ऑनलाइन विक्री 11 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचणार
स्ट्रटेजिक ऍडव्हायझरी फर्म रेडसीर यांच्या अहवालामधून अंदाज- सणासुदीच्या काळातील अंदाज
वृत्तसंस्था /मुंबई
ई-कॉमर्स कंपन्यांना या वर्षीच्या सणासुदीच्या काळात विक्रीमध्ये वार्षिक 28 टक्के वाढ होऊन 11.8 अब्ज डॉलरपर्यंत उलाढाल पोहोचण्याची शक्यता आहे. रेडसीरने एका अहवालात हे गृहीत धरले आहे.
स्ट्रटेजिक ऍडव्हायझरी फर्म रेडसीरने आपल्या अहवालात म्हटले आहे, की 2018 च्या तुलनेत यावर्षी सणासुदीच्या काळात ऑनलाईन खरेदीदारांची संख्या दुप्पट होण्याचे संकेतही व्यक्त केले आहेत.
अहवालानुसार, सणाचा हंगाम देशभर सुरू झालेला आहे. त्यामुळे, या अहवालातील अंदाज आहे की सणासुदीच्या महिन्यात ऑनलाईन विक्री 11.8 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 28 टक्क्यांनी जास्त राहणार असल्याचा दावाही यामध्ये केला आहे. सणासुदीच्या पहिल्या आठवडय़ातच 5.9 अब्ज डॉलर्सचा व्यवसाय होण्याचा अंदाज बांधला जात आहे. आगामी काळात दसऱयासह दिवाळीचा मोठा सण साजरा होणार आहे. दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त वातावरणात उत्सव साजरे होत असल्याने खरेदीत मोठी वाढ अपेक्षीत आहे. त्याकरीता ई-कॉमर्स कंपन्यांनी जय्यत तयारी करायला सुरुवात केली असल्याचे समजते.
अहवालात म्हटले आहे की सणासुदीच्या अगोदरच वेगवेगळय़ा श्रेणी विविध पद्धतीने विकसित होत आहेत. यामध्ये या वर्षी फॅशन श्रेणीत ऑनलाइन खरेदी टियर-2 शहरांमध्ये अधिक वाढताना दिसणार आहे. मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक विभागातील विक्रीही सणासुदीच्या काळात वेगाने वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. स्ट्रटेजी कन्सल्टंट्सचे असोसिएट पार्टनर संजय कोठारी म्हणाले, ‘ऑनलाईन खरेदीदारांची संख्या 2018 च्या तुलनेत जवळपास चार पटीने वाढली आहे.’