कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चेअरमन कोण डोंगळेच मुख्यमंत्र्यांना कळवतील

11:05 AM May 20, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

गोकुळ दुध संघाच्या चेअरमनपदासाठी नेत्यांनी सर्वमान्य असा एक उमेदवार निश्चित केला आहे. याची माहिती चेअरमन अरूण डोंगळे यांना दिली जात आहे. आता तेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सर्वमान्य उमेदवाराबाबत सांगतील आणि यानंतर चेअरमनपदाची कोंडी फुटेल, अशी माहिती वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. एकूणच चेअरमनपदाचा चेंडू पुन्हा डोंगळे यांच्या कोर्टात गेल्याचे दिसत आहे.

Advertisement

गोकुळचे  चेअरमनपद हे गेले काही दिवस चर्चेचा विषय ठरला आहे. विद्यमान चेअरमन अरूण डोंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपणास राजीनामा देवू नये असे म्हटले आहे. तसेच पुढील चेअरमन हा महायुतीचा असेल असेही त्यांनी सांगितले होते. यावरून गोकुळचे राजकारण पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे.

 मंत्री हसन मुश्रीफ सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विकासकामांच्या आढावा बैठकीसाठी आले होते. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आमदार सतेज पाटील, आमदार विनय कोरे यांच्यांशी चर्चा करून गोकुळ चेअरमनपदासाठी एक सर्वमान्य नाव पुढे आले आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि के.पी. पाटील यांनाही याबाबत कळवले जाणार आहे. याचबरोबर अरूण डोंगळे यांना हे सर्वमान्य असणारा उमेदवार कोण आहे, याची माहिती सांगण्याची जबाबदारी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्याकडे सोपविली आहे. तसेच डोंगळे यांनीच या नावबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कल्पना द्यावी. यानंतर राजीनामाबाबत त्यांनी निर्णय घ्यावा, अशा सूचना डोंगळे यांना केल्या जाणार आहेत. सर्वमान्य उमेदवाराच्या प्रस्तावावर डोंगळेच निर्णय घेतील.

गोकुळची निवडणूक पक्षीय झाली नव्हती. सत्तारूडांच्या विरोधात आम्ही शाहू विकास आघाडी नावाने पॅनल केले होते. त्यामुळे महायुतीचा चेअरमन करणे किंवा महाविकास आघाडीचा करणे असे नाही. सर्वमान्य एका उमेदवाराचे नाव पुढे आले आहे. त्यांना चेअरमन करण्यावर सर्व नेत्याचे एकमत झाले आहे. त्यामुळे लवकरच चेअरमनपदाची कोंडी फुटेल असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

चंदगडमधील एका विवाह समारंभात मंत्री हसन मुश्रीफ यांनी अरूण डोंगळे यांना बेदखल केल्याचे तसेच तेथील शासकीय विश्रामगृहात त्यांना झापले असल्याची चर्चा आहे. मात्र, मंत्री मुश्रीफ यांनी याचे खंडन केले असून असा प्रकार झालेला नाही. चंदगड येथील शासकीय विश्रामगृहात डोंगळे यांच्याशी गोकुळ चेअरमनवरून सोहर्दपूर्ण वातावरणात आणि हसत खेळत चर्चा झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

गोकुळ चेअरमन निवडीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचा आपल्याशी कोणताही संवाद झालेला नाही. महायुतीचा चेअरमन करायचा असल्याच्या सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे केवळ डोंगळे सांगत आहेत. आज, मंगळवारी कॅबिनेट मिटींग आहे. जर मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत मला विचारले तरच आपण चर्चा करू, स्वत:हून या विषयी त्यांच्यासोबत बोलणे करणार नसल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

कागलमधील जनता नावेद मुश्रीफ यांनी गोकुळचे चेअरमन करावे, अशी मागणी करत आहेत. याबाबत मुश्रीफ यांना विचारले असता नावेद यांना सध्या संधी नसून त्यांना प्रतिक्षा करावी लागेल.

डोंगळे यांच्या चिरंजिवास राष्ट्रवादीतून कौलवमधून जिल्हा परिषदेच्या निवडणूकीची उमेदवार दिली जाईल. यासंदर्भात प्रदेशाध्यक्षसह संबंधित पक्षातील वरीष्ठांची चर्चा केली असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच महायुतीमधील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेचाही येथे कोणी तरी इच्छुक उमेदवार असू शकतो. त्यामुळे याची माहितीही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article