For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कळेतील सांडपाण्याचे र्नैसर्गिक मार्ग खुले करा

12:51 PM Dec 10, 2024 IST | Radhika Patil
कळेतील सांडपाण्याचे र्नैसर्गिक मार्ग खुले करा
Open the natural channels of sewage in the village
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

कळे (ता.पन्हाळा) गावातील सांडपाणी पुर्वी ज्या ठिकाणांहून जात होते ते मार्ग संबंधित शेतकऱ्यांनी बंद केले आहेत. कळे गावात मोठी बाजारपेठ असल्यामुळे व गावातील तरंगती लोकसंख्या जास्त आहे. परिणामी सांडपाणी जास्त प्रमाणत निर्माण होते. हे सांडपाणी पुर्वीप्रमाणेच अनेक मार्गांनी गेले असते तर थेट नदीत मिसळण्याचा प्रश्न उद्धवला नसता. त्यामुळे नैसर्गिकरीत्या सांडपाणी जाणाऱ्या 7/12 क्षेत्रातील मार्ग खुले केले तर ग्रामपंचायतमार्फत प्रस्तावित असलेला सांडपाणी प्रकल्प उभारणे देखील सोईचे होणार असून सांडपाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. त्यामुळे सांडपाणी जाणारे मार्ग खुले करण्याबाबत संबंधित शेतकऱ्यांना आदेश द्यावेत, या मागणीचे निवेदन कळे ग्रामपंचायतीच्यावतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले.

कळे गावातील सांडपाणी पूर्वी सुमारे सहा ते सात ठिकाणाहून बाहेर पडत होते. त्यामुळे ते कुंभी-धामणी नदीत जाण्यापूर्वीच जमिनीत मुरत होते. पण गेल्या काही वर्षांपासून सांडपाणी जाणाऱ्या मार्गावर स्थानिक शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले. परिणामी गावातील बहुतांशी सांडपाणी नाल्यातून थेट कुंभी-धामणी नदीत मिसळत आहे. सध्या कळे-सावर्डे कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यावर पाणी अडवले आहे. अशा परिस्थितीत कळे गावातील सांडपाणी दररोज मोठ्या प्रमाणात नदीत मिसळत असल्यामुळे पाणी दूषित होण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे मल्हारपेठ, सावर्डे, मोरेवाडी, सांगरुळ, मरळी, चिंचवडे, भामटे, कळंबे, आडुर, कोपार्डे आदी गावात अतिसार आणि कॉलरा सदृश आजाराच्या रूग्णांची संख्या वाढली. याबाबतचे वृत्त ‘तरुण भारत संवाद’ने वेळोवेळी प्रसिद्ध करून पाणी प्रदुषणाची दाहकता प्रशासनासमोर आणली. त्याची गांभिर्याने दखल घेऊन कळे गावात सांडपाणी प्रकल्प तत्काळ राबविण्याच्या सूचना स्वच्छ भारत मिशनच्या जिल्हा समन्वयक माधुरी परीट यांनी कळे ग्रामपंचायतीस दिल्या आहेत. तुर्तास तत्काळ उपाययोजना म्हणून सांडपाणी बंधाऱ्यावर ठिकठिकाणी बंधारे घातले आहेत. तरीही काही प्रमाणात नदीत सांडपाणी मिसळत आहे.

Advertisement

जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला जागा मागणीचा प्रस्ताव

घनकचरा व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना ‘स्वच्छ भारत मिशन’ विभागाकडून दिल्या आहेत. ग्रामपंचायतीकडून ‘घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प’ आराखडा तयार केला असला तरी ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये सार्वजनिक स्तरावरती त्यासाठी पुरेशी जमीन उपलब्ध नाही. यामुळे गायरान जागा गट क्रमांक 71 मधील 0.53 हेक्टर क्षेत्रातील पुरेशी जागा उपलब्ध झाल्यास सांडपाणी व घनकचरा प्रकल्प उभारणे शक्य होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मान्यतेनुसार गायरानमधील जागा मागणीचा प्रस्ताव कळे ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.

नागरीकांच्या आरोग्याचा चेंडू आता जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात

कळे गावातील सांडपाणी पुर्वीप्रमाणेच ठिकठिकाणांहून गावाबाहेर सोडण्यासाठी तत्कालिन नाल्यांवर झालेले अतिक्रमण तातडीने काढणे आवश्यक आहे. पूर्वीचे सर्व मार्ग खुले केल्यास सांडपाणी कुंभी-धामणी नदीत मिसळणार नाही. तसेच घनकचरा व सांडपाणी प्रकल्प उभारण्यासाठी ग्रामपंचायतीकडे जागा उपलब्ध नाही. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गायरानमधील जागा घेण्यास परवानगी देणे आवश्यक आहे. त्यामुळे कळेतील सांडपाण्यामुळे परिसरातील दहा ते बारा गावांतील नागरीकांचे वेळोवेळी बिघडणारे आरोग्य सुस्थितीत ठेवायचे झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच सांडपाणी जाणारे पूर्वीचे मार्ग तातडीने खुले करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा भविष्यात पुन्हा एकदा गॅस्ट्रो, अतिसार आणि कॉलरासारख्या साथीने थैमान घातल्यास त्याचा पुन्हा प्रशासनावरच ताण येणार आहे.

Advertisement
Tags :

.