आदिवासींबाबत मुख्यमंत्र्यांच्या फक्त कहाण्या
केवळ कायद्यावर बोट ठेवणे बंद करावे : कायद्यासाठी लोक नव्हे, लोकांसाठी कायदा करा,मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती समाजबांधवांना खटकणारी,मंत्री गोविंद गावडे यांचा सरकारला घरचा आहेर
फोंडा : अनुसुचित जमातबांधवासाठी भूषण ठरू शकणारे पर्वरी येथे होऊ घातलेल्या ‘आदिवासी भवन’ची प्रलंबित मागणी ज्वलंत रूप धारण करीपर्यंत वाट बघू नका! सलग तीन वर्षापासून मागणी पूर्ण करण्यासाठी कायद्यावर बोट ठेवणे सरकारने बंद करावे. आदिवासी खाते सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची सलग 4 वर्षे प्रेरणा दिन सोहळ्याला अनुपस्थिती खटकणारी आहे. मुख्यमंत्री केवळ कहाण्या सांगण्याचे धोरण राबवितात. पुढील प्रेरणा दिनपुर्वी मागणी पुर्ण न झाल्यास आदिवासी कल्याण खात्याने प्रेरणा दिन यापुढे सरकारी सोहळा म्हणून साजरा करू नका. एसटी बांधव स्वबळावर साजरा करण्यासाठी समर्थ आहेत, असा सरकारला घरचा आहेर कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी प्रेरणा दिनी दिला.
आदिवासी समाजाचा होतोय फक्त वापर
आज एसटी समाजाचा राजकारण, मतदानापुरता वापर केला जातो. आदिवासी भवनाच्या उभारणीसाठी सरकारच्या उदासिन धोरणामुळे आदिवासी कल्याण खाते सपशेल अपयशी ठरलेले आहे. याला सर्वस्वी या खात्यातील कर्मचाऱ्यांचे मवाळ धोरण कारणीभूत ठरत आहे. समाजहितासाठी उभारण्यात येत असलेल्या आदिवासी भवनासाठी प्रत्येकवेळी कायद्यावर बोट ठेवणे कितपत योग्य आहे? असा प्रश्नही मंत्री गावडे यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांचे कहाण्या सांगण्याचे धोरण
कायद्यासाठी लोक नव्हे तर लोकांसाठी कायदा करा, असा टोला मंत्र्यांनी यावेळी नाव न घेता आदिवासी कल्याण खाते सांभाळणाऱ्या मंत्र्याला मारला. प्रत्येकवेळी आदिवासी भवनासाठी बैठका घेऊन मुख्यमंत्री केवळ कहाण्या सांगण्याचे धोरण राबवितात. पुढील 25 मे 2026 पुर्वी आदिवासी भवनाची फाईल पुढे सरकवा, अन्यथा सरकारी पातळीवर प्रेरणा दिन साजरा करण्याचे बंद करा असा थेट इशारा मंत्री गावडे यांनी दिला. आदिवासी कल्याण खाते व युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्स (उटा) यांच्या संयुक्त विद्यामाने काल रविवारी फोंड्यातील राजीव गांधी कला मंदिर येथे आयोजित 14 व्या ‘प्रेरणा दिन’ सोहळयात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषी मंत्री रवी नाईक, उटा संघटनेचे अध्यक्ष प्रकाश शंकर वेळीप, सांगेचे माजी आमदार तथा गोवा अनुसुचित जमाती वित्त विकास महामंडळाचे अध्यक्ष वासुदेव गावकर, एसी एसटी आयोगाचे अध्यक्ष दीपक करमळकर, आदिवासी कल्याण खात्याचे संचालक दीपक देसाई, उटाचे कार्यकारी अध्यक्ष विश्वास गावडे, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रीतेश प्रियोळकर, कार्यकारी सचिव दुर्गादास गावडे व डॉ उदय गावकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कुळ मुंडकार खटले निकालात काढावे
उटा संघटनेच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे आपण व मंत्री गोविंद गावडे संयुक्त चर्चा करणार आहे. कुळ मुंडकार खटले सद्या कृषी खात्याअंतर्ग येत नसून ते सर्व खटले महसूल खात्याकडे वर्गिकृत करण्यात आलेले आहेत. अनुसुचित जमातीतील वंचित घटकातील कुळ मुंडकाराना न्याय देण्यासाठी जलदगतीने हे खटले निकालात आणावे असे महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांना आवाहन मंत्री रवी नाईक यांनी यावेळी केले.
