केवळ पांढऱ्या गाड्याच
हे जग अनेक आश्चर्यकारक परंपरांनी भरलेले आहे. प्रत्येक देश, प्रत्येक नगर आणि प्रत्येक ग्राम यांचे काहीना काही वैशिष्ट्या असते. तसेच काही परंपरा असतात. त्या तशा का आहेत, याचा विचारही न करता त्या, या स्थानांमध्ये वास्तव्य करणारे लोक पाळत असतात. प्रशासनही असे नियम किंवा परंपरा यांचे काटेकोरपणे पालन करते. मध्य आशियात तुर्कमेनिस्तान नामक देश आहे. अश्गाबात ही या देशाची राजधानी आहे. या नगरात 2018 पासून एक नियम करण्यात आला आहे. त्यानुसार या नगरातील मार्गांवरुन केवळ पांढऱ्या किंवा हलक्या रंगांच्या गाड्याच धावू शकतात. भडक रंगाच्या गाड्यांना अनुमती देण्यात येत नाही. या देशाचे एक राष्ट्रपती होते. त्यांच्या विक्षिप्तपणामुळे हा नियम करण्यात आला आणि तो आज त्यांच्या निवृत्तीनंतरही तसाच पाळण्यात येत आहे.
या माजी अध्यक्षांचे नाव गुरबांगुली बर्दीमुहामेदेव असे आहे. त्यांना पांढरा रंग अतिशय आवडत असे. पांढरा किंवा शुभ्र रंग हा भाग्य आणि शुद्धता यांचे प्रतीक आहे, असे ते मानत असत. ते व्यवसायाने दंतवैद्य होते. त्यांचा स्वभाव अत्यंत विक्षिप्त होता. त्यांनी त्यांच्या विक्षिप्त स्वभावाला अनुसरुन हा नियम केला आहे, जो आजही पाळला जातो. त्यामुळे या शहरातील कारगाड्या, इतर वाहने, इतकेच नव्हे, तर इमारती, खांब, बसथांबे आदी सर्व सार्वजनिक स्थाने पांढऱ्या रंगात रंगविण्याची त्यांची आज्ञा होती. त्यामुळे 2018 पासून राजधानीचे हे नगर पांढऱ्या रंगात न्हाऊन निघाले आहे. हा नियम लागू करण्याची पूर्वसज्जता त्यांनी 2015 पासूनच केली होती. 2015 पासून या देशात गडद रांगाच्या कार्स आयात करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे येथे निळ्या. तांबड्या, नारिंगी, गडद पिवळ्या, राखाडी किंवा अन्य कोणत्याही भडक रंगाच्या गाड्या विकल्याच जात नाहीत. परिणामी, केवळ पांढऱ्या आणि अतिशय सौम्य रंगाच्या गाड्यांनाच मार्गांवरुन धावता येते. पांढऱ्या रंगाचा कंटाळा आल्याने जर कोणत्याही व्यक्तीने आपल्या कारचा रंग गडद केला, तर ती कार पोलिसांकडून जप्त केली जाते.