For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केवळ स्वप्ने पाहून मते मिळत नाहीत

12:19 PM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
केवळ स्वप्ने पाहून मते मिळत नाहीत
Advertisement

सदानंद तानावडे यांचा काँग्रेसला चिमटा : भाजपचा ’निवडणूक प्रचार रथ’ रवाना

Advertisement

पणजी : केवळ स्वप्ने पाहून आणि पत्रकार परिषदा घेऊन मते मिळत नाहीत. त्यासाठी जनसंपर्क हवा, कार्यकर्त्यांनी झटायला हवे, लोकांची तसेच राज्याच्या विकासाचीही कामे केली पाहिजेत, काँग्रेसला हे कधीच जमलेले नाही. भाजपने ते करून दाखविले आहे. म्हणुनच आत्मविश्वासाने आम्ही दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा आणि प्रचंड मताधिक्क्याचा दावा करत आहोत, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजपकडून उत्तर आणि दक्षिण गोव्यात उमेदवारांचा प्रचार प्रारंभ झाला आहे. त्याचाच भाग म्हणून शुक्रवारी पणजीत काढण्यात आलेल्या निवडणूक प्रचार रथाला (व्हिडिओ व्हॅन) हिरवा झेंडा दाखविल्यानंतर ते बोलत होते. पर्यटनमंत्री रोहन खंवटे, उपाध्यक्ष दत्तप्रसाद खोलकर यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

खलपांनी डिपॉझिट राखण्याचा विचार करावा

Advertisement

तानावडे यांनी काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांच्या काही वक्तव्यांचा जोरदार समाचार घेतला. खलप यांनी भाजपच्या आमदारांना निवडून आणल्याच्या बाता मारू नयेत. त्यांनी अगोदर स्वत:ची जागा सुरक्षित करावी. त्याचबरोबर डिपॉझिट कसे राखता येईल याचाही विचार करावा. खलपांमुळे भाजपचे कुठलेच आमदार निवडून आलेले नाहीत, असे ते म्हणाले.

काँग्रेस पाहतेय सत्तेची दिवास्वप्ने

काँग्रेस सध्या सत्तेची दिवास्वप्ने पाहात आहे. याऊलट भाजपने विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू केला. एवढे असुनही अद्याप आम्ही गोव्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकलेलो नाहीत. अशा परिस्थितीत ऐनवेळी निवडणुक रिंगणात उतरलेले काँग्रेसचे उमेदवार सर्व मतदारसंघात पोहोचणे शक्यच नाही. कारण तोपर्यंत निवडणुकीचा दिवससुद्धा सरून गेलेला असेल, असा चिमटा तानावडे यांनी काढला.

23 पर्यंत ‘प्रचार रथांचा’ पहिला टप्पा

भाजपचे दोन्ही प्रचार रथ उत्तर आणि दक्षिण गोव्यातील विविध मतदारसंघात फिरणार आहेत. त्यांची सुऊवात उत्तर गोव्यात मांद्रेतून तर दक्षिणेत फोंडा मतदारसंघातून होणार आहे. या रथांच्या माध्यमातून मोदी सरकारची विकासकामे, विविध योजना यासंबंधी माहिती जनतेला मिळणार आहे. 23 एप्रिलपर्यंत या प्रचार रथांचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे, असे तानावडे यांनी सांगितले. दरम्यान, भाजपचे उत्तर आणि दक्षिण गोवा उमेदवार दि. 16 एप्रिल रोजी उमेदवारी दाखल करणार असल्याचे तानावडे यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.