तानाजी गल्ली रेल्वेगेटनजीकची पायवाट खुली करा
नागरिकांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी : केवळ ये-जा करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात जागा उपलब्ध
बेळगाव : तानाजी गल्ली रेल्वेगेटनजीकचा पायी येण्या-जाण्याचा मार्ग रेल्वे प्रशासनाने खुला करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून रेल्वे विभागाकडे करण्यात आली. मंगळवारी रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर नागरिकांनी समस्या मांडल्या. येण्या-जाण्याची पायवाट खुली न केल्यास पुन्हा आंदोलनाचा इशाराही रेल्वे प्रशासनाला देण्यात आला. तानाजी गल्ली रेल्वेगेटनजीकचा येण्या-जाण्याचा रस्ताही रेल्वे विभागाने सोमवारी अचानक बंद केला. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रेल्वे रोखून आंदोलन केले. तानाजी गल्ली, फुलबाग गल्ली, महाद्वार रोड यासह परिसरातील नागरिकांना दोन किलोमीटर वळसा घालून ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे किमान शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी पायवाट सुरू ठेवावी, अशी मागणी करण्यात आली होती.
मंगळवारी याबाबत बैठक घेऊ, असे आश्वासन रेल्वे विभागाने दिले होते. मंगळवारी रेल्वेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी मंथनकुमार यांची नागरिकांनी भेट घेतली. रेल्वेगेट कायमचे बंद केल्यामुळे नागरिकांना होत असलेला त्रास अधिकाऱ्यांना दाखवून देण्यात आला. केवळ ये जा करण्यासाठी जागा खुली ठेवण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. अधिकाऱ्यांनी काही सूचना करत ट्रॅकवरून सायकल वाहतूक थांबविण्यासाठी काही उंचीवर लोखंडी पट्टी लावली जाणार असल्याचे सांगून केवळ ये-जा करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात जागा उपलब्ध करून देऊ, असे सांगितले. यावेळी कुलदीप हंगिरगेकर, विनोद भागवत, अनिल देसाई, प्रवीण हंगिरगेकर, सुशांत शेळके, रितेश गेंजी, युनीस सनदी, संजीव पावशे, अनिल पाटील, तेजस्विनी शेळके, भाग्यश्री झेंडे, अभिषेक केंकरे, विद्या पाटील, प्रगती शेळके, ज्योती नाईक यांसह इतर उपस्थित होते.
रेल्वे प्रशासनाचे म्हणणे काय?
तानाजी गल्ली रेल्वेगेट येथे भिंत बांधण्यात आली असून बाजूने ये-जा करण्यासाठी लहानशी जागा सोडण्यात आली होती. परंतु या ठिकाणाहून शालेय विद्यार्थी व सायकलस्वार सायकल घेऊन ये-जा करत असल्याचे निदर्शनास आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी ये-जा करण्यासाठी ठेवण्यात आलेला मार्गही बंद करण्यात आला होता. नागरिकांच्या सोयीसाठीच सोमवारी लोखंडी रॉड लावण्यात आला होता, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.