For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एपीएमसी बाजारात कांदा, रताळी, बटाटा भाव स्थिर

06:33 AM Jan 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
एपीएमसी बाजारात कांदा  रताळी  बटाटा भाव स्थिर
Advertisement

भोगी सण असूनही मोजक्याच भाजीपाला दरात किंचित वाढ : मटारच्या दरातही वाढ

Advertisement

सुधीर गडकरी/ अगसगे

बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कांदा, रताळी यांचा भाव प्रतिक्विंटल स्थिर आहे. तर इंदोर बटाटा, आग्रा बटाटा, तळेगाव बटाटा यांचा भाव प्रतिक्विंटल स्थिर आहे. रविवार दि. 14 रोजी भोगी आणि सोमवारी मकर संक्रांती सण असूनदेखील भाजीमार्केटमध्ये भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत. यामुळे सर्वसामान्यांतून समाधान व्यक्त होत आहे. काही मोजक्या आणि भाजीपाल्याच्या दरात किंचित प्रमाणात दर वाढले आहेत. मटरचा भाव 10 किलोच्या मागे 200 रुपयांनी वाढला आहे. मात्र, भोगी सणाला भाव वाढला नसल्यामुळे शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करीत आहेत.

Advertisement

मागील आठवड्यात शनिवारी कांदा भाव क्विंटलला 1000 ते 2500 रुपये झाला होता. मात्र, इंदोर नवीन बटाटा भाव 1800 ते 2100 रु. तर इंदोर जुना बटाटा भाव 2400 ते 2600 रु., आग्रा बटाटा 1700 ते 1800 रु., तळेगाव बटाटा 1800 ते 2000 रु. झाला होता. तर रताळी भाव 300 ते 1600 रुपये, बुधवार दि. 10 रोजीच्या बाजारात कांदा भाव 800 ते 2000 रु., इंदोर नवीन बटाटा 1500-1800 रु., जुना इंदोर बटाटा भाव 2200 ते 2300 रु., आग्रा बटाटा 1700-1750 रु., तळेगाव बटाटा 1500-1900 रुपये झाला होता. रताळी भाव 250 ते 1300 रुपये झाला होता.

शनिवार दि. 13 रोजी झालेल्या बाजारात कांदा 800 ते 2100 रुपये, आग्रा बटाटा 1500 ते 1700 रुपये, इंदोर नवीन बटाटा भाव 1500 ते 1600 रु., इंदोर जुना बटाटा 2000 ते 2200 रु., तळेगाव बटाटा 1000 ते 2000 रु., रताळी भाव 300 ते 1200 रुपये प्रति क्विंटल भाव झाला आहे.

सर्वसामान्यांना दिलासा

मागील गेल्या तीन-चार महिन्यापूर्वी कांदा भाव 4000 ते 6000 रुपये क्विंटल झाला होता. बटाटा भाव 2300 ते 2700 रुपये झाला होता. तर भाजीपाल्यांचे दरदेखील भडकले होते. यामुळे सर्वसामान्य जनता वाढत्या महागाईने त्रस्त झाली होती. यामुळे गृहिणीचे आर्थिक बजेट कोलमडले होते. सध्या कांदा, बटाटा व भाजीपाल्याचे दर आटोक्यात आल्याने सर्वसामान्यांना थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

इंदोर बटाट्याच्या आवकेत वाढ

सध्या बेळगावात इंदोरहून बटाटा विक्रीसाठी येत आहे. इंदोरमध्ये बटाटा लागवड मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. संपूर्ण देशाला पुरेल इतके उत्पादन इंदोर आग्रा या ठिकाणी घेण्यात येते. इंदोर बटाटा काढणीला सुरुवात होऊन एक महिना झाला आहे. सुरुवातीला बटाटा कचवड व लहान आकाराचा येत असे. मात्र आता पाकड आणि मोठ्या आकाराचा बटाटा विक्रीसाठी मार्केट यार्डमध्ये येत आहे. थोड्या प्रमाणात बटाटा कचवड आहे. पूर्णपणे बटाटा पाकड येण्यास अद्याप एक महिना आहे. त्यावेळी उत्तम दर्जाचा बटाटा शितगृहामध्ये साठवून ठेवण्यात येतो आणि वर्षभर विविध बाजारात मागणीनुसार पाठवण्यात येतो. सध्या बाजारात इंदोर नवीन बटाटा आवक मोठ्या प्रमाणात येत आहे. यामुळे बटाटा भाव प्रतिक्विंटल शंभर रुपयांनी कमी जाला आहे, अशी माहिती बटाटा व्यापाऱ्यांनी दिली.

