For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीत काँग्रेसला केवळ एक जागा देणार; आम आदमी पक्षाची घोषणा

06:26 AM Feb 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीत काँग्रेसला केवळ एक जागा देणार  आम आदमी पक्षाची घोषणा
Advertisement

 योग्यवेळेत प्रतिसाद न मिळाल्यास उमेदवारांची घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लोकसभा निवडणूक नजीक येताच विरोधी पक्षांची आघाडी इंडियातून एक-एक राजकीय पक्ष बाहेर पडू लागला आहे. ममता बॅनर्जी, नितीश कुमार आणि जयंत चौधरी यांनी झटका दिल्यावर आता दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने देखील जागावाटपावरून लक्ष्मणरेषा आखली आहे.

Advertisement

दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाने काँग्रेसकरता दिल्लीत केवळ एक मतदारसंघ सोडण्याची ऑफर दिली आहे. आम्ही काँग्रेसकरता दिल्लीत केवळ एक मतदारसंघ सोडू शकतो. आम आदमी पक्ष उर्वरित 6 जागा लढविणार असल्याचे वक्तव्य आप नेते संदीप पाठक यांनी केले आहे.

काँग्रेसकडून या प्रस्तावावर योग्यवेळेत प्रतिसाद न मिळाल्यास आम आदमी पक्ष सर्व 6 जागांवरील उमेदवारांची घोषणा करणार असल्याचे पाठक यांनी स्पष्ट केले आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये इंडिया आघाडी टिकणार का याबद्दल साशंकता निर्माण झाली असताना आम आदमी पक्षाने ही भूमिका मांडली आहे. काँग्रेसकडून दिल्लीत कन्हैया कुमार आणि उदित राज यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप सर्वेसर्वा केजरीवाल यांनी जागावाटपावरून अलिकडेच एका जाहीर सभेत महत्त्वाचे वक्तव्य केले होते. दिल्लीच्या जनतेने लोकसभेच्या सर्व 7 जागा आम आदमी पक्षाला देण्याचा निर्धार केला असल्याचे त्यांनी म्हटले होते. तर त्यापूवीं पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यातील सर्व 13 तसेच चंदीगडच्या मतदारसंघात आम आदमी पक्ष विजयी होणार असल्याचा दावा केला होता. भगवंत मान आणि केजरीवाल यांच्या या वक्तव्यांनंतर पंजाब तसेच दिल्लीत इंडिया आघाडी टिकणार नसल्याची चर्चा सुरू झाली होती. काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते आघाडीच्या विरोधात आहेत.

मागील काही दिवसांमध्ये इंडिया आघाडीला तीन मोठे झटके बसले आहेत. सर्वप्रथम पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस स्वबळावर लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. यानंतर विरोधी पक्षांच्या एकजुटतेसाठी पुढाकार घेतलेलया नितीश कुमारांनी इंडिया आघाडीला रामराम ठोकत रालोआत प्रवेश केला होता. तर उत्तरप्रदेशातील रालोदने देखील रालोआत सामील होण्याचे पाऊल उचलले आहे.

गुजरातमधील उमेदवाराची घोषणा

आप नेत्याने यावेळी गुजरात तसेच गोव्यातील उमेदवारांची घोषणा केली आहे. गुजरातच्या भरूच येथे चैतर वसावा तर भावनगर मतदारसंघात उमेश भाई हे आप उमेदवार असणार आहेत. भरूच मतदारसंघात काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांची कन्या निवडणूक लढविणार आहे. अहमद पटेल यांच्या कन्येला भरूच येथे कुठलाच जनाधार नाही, त्या दिल्लीत राहतात, या मतदारसंघात काँग्रेस सातत्याने पराभूत होत आहे. तर चैतर वसावा यांचा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. याचमुळे येथे आम्ही आमचा उमेदवार उभा करत आहोत. आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये केवळ 8 जागा मागितल्या असून तेथे आमचे उमेदवार उभे केले जाणार आहेत असे आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.