चांगल्या व्यक्तींचीच निवड करावी
मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीय जनतेला आवाहन : गोवा विधानसभेचे आज 61 व्या वर्षात पदार्पण
पणजी : गोवा विधानसभेला 60 वर्षे पूर्ण होणे आणि त्याचवेळी आपण या राज्याचा मुख्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळतोय याबद्दल आपल्याला ज्यांनी विधानसभेवर पाठविले त्या सांखळीकर जनतेचा आपण मन:पूर्वक आभारी आहे. जनतेने यानंतरही चांगल्या व्यक्तींची गोवा विधानसभेवर निवड करावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीय जनतेला केले आहे. गोवा विधानसभा आज गुरुवारी 61 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. गोवा विधानसभेच्या 60 वर्षांच्या कारकिर्दीवर भाष्य करताना दै. तरुण भारतशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी वरील आवाहन केले.
सारे श्रेय सांखळीच्या मतदारांना
डॉ. प्रमोद सावंत यांनी पुढे सांगितले की आतापर्यंतच्या 60 वर्षात गोव्याच्या विकासात अनेकांनी फार मोठे योगदान दिले आहे. गोवा विधानसभा म्हणजे लोकशाहीतील सर्वात उच्च असे पवित्र मंदिर आहे, असे आपण मानतो. माझ्या सुदैवाने या विधानसभेवर निवडून आलो. त्यानंतर सभापती देखील झालो. आता मुख्यमंत्रीपदी आहे. याचे सारे श्रेय सांखळीतील माझ्या मतदारांना जाते व त्यांचे आपण आभार मानतो.
विकासाबरोबर अस्मिता टिकविली
लोकशाहीच्या या पवित्र मंदिराने गेल्या 60 वर्षात गोव्याच्या विकासासाठी फार मोठे कार्य केलेले आहे. त्यातून गोव्याची अस्मिता टिकविण्याचे कार्यही लोकप्रतिनिधींनी केलेले आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करतो. गेली 60 वर्षे गोव्याला पुढे नेणाऱ्या या विधानसभेने दर्जेदार कार्य केले.
काही लोकप्रतिनिधींचा दर्जा घसरतोय
अलिकडे मात्र काही लोकप्रतिनिधींचे कार्य भरकटलेले दिसतेय. दर्जा तथा स्तर खालावला जातोय. याबद्दल आपल्याला चिंता वाटते, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. म्हणूनच आपण या 60 व्या वर्धापन दिनानिमित्त गोमंतकीय जनतेला चांगल्या लोकप्रतिनिधींची निवड करा असे आवाहन करतो.
जनता भाजपच्याच पाठिशी राहील
गोवा विकासात सर्वात पुढे आहे. गोमंतकीय जनतेने भाजपच्या बाजूने राहून गोव्याला राजकीय स्थैर्य प्राप्त करून दिले. जनता यानंतरही भाजपच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, अशी आशाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली.
प्रतापसिंह राणे यांचे मोठे योगदान
एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रतापसिंह राणे यांच्या गोवा विभानसभेसाठीच्या योगदानाचा गौरवपूर्व उल्लेख केला. सलगपणे 50 वर्षे विधानसभेवर निवडून येणे ही सोपी गोष्ट नाही. त्यांचे कार्यच तसे मोठे आहे. त्यांचे राजकारणही दर्जेदार होते. आजच्या काळात राजकारणात टिकणे फार कठीण काम आहे. आज अनेकजण वयाच्या 40 नंतरच विधानसभेत पोहोचतात. त्यामुळे अशी माणसे वा असे नेते 50 वर्षे सोडाच किती वर्षे राजकारणात टिकतात हे पहावे लागेल. मात्र भाऊसाहेब बांदोडकरांच्या काळापासून प्रतापसिंह राणे हे अलिकडेपर्यंत राजकारणात सातत्याने टिकून राहिले आणि विधानसभेत सातत्याने कार्यरत राहिले, अशा शब्दात डॉ. प्रमोद सावंत यांनी राणे यांच्याबाबत गौरवोद्गार काढले.