देशाची वाटचाल कट्टर हिंदुत्वाकडे सुरू !
माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांचे मत ; स्वातंत्र्य सैनिक जयानंद मठकर स्मृती व्याख्यानमाला
सावंतवाडी । प्रतिनिधी
देशात महागाई आणि बेरोजगारीसारखे गंभीर प्रश्न असताना, इतिहासातील जुनी प्रकरणे उकरून काढून धार्मिकतेच्या नावाखाली लोकांचे लक्ष मूळ समस्यांपासून जाणीवपूर्वक दुसरीकडे वळवले जात आहे, बाबरी मशीद पडल्यानंतर देशातील समाजवाद संपून धार्मिक कट्टरता वाढली आणि टेक्नो-भांडवलशाहीचा उदय झाला.या परिस्थितीत देशाची वाटचाल कट्टर हिंदुत्वाकडे सुरू झाली असून, हिंदू धर्मातील सहिष्णुतेच्या ऐवजी कट्टरता वाढत आहे.असे स्पष्ट मत माजी सनदी अधिकारी तथा साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले.श्रीराम वाचन मंदिर आयोजित स्वातंत्र्य सैनिक जयानंद मठकर स्मृती व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. त्यांच्या व्याख्यानाचा विषय ‘जुने जाऊ द्या मरणालागूनी’ हा होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कातळ शिल्प अभ्यासक सतीश लळीत होते. यावेळी प्राध्यापक प्रवीण बांदेकर, श्रीराम वाचन मंदिराचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, एडवोकेट संदीप निंबाळकर आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना देशमुख म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाला आधुनिक, विज्ञाननिष्ठ आणि समृद्ध बनवण्याचे स्वप्न पाहिले होते आणि त्या दिशेने वाटचालही सुरू होती. धर्मनिरपेक्षता आणि समाजवादाच्या आधारावर आधुनिक भारताची निर्मिती होत असताना देशाने प्रगतीही केली. मात्र, १९९० नंतर खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण धोरणांमुळे परिस्थितीत बदल झाला. बाबरी मशीद पडल्यानंतर देशातील समाजवाद संपून धार्मिक कट्टरता वाढली आणि टेक्नो-भांडवलशाहीचा उदय झाला.या परिस्थितीत देशाची वाटचाल कट्टर हिंदुत्वाकडे सुरू झाली असून, हिंदू धर्मातील सहिष्णुतेच्या ऐवजी कट्टरता वाढत आहे. ८० टक्के हिंदू आणि २० टक्के अल्पसंख्याक अशी मांडणी करून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. इतिहासातील जुनी प्रकरणे उकरून काढून हिंदू धर्मावर कसा अन्याय झाला, याची उदाहरणे देऊन ‘व्हिक्टिम कार्ड’ खेळले जात आहे.देशातील मध्यमवर्ग आणि सुशिक्षित वर्गही कट्टर धार्मिकतेकडे वळत असून, धार्मिकतेच्या नावाखाली बेरोजगारी, महागाई यांसारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवले जात आहे. त्यामुळे लोकांना हे प्रश्न आता प्रश्नच वाटेनासे झाले आहेत, कारण धार्मिकता लोकांच्या अंगवळणी पडली आहे. धर्मनिरपेक्ष व्यक्तीला हिंदुत्वविरोधी आणि समाजवादी व्यक्तीला नक्षलवादी ठरवले जात आहे, अशी चिंता देशमुख यांनी व्यक्त केली.कार्ल मार्क्सच्या विचारांचा दाखला देत ते म्हणाले की, धर्म ही अफूची गोळी आहे आणि भांडवलशाहीला पोषक असे काम धर्म करत असतो. आता तर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भांडवलशाहीची सूत्रे मूठभर लोकांच्या हाती आली आहेत. भविष्यात माणसांपेक्षा रोबोटला अधिक महत्त्व येणार असून, माणूस टिकणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकास साधण्याऐवजी अनेक प्रश्न उभे राहिले आहेत, असेही ते म्हणाले.आजच्या परिस्थितीत देशात वाढलेली कट्टर धार्मिकता पाहता विचारवंत, साहित्यिक आणि समाजातील महत्त्वाच्या घटकांनी पुरोगामी विचारांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे आवाहन देशमुख यांनी केले