For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑनलाईन दरोड्यांमुळे सायबर पोलीस ठाण्यांची गरज वाढली

06:16 AM Oct 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
ऑनलाईन दरोड्यांमुळे सायबर पोलीस ठाण्यांची गरज वाढली
Advertisement

गेल्या पाच-सहा वर्षात देशात ‘रोकड’विना ऑनलाईन आर्थिक व्यवहारांचे प्रमाण खूप वाढले आहे. ऑनलाईन व्यवहारांची व्याप्ती पाहून ऑनलाईन दरोडेखोरही तयार झाले आहेत. ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये ते दिवसेंदिवस भर घालत आहेत. ऑनलाईन फसवणुकीचा हा वाढता धोका पाहता रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात त्यावर बोलत सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले.कोकणातही ऑनलाईन फसवणुकीचे गुन्हे वाढल्याचे दिसून येते.  काही वर्षांपूर्वी जशी सागरी सुरक्षेच्या दृष्टीने देशात सागरी पोलीस ठाणी सुरू झाली, तशाच प्रकारे भविष्यात प्रत्येक तालुक्यात सायबर पोलीस ठाणे उभारले गेल्यास आश्चर्य वाटू नये.

Advertisement

काही वर्षांपूर्वी दरोडा टाकणाऱ्या मोठमोठ्या टोळ्या कार्यरत होत्या. हातात हत्यारे घेऊन या टोळ्या लोकांना धमकावत व लूटमार करत असत. परंतु आजकाल तंत्रज्ञानामुळे दरोड्यांची पद्धत बदलली आहे. मस्तपैकी एसीमध्ये बसून ऑनलाईन पद्धतीने पूर्वीपेक्षा मोठे दरोडे घातले जात आहेत. ऑनलाईन फसवणूक हा खरेतर मानवी ‘मोहाचा बोनस’ आहे. ‘सावधगिरी’ने त्याचा बिमोड करता येऊ शकतो. ऑनलाईन फसवणूक झाल्यास पुढील तीन तास (गोल्डन अवर्स) हे खूप महत्त्वाचे असतात. वेळीच फसवणुकीची माहिती बँक अथवा पोलिसांना प्राप्त झाल्यास आरोपींच्या बँकेचे व्यवहार थांबविता येऊ शकतात. त्यासाठी संबंधिताने तत्काळ 1930 या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार नोंदवायला हवी. एनसीसीआरपी या पोर्टलवरही तुम्ही तक्रार दाखल करू शकता. यामध्ये ‘फायनान्शिअल फ्रॉड’ असा ऑप्शन निवडल्यास आपली बँक खात्यावर असलेली रक्कम रोखून धरली जाते आणि यातून होणारे आर्थिक नुकसान थांबविता येते. आज सायबर गुन्ह्यांना कोणत्याही देशाच्या सीमा राहिलेल्या नाहीत. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून एखादी व्यक्ती आपली फसवणूक करू शकते. कारण आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल इंटरनेटचे विश्व आले आहे. बदलत्या काळानुसार ऑनलाईन व्यवहार करण्याकडे लोकांचा अधिक कल दिसून येतो. मात्र, हे सर्व करत असताना आपल्यावर कुणीतरी लक्ष ठेवून आहे, याची आपणाला कल्पना नसते आणि यातूनच पुढे ऑनलाईन फसवणूक, ब्लॅकमेलिंगसारखे प्रकार घडतात. यावर प्रत्येकाने सतर्कता बाळगणे, जागरुक राहणे हाच एकमेव पर्याय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा ऑनलाईन सायबर फसवणूक टाळण्यासाठी ‘थांबा-विचार करा-कृती करा’ असा मंत्र देशवासीयांना दिला आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करता मागील पाच वर्षात पाच कोटी रुपयांहून अधिकची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. 2024 मध्ये जुलैपर्यंत पहिल्या सात महिन्यात 61 सायबर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये महिलांविषयक आठ, चाईल्ड पोर्नोग्राफी 18, शेअर मार्केट ट्रेडिंगसंबंधी सात अशा ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यांमधील रकमेचा आकडा हा 2 कोटी 18 लाख 69 हजार 351 रुपये इतका होता. 2023 मध्ये एकूण 78 गुन्हे दाखल झाले होते. त्यामध्ये 54 गुन्हे हे आर्थिक स्वरुपाचे असून त्यामध्ये 1 कोटी 6 लाख 21 हजार 821 रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले होते. दोन महिन्यांपूर्वी चंदीगढमधील एका तरुणीने अनोळखी व्यक्तीशी मैत्री केली अन् त्याला भेटण्यासाठी ती रेल्वेने थेट रत्नागिरीपर्यंत आली. येथे आल्यावर आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. स्थानिकांनी पोलिसांशी संपर्क साधून तिला नातेवाईकांच्या स्वाधीन केले. गतवर्षी ऑनलाईन सेक्सटॉर्शनला बळी पडून रत्नागिरी जिल्ह्यातील एका तरुणाने आत्महत्या केल्याची बाब समोर आली होती. ‘डिजिटल अरेस्ट’सारखे एक प्रकरणही घडले होते. ज्यामध्ये एका परजिल्ह्यातील व्यक्तीने ‘मी पोलीस बोलतोय. तुमच्या माणसाकडे बंदूक सापडून आलीय. त्याची अटक टाळायची असल्यास अमूक एवढी रक्कम पाठवा’, असे मोबाईल कॉलवरून सांगितले होते. परंतु संबंधित व्यक्तीने आपल्या सतर्कतेने ऑनलाईन दरोडेखोराचा हा ‘डिजिटल अरेस्ट’चा प्रयत्न पोलिसांच्या मदतीने हाणून पाडला होता. यावरून सायबर गुन्ह्यांची पद्धत दिवसेंदिवस बदलत असल्याचे दिसून येते.

