Kolhapur : फलटण प्रकरण निषेधार्थ दोन दिवस सीपीआर रुग्णालयातील ओपीडी राहणार बंद
दोन दिवस सीपीआर रुग्णालयातील ओपीडी बंद
कोल्हापूर : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येप्रकरणी दोषींवर कारवाई होऊन न्याय मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडंट संघटना (माई) कोल्हापूरच्या वतीने करण्यात आली. निषेध म्हणून दोन दिवस सीपीआरची ओपीडी बंद ठेवण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूर मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. उत्कर्ष देशमुख यांनी दिली.
सोमवारी दिवसभर अपघात विभाग, अत्यावश्यक सेवा व आंतररूग्ण विभाग वगळता ओपीडी बंद ठेवण्यात आली. मंगळवारीही हे आंदोलन सुरूच राहणार आहे. डॉ. मुंडे यांच्या आत्महत्येचा निषेध नोंदवत निवासी डॉक्टरांनी काम बंद ठेवत श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर शासकीय रुग्णालयातील वाढत्या राजकीय हस्तक्षेपाचा निषेध व्यक्त करण्यात आला.
दरम्यान घटनेच्या निषेध नोंदविण्यासाठी आज सायंकाळी सात वाजता सीपीआरमध्ये कॅन्डलमार्च काढण्यात येणार आहे. सीपीआर ते दसरा चौकापर्यंत हा कैंडल मार्च निघणार आहे. यामध्ये डॉक्टरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी मार्डचे सचिव डॉ. ऋषिकेश बांगर, महिला प्रतिनिधी डॉ. प्रणाली देशमुख, डॉ. मनमीत मर्कड, डॉ. सायली धोमणे, डॉ. अमोल निरलगि, डॉ. कृतिक भोंयार आदी उपस्थित होते.