयी घरोघरी विवेकदीप उजळायला हवेत. निवडणुका येतात, जातात. पण, कुणी कुणाचा द्वेष करू नये. राजकीय पक्षांनी, उमेदवारांनी एवढे भान बाळगले, तरी लोकशाहीला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होईल.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.