कांदा भाव स्थिर

गेल्या एक महिन्यापासून महाराष्ट्र कांदा काढणीला प्रारंभ झाला आहे आणि बाजारात विक्रीसाठी शेतकरी घेऊन येत आहेत. सुरुवातीला कांदा कच्चा होता. सध्या थोड्या प्रमाणात वाळलेला कांदा बाजारात विक्रीसाठी येत आहे. महाराष्ट्र कांद्याचे माहेरघर आहे असे मानले जाते. कारण महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. देशभरामध्ये महाराष्ट्र कांदा विक्रीसाठी जात आहे आणि केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर मार्चपर्यंत बंदी घातल्याने कांदा दर आटोक्यात आहे. सध्या कांदा भाव 1000 ते 2100 रुपये क्विंटल असून भाव स्थिर आहे, अशी माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली.

जवारी बटाटा संपला

बेळगाव-खानापूर तालुक्यातील पावसाळ्यामध्ये लागवड केलेली जवारी बटाट्याचे उत्पादन मागच्या आठवड्यामध्येच संपला आहे. शेवटच्या डिसेंबर महिन्यामध्ये रब्बी हंगामासाठी लागवडीसाठी बटाटा बियाणेसाठी 2000 ते 3000 रुपये क्विंटल दराने शेतकऱ्यांनी खरेदी केला आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून बेळगाव तालुक्यामध्ये रब्बी हंगामातील बटाटा लागवड सुरुवात झाली आहे. सध्या संपूर्णपणे जवारी बटाटा आवक संपली आहे. आणि मार्च महिन्यामध्ये नवीन जवारी बटाटा आवकेला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिली.

रताळी भाव स्थिर

यंदा बेळगाव आणि खानापूर तालुक्यामध्ये रताळी लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. पावसाअभावी रताळी मोठी झाली नाहीत. काही रताळी किडून खराब झाली आहेत. यंदा 60 टक्के रताळी किडकी उत्पादन झाली आहेत. पहिल्या टप्प्यातील ही रताळी आहेत. दुसऱ्या टप्प्यातील रताळी लागवड झाली आहे. या रताळ्यांना परराज्यातील दिल्ली, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, मुंबई, पुणा, महाराष्ट्र, आंधप्रदेशामध्ये विक्रीसाठी पाठवली जातात. सध्या रताळ्याचा भाव 300 ते 1200 रुपये झाली असल्याची माहिती रताळी व्यापाऱ्यांनी दिली.

भोगी, मकर संक्रांती पण भाव स्थिरOnion, potato and yam prices remained stable per quintal

रविवारी भोगी व सोमवारी मकर संक्रांती सण आहे. या सणाला प्रत्येक कुटुंबे वेगवेगळ्या भाजीपाल्या, विशेष म्हणजे कांदा पात, मेथी, लाल भाजी, सोले दाणे, वांगी, गाजर आदी भाजीपाल्याची भाजी बनवून देवांना नैवेद्य करतात. आणि आजुबाजूच्या घरांना देवाण-घेवाण करतात. यामुळे दरवर्षी भोगीला भाजीपाल्याचे दर वाढलेले असतात. मात्र, यंदा भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत. मोजक्या भाजीपाल्यांचा भावांत किंचित वाढ झाल्याची माहिती भाजी व्यापाऱ्यांनी दिली.

Advertisement
Tags :

.