For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘लाक्षागृहा’वरही हिंदूंचाच अधिकार! बागपत न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

06:47 AM Feb 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘लाक्षागृहा’वरही हिंदूंचाच अधिकार  बागपत न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Advertisement

वृत्तसंस्था / बागपत

Advertisement

महाभारत काळातील ‘लाक्षागृहा’च्या भूमीवरही हिंदूंचाच अधिकार आहे, असा महत्वपूर्ण निर्णय उत्तर प्रदेशातील बागपत येथील जिल्हा न्यायालयाने दिला आहे. हे प्रकरण न्यायालयात साधारणत: 54 वर्षे प्रलंबित होते. सोमवारी जिल्हा न्यायालयात या प्रकरणाचा निर्णय होऊन ते धसास लागले आहे.

महाभारत काळात याच भूमीत वनवासास गेलेल्या पांडवांना जाळून मारण्याचा प्रयत्न दुर्योधनाने केला होता. यासाठी त्याने येथे ज्वालाग्रही असलेल्या लाखेपासून एक वसतीस्थान निर्माण केले होते. पांडव आपली माता कुंती हिच्यासह येथे रहावयास आल्यानंतर या लाक्षागृहाला आग लावण्याची त्यांची योजना होती. त्यानुसार पांडव तेथे वास्तव्यास गेले होते. लाक्षागृह जाळण्यातही आले होते. तथापि, सर्व पांडव कुंती आणि द्रौपदीसह सुरक्षितरित्या सुटका करुन घेण्यात यशस्वी झाले होते, असा इतिहास महाभारतात सांगण्यात आला आहे.

Advertisement

मुस्लिमांचे अतिक्रमण

नंतर मुस्लिमांच्या काळात त्यांनी या भूमीवरील हिंदूंचे मंदिर पाडवून ती भूमी आपल्या ताब्यात घेतली होती. तेथे शेख बद्रुद्दिन यांच्या नावाने एका मझारीचे बांधकामही साधारणत: 400 वर्षांपूर्वी करण्यात आले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मझारीपूर्वी या स्थानी असणाऱ्या लाक्षागृह गुरुकुलाचे वंशपरंपरागत व्यवस्थापक ब्रम्हचारी कृष्णदत्त महाराज यांनी पुन्हा या भूमीत गुरुकुल स्थापन केले होते. मात्र, ही जागा वक्फ मंडळाची आहे, असा दावा करीत मुस्लीम पक्षकार न्यायालयात गेले होते. मुस्लीम पक्षकारांनी कृष्णदत्त महाराज यांना या प्रकरणात प्रतिवादी केले होते. हे प्रकरण जिल्हा न्यायालयात 54 वर्षे प्रलंबित होते.

उत्खननात हिंदू धर्माची चिन्हे

न्यायालयाच्या आदेशावरून या भूमीत पुरातत्व विभागाने उत्खनन केले होते. या उत्खननात महाभारतकालीन हिंदूंच्या वास्तूचे अवशेष आणि धार्मिक चिन्हे आढळून आली होती. यावरुन येथे पुरातन काळी हिंदूंची वास्तू आणि हिंदूंचा वावर असल्याचे सिद्ध झाले होते. मुस्लिमांच्या म्हणण्यानुसार ही जागा मझारीची होती.

न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

जवळपास 54 वर्षांनंतर या प्रकरणाचा आता निर्णय झाला आहे. पुरातत्व विभागाचे सर्वेक्षण, इतर ऐतिहासिक संदर्भ आणि शोधण्यात आलेल्या इतर पुराव्यांच्या आधारे बागपत येथील जिल्हा न्यायालयाने या भूमीवर हिंदूंचाच अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे 1970 पासून प्रलंबित असलेले हे प्रकरण आता कनिष्ठ न्यायालयात हातावेगळे करण्यात आले आहे. मात्र, मुस्लीम पक्षकारांनी या निर्णयाला विरोध केला असून उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयात आता काय होणार याकडे हिंदू आणि मुस्लीम पक्षकारांचे, तसेच समाजांचेही लक्ष लागले आहे.

1952 मध्येही उत्खनन

या भूमीवर 1952 मध्येही भारतीय पुरातत्व विभागाने उत्खनन केले होते. त्यात हिंदू वास्तूचे अनेक अवशेष मिळाले होते. ते साधारणत: 4 हजार वर्षांपूर्वीचे असल्याचेही त्यावेळी स्पष्ट करण्यात आले होते. हा काळ महाभारताचाच मानला जातो. त्यामुळे महाभारत ही कपोलकल्पि कथा नसून तो इतिहास आहे, असे मत अनेक पुरातत्व तज्ञांनी त्यावेळी व्यक्त केले होते. अलिकडच्या काळातही या पुराव्यांची चर्चा अधून मधून होत असते. आता न्यायालयाच्या निर्णयामुळे या भूमीवर हिंदूंचा अधिकार प्रस्थापित झाला असून मुस्लिमांचा या जागेवरील दावा फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे अयोध्येतील रामजन्मभूमी, वाराणसीतील शिवभूमी आणि मथुरेतील कृष्णजन्मभूमीपाठोपाठ लाक्षागृहाचीची चर्चा केली जात आहे.

Advertisement

.