‘बोटां’नी चालवा संगणक
संगणक किंवा काँप्युटर तसेच स्मार्टफोन हा आजच्या युगात आपल्या महत्वाच्या अवयवासारखाच झाला आहे. त्याच्याशिवाय जीवन अशक्य आहे, ही भावना प्रबळ आहे. त्यामुळे ही साधने जास्तीत जास्त सोप्या आणि कष्टविरहित पद्धतीने कशी चालविता येतील, यावर बरेच संशोधन होत आहे. याच संशोधनातून ‘मेटा’ नामक जगप्रसिद्ध कंपनीने एक मनगटावर बांधता येईल अशा रबरबँडसारख्या साधनाची निर्मिती केली आहे. यामुळे आपण केवळ ‘बोटां’नी ही साधने चालवू शकाल.
आता यात नवे ते काय, असा प्रश्न आपल्याला पडेलच. कारण, आत्तासुद्धा आपण कीबोर्डवर बोटे चालवूनच संगणक चालवतो. तसेच स्मार्टफोनही बोटांनीच ऑपरेट करावा लागतो. तथापि, या बँडमुळे आपण ही साधने बोटांनी, याचा अर्थ केवळ बोटांच्या इशाऱ्याने किंवा खाणाखुणा करुन चालवू शकणार आहात. प्रत्यक्ष या साधनांना स्पर्श करण्याची आणि त्यांच्यावर आपली बोटे चालविण्याची आवश्यकता उरणार नाही, असे या कंपनीचे म्हणणे आहे.
हे रिस्टबँड काम कसे करते, तर ते आपल्या मनगटाच्या स्नायूंमधून निघणाऱ्या इलेक्ट्रिकल सिग्नल्सना ‘वाचू’ शकते. हे सिग्नल्स आपल्या मेंदूतून निघालेल्या कमांड सिग्नल्सना किंवा आज्ञा संकेतांना समजू शकतात. आपल्या मनात जे करायचे आहे, तो संदेश हे सिग्नल्स योग्य स्थानी पोहचवितात. हे सिग्नल्स या रिस्टबँडमधून आपल्या संकणकापर्यंत किंवा स्मार्टफोन पर्यंत पोहचतात आणि त्यानुसार ही साधने कामाला लागलात. केवळ बोटे विशिष्ट प्रकारे हालवून आपण आपल्या मनातील काम संगण्कापर्यंत किंवा स्मार्टफोन पर्यंत पोहचवू शकतो. आपल्याला यापुढे ही साधने प्रत्यक्ष न हाताळताही त्यांच्याकडून केवळ आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर काम करुन घेण्याचा ‘चमत्कार’ करणे शक्य होणार आहे.