फटाके उडविण्यासाठी दोन तासच परवानगी
रात्री 8 ते 10 पर्यंतचे बंधन : पर्यावरणपूरक फटाक्यांना परवानगी
बेळगाव : दिवाळीमध्ये फटाके उडविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून मार्गसूची जारी करण्यात आली आहे. रात्री 8 ते रात्री 10 यावेळेत केवळ दोन तासच फटाके उडविण्यासाठी नियम लागू करण्यात आला आहे. पर्यावरणपूरकच फटाके उडविण्याची सक्ती करण्यात आली आहे. इतर फटाक्यांवर निर्बंध घालण्यात आले असून बेकायदेशीररित्या फटाके साठविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना जारी करण्यात आला आहे. त्यानुसार अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
राज्यात फटाके कारखान्यामध्ये घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने कडक भूमिका घेतली आहे. यावरून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नियमानुसार फटाके उडविण्यासाठी नियम लागू करण्यात आला आहे. रात्री 8 ते 10 यावेळेतच फटाके उडविण्यात यावेत, असा सर्वोच्च न्यायालयाने नियम घालून दिला आहे. पर्यावरणपूरक फटाके वगळता इतर फटाके उडविण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना जारी करण्यात आलेल्या मार्गसूचीमध्ये सदर नियम लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या व्याप्तीत येणाऱ्या फटाके गोडावूनची पाहणी करून पर्यावरणपूरक फटाक्यांनाच परवानगी देण्यात यावी, इतर फटाके आढळून आल्यास जप्त करण्यात यावेत, संबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, असे मार्गसूचीत नमूद करण्यात आले आहे.
पर्यावरणपूरक फटाक्यांवर क्युआरकोड लावण्यात आला आहे. तसेच त्यावर पर्यावरण फटाके म्हणून चिन्ह देण्यात आले आहे. अशी चिन्हे नसणारे फटाके जप्त करण्यात यावेत. यासाठी जिल्हा पर्यावरण अधिकाऱ्यांची मदत घेण्याची सूचनाही करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक फटाक्यांच्या आवाजाचे परीक्षण करण्यात यावे. दिवाळीदरम्यान केवळ पर्यावरणपूरक फटाक्यांनाच परवानगी देण्यात यावी, फटाके उडविताना नागरिकांना त्रास होऊ नये याची दखल घेण्यात यावी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार याबाबत जनजागृती करण्याचा आदेशही जारी करण्यात आला आहे. रुग्णालये, शिक्षण संस्था तसेच निर्बंध घातलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके लावण्यात येवू नयेत. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी जागृती मोहीम राबविण्याची सूचना करण्यात आली आहे.
न्यायालयाच्या नियमांचे पालन करावे लागणार
पर्यावरणपूरक फटाक्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. इतर फटाक्यांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. फटाके उडविण्यासाठी रात्री 8 ते रात्री 10 पर्यंत वेळ देण्यात आला आहे. न्यायालयाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.
-जिल्हाधिकारी नितेश पाटील