प्रेरणा दिनाला मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती
प्रेरणा दिन सरकारी पातळीवर साजरा करून आजपर्यंत कोणतीच गोष्ट साध्य करण्यात सरकारला यश आलेले नाही. प्रेरणा दिनी मुख्यमंत्री डॉ सावंत सरकारकडून प्रेरणा मिळेल या भावनेने एकवटलेल्या समाजबांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रेरणा दिनाच्या सोहळयात स्वत: मुख्यमंत्री सलग 4 वर्षे अनुपस्थित राहत असल्याबद्दल उटाचे नेते तथा भाजपाचे ज्येष्ठ सदस्य प्रकाश वेळीप यांनी दु:ख व्यक्त केले. समाजबांधवासाठी राजकीय आरक्षणासाठी कोणत्याच हालचाली होत नसल्याची खंतही त्यांनी क्यक्त केली आहे.
हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये
अनुसुचित जमाती बांधवाना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी बलिदान दिलेल्या स्व. मंगेश गावकर व स्व. दिलीप वेळीप या समाजबांधवांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नये. त्यांचे बलिदान कायम स्मरणात ठेवून त्यापासून समाजहितासाठी प्रेरणा घ्यावी. तसेच आंदोलनानंतर तुरूंगवास भोगलेल्या पाच सदस्यांचे योगदान कायम स्मरणात ठेवून स्फूर्ती घ्यावी, असे उटाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी काढले. बाळ्ळी येथील आंदोलनाच्या उठाच्या चळवळीत प्राणाची आहुती दिलेल्या समाजबांधवाच्या स्मृतिदिन ‘प्रेरणा दिन’ म्हणून पाळण्यात येतो याचे भान समाजबांधवांनी कायम राखावे, असे आवाहन केले.
बांधवांना आदिवासी प्रज्ञावंत पुरस्कार
यावेळी कृषीमंत्री रवी नाईक यांच्याहस्ते आदिवासी प्रज्ञावंत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी गाळवाडा-प्रियोळ येथील डॉ. अशोक प्रियोळकर, क्रीडा क्षेत्रातील योगदानासाठी बार्से केपे येथील मॉर्डन पॅन्टथ्लॉनपटू सुरज दत्ता वेळीप, कृषी क्षेत्रातील योगदासाठी धारबांदोडा येथील महिला शेतकरी सुशिला संतोष गावडे तसेच सामाजिक योगदानासाठी पाडी-बार्से, केपे येथील मालू थुलो वेळीप यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व मानचिन्ह प्रदान करून मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
मान्यवरांतर्फे दीप प्रज्ज्वलनानंतर स्व. मंगेश गावकर व स्व. दिलीप वेळीप यांच्या तसबिरीला पुष्प अर्पण करून आदरांजी वाहिली. तसेच दोन मिनिट स्तब्धता पाळण्यात आली. यावेळी आदिवासी कल्याण खात्याच्या ‘सिटीजन चार्टर’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तत्पुर्वी आक्रोश या लघुपटाचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाची सुरूवात कुर्टी फेंडा येथील जागोर पथकातर्फे नमन घालून करण्यात आली. संचालक दीपक देसाई यांनी स्वागत केले. वासुदेव गावकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन योगिनी आचार्य यानी तर उपसंचालक सागर वेर्लेकर यानी आभार मानले. राज्यभरातील काणकोण ते पेडणेपर्यंतचे एसटी समाजबांधव मोठ्या संख्येने प्रेरणा दिनाला उपस्थित होते.