केवळ बदलीचे कारण की भूमाफियांचा हात?
रुद्रण्णा आत्महत्या प्रकरणी तपासाला गती : शेवटच्या दिवशी संपर्कात आलेल्यांची चौकशी
बेळगाव : तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरूच आहे. आत्महत्या केलेल्या रुद्रण्णा यडवण्णावर (वय 34) या अधिकाऱ्याबरोबर शेवटचे संभाषण केलेल्यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे. यासाठी तपास अधिकाऱ्यांनी त्यांना नोटिसा धाडल्या आहेत. त्याचबरोबर तहसीलदारांसह तिघा जणांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. खडेबाजारचे एसीपी शेखरप्पा एच. यांच्या कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी या प्रकरणाची चौकशी सुरू होती. रुद्रण्णाबरोबर मोबाईलवरून संभाषण केलेल्यांची यादी जाहीर करण्यात आली असून तहसीलदार कार्यालयातील त्याचे सहकारीच नव्हे तर बाहेरील व्यक्तींचीही चौकशी करण्यात येत आहे.
तुमच्याशी नेमके बोलणे काय झाले? असा प्रश्न विचारत अधिकारी आत्महत्या करण्यापूर्वीच्या घडामोडींसंबंधी माहिती जमविण्याचे काम करीत आहेत. याप्रकरणी तहसीलदार बसवराज नागराळ,सोमू व अशोक कबलीगेर या तिघा जणांवर खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येचा प्रकार उघडकीस आल्यापासून ते फरारी आहेत. या तिघा जणांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. आत्महत्या प्रकरणाला केवळ बदली कारणीभूत आहे की यामागे भूमाफियांचा हात आहे? याचीही पडताळणी करण्यात येत आहे. ज्या तिघा जणांवर एफआयआर दाखल झाला आहे, त्यांच्यावर अटकेची कारवाई व्हावी, यासाठी प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजप-निजद युतीच्या नेत्यांनी दबाव वाढवला आहे.