Advertisement

फ्रॉड करणारे मानसशास्त्राचा अचूक अभ्यास करत असतात. लोकांना बोलण्यात गुंतवून एकप्रकारे ते त्यांना संमोहित करतात. यातून आपल्याला हवी ती माहिती ते लोकांकडून मिळवितात. ऑनलाईन फसवणुकीसाठी सातत्याने ते वेगवेगळ्या प्रकारांचा अवलंब करतात. तुम्हाला ‘कौन बनेगा करोडपती’मधून ऑफर आली आहे, ‘तुम्हाला मोठे बक्षीस लागले आहे’, ‘तुमचे एटीएम ब्लॉक झाले आहे’, ‘तुमचे बँक खाते केवायसी करायचे आहे’, असे विविध फंडे वापरून लोकांना फसवले जाते. अलीकडे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून लाखो रुपये नफा कमावून देण्याचे आमिष दाखवले जाते. सुरुवातीला तुमच्या सोशल मीडियावर शेअर मार्केटसंबंधी जाहिरात पाठवून मग तुम्हाला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न सुरू होतो. तुम्हाला एखाद्या ग्रुपमध्ये समाविष्ट करून मग कसे त्या ग्रुपमधील लोक लाखो रुपये कमावतात, हे सांगितले जाते. प्रत्यक्षात हा टोळीचा बनाव असतो. जो फसवणूक झाल्यानंतर लक्षात येतो. त्यामुळे अशाप्रकारे गुंतवणूक करताना त्यातील सत्यता पडताळून पाहणे अत्यंत गरजेचे असते. दोन महिन्यांपूर्वी रत्नागिरी पोलिसांनी शेअर मार्केट संदर्भातील एका गुन्ह्याचा यशस्वी तपास करत संशयितास बेंगळूरमधून ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यात संशयिताने 17 जणांना सुमारे सहा कोटीचा गंडा घातला होता.

एकूणच ऑनलाईन फसवणुकीची प्रकरणे तपासली तर अधिक पैसे मिळविण्याचा मोह सर्व प्रकारांना कारणीभूत ठरतो. कोणतीही गोष्ट आपल्याला फुकट मिळत नसते, हे आपण जाणून घेतले पाहिजे आणि जे फुकट मिळतेय त्यामध्ये काही ना काहीतरी गडबड आहे, हे जाणल्यास आपली फसवणूक टळू शकते. मोबाईलवरून बोलणाऱ्या अनोळखी व्यक्तीला आपण वैयक्तिक माहिती किती द्यायची, हासुद्धा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आपल्या बँक खात्याची माहिती कुणालाही सांगू नका, असे वारंवार आवाहन बँक अथवा पोलिसांकडून करण्यात येते. तसेच ऑनलाईन फसवणुकीच्या विविध गुन्ह्यांच्या बातम्या वर्तमानपत्रात येत असतात. असे असताना लोक सायबर गुन्ह्यांना बळी पडत आहेत. विशेषकरून पोर्नोग्राफी हा अत्यंत गंभीर प्रकार असून यातून होणाऱ्या ब्लॅकमेलिंगसारख्या प्रकारामुळे आत्महत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे समाजमाध्यमांवर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आपले फोटो, वैयक्तिक माहिती उघड करणे टाळले पाहिजे. फसवणूक करणारे गरीब कुटुंबातील लोकांना टार्गेट करतात. त्यांच्या नावे सीमकार्ड बनवून ते कॉल करतात. फसवणुकीचे पैसे जमा करण्यासाठी गरीब कुटुंबातील व्यक्तीच्या नावे बँक खाती उघडली जातात. याला ‘म्यूल’ खाते असे म्हणतात. पैसे मिळविण्यासाठी पोलीस खातेदारांपर्यंत पोहोचतात तेव्हा हे खाते एखाद्या गरीब व्यक्तीचे असल्याचे उघड होते. ज्याचा या सर्व प्रकारांशी काही संबंध नसतो. पोलीस आपल्या परीने जगजागृतीपर कार्यक्रम आयोजित करून लोकांना सतर्कतेचे आवाहन करतात. त्यांचे हे प्रयत्न मानवी मोहापुढे अपुरे पडतात, हेच दाखल होत असलेल्या गुन्ह्यांमधून स्पष्ट होते.

महेंद्र पराडकर

Advertisement
Tags :

.