ऑपरेशन सिंदूर अद्याप जारी
सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे वक्तव्य : सैन्याला तयारीचा स्तर वाढवावा लागणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑपरेशन सिंदूर अद्याप जारी असल्याचे महत्त्वपूर्ण वक्तव्य चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी केले आहे. देशाच्या सैन्यतयारीचा स्तर अधिक उंच असायला हवा. आम्ही चोवीस तास आणि 365 दिवस सज्ज राहू अशाप्रकारची तयारी असावी. युद्धाचे बदलते स्वरुप पाहता भविष्यातील सैनिकाला माहिती-तंत्रज्ञानासोबत युद्धकौशल्याने निपुण असणे गरजेचे आहे. सैन्यासाठी शस्त्र आणि शास्त्र (ज्ञान) दोन्ही शिकणे आवश्यक असल्याचे जनरल अनिल चौहान यांनी दिल्लीत आयोजित एका संरक्षण कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे. सद्यकाळातील लढाया या पारंपरिक सीमांमध्ये मर्यादित नाहीत. तर त्या पारदर्शक, तीव्र, बहुक्षेत्रीय आणि तांत्रिक स्वरुपात अत्यंत जटिल ठरल्या आहेत. सध्याचे युद्ध केवळ बंदूक आणि रणगाड्यांपुरते मर्यादित राहिलेले नाही असे उद्गार त्यांनी काढले आहेत.
युद्धाच्या 3 स्तरांमध्ये दक्षता आवश्यक
सद्यकाळातील योद्ध्याला सामरिक, संचालन आणि रणनीतिक स्तरांवर एकाचवेळी दक्ष व्हावे लागेल. तसेच थल, जल, वायुसोबत सायबर आणि कॉग्निटिव्ह वॉरफेयरसारख्या नव्या युद्धक्षेत्रांमध्येही सक्षम व्हावे लागणार आहे. हे एक असे युग आहे, जेथे एक ड्रोन हल्ला, सायबर अटॅक, नॅरेटिव्ह वॉर आणि अंतराळात अडथळा परस्परांशी जोडू शकतात असे वक्तव्य सीडीएस चौहान यांनी केले आहे.
‘कन्वर्जंस वॉरफेयर’चा उल्लेख
सध्या कायनेटिक आणि नॉन-कायनेटिक (म्हणजेच पारंपरिक आणि डिजिटल) युद्ध परस्परांमध्ये मिसळत आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या पिढीचे युद्ध आता तिसऱ्या पिढीच्या सायबर आणि एआय आधारित युद्धासोबत संम्मिलित झाले आहे, असे जनरल चौहान यांनी कन्वर्जंस वॉरफेयर शब्दाचा उल्लेख करताना म्हटले आहे.
हायब्रिड वॉरियरची संकल्पना
भविष्यात आम्हाला अशा हायब्रिड वॉरियरची आवश्यकता भासणार आहे, जो सीमेवर लढू शकेल, वाळवंटात रणनीति आखू शकेल, शहरांमध्ये काउंटर-इन्सर्जन्सी ऑपरेशन चालवू शकेल, ड्रोनला निष्क्रीय करू शकेल, सायबर हल्ल्यांना प्रत्युत्तर देत प्रभावशाली माहिती अभियान राबवू शकेल. आम्हाला तीन प्रकारच्या म्हणजेच टेक वॉरियर्स, इन्फो वॉरियर्स आणि स्कॉलर वॉरियर्सची गरज भासणार आहे. टेक वॉरियर्स एआय आणि सायबर शक्तीचा वापर करू शकतील. तर इन्फो वॉरियर्स नॅरेटिव्ह्जना आकार देतील आणि बनावट माहितीचा मुकाबला करतील. स्कॉलर वॉरियर्स रणनीति आणि युद्धशास्त्राच्या ज्ञानाद्वारे निर्णय घेऊ शकतील. आगामी काळात सैनिकांना या तिन्ही भूमिकांमध्ये दक्ष व्हावे लागणार आहे. हीच आधुनिक युद्धाची नवी व्याख्या असल्याचे जनरल चौहान यांनी म्हटले आहे.