For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कांदा दरात 500 रुपयांची वाढ

11:04 AM Aug 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
कांदा दरात 500 रुपयांची वाढ
Advertisement

एपीएमसीमध्ये बुधवारी कांदा आवकेत घट निर्माण झाल्याने भाव वधारला : यंदा उत्पादनही कमी

Advertisement

वार्ताहर/अगसगे

एपीएमसीमध्ये बुधवारी कांदा आवकेत घट निर्माण झाल्याने कांद्याचा भाव प्रतिक्विंटलला पुन्हा 500 रुपयांनी वधारला. त्यामुळे आता यापुढे कांदा खरेदी करताना सर्वसामान्यांच्या डोळ्यात कांदा नक्की पाणी आणणार आहे. बुधवार दि. 21 रोजीच्या सवालामध्ये कांद्याचा भाव 2700 पासून 4500 रुपयापर्यंत झाला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात 50 ते 60 रुपये किलोप्रमाणे कांदा विक्री सुरू आहे. त्यामुळे आता काही खाद्यपदार्थांतून कांदा गायब होण्याची शक्यता आहे. हॉटेल आणि मेस आदी ठिकाणी जादा कांदा मागितल्यास एक्स्ट्रा बिल लावण्यात येणार आहे. महाराष्ट्रामध्ये कांद्याच्या आवकेत दिवसेंदिवस घट निर्माण होत आहे. मागील दोन तीन महिन्यापासून कांदा दर 2500 रुपये ते 3200 रुपयांपर्यंत होता. मात्र बुधवार दि. 14 रोजी कांदा दरात वाढ होऊन 3500 पासून 4000 हजारपर्यंत झाला आणि तोच भाव शनिवार दि. 17 रोजी टिकून राहिला. त्यामुळे आता कांदा भाव स्थिर राहणार, अशी चर्चा खरेदीदार व व्यापाऱ्यांतून होती. मात्र 21 रोजी आवकेत पुन्हा घट निर्माण झाल्यामुळे देशभरात कांदा दरात वाढ झाल्याने याचाच परिणाम बेळगाव एपीएमसीवर झाला आणि क्विंटलला पुन्हा पाचशे ऊपयांनी वाढ झाली. मागील वर्षी 4000 पासून ते 6500 पर्यंत क्विंटलला भाव झाला होता. त्यामुळे कांद्याने सर्वसामान्य जनतेच्या बजेटवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. त्याचीच पुनरावृत्ती यंदासुद्धा होणार काय, अशी चर्चा व्यापारी व खरेदीदारांतून सुरू आहे.

Advertisement

कांदा लागवडीत घट

पाच वर्षांपूर्वी कांदा उत्पादन कर्नाटकासह महाराष्ट्रमध्ये मोठ्या प्रमाणात घेण्यात येत होते. उत्पादनदेखील अधिक प्रमाणात मिळत होते. त्यामुळे कांद्याला म्हणावा तसा भाव मिळत नव्हता. कांदा उत्पादनासाठी रासायनिक खते, औषधांचा मोठा खर्च येतो व काढणीलाही मजुरी जास्त लागते. तरीदेखील कांद्याला योग्य भाव मिळत नव्हता. म्हणून कांद्याला योग्य भाव मिळावा म्हणून शेतकऱ्याने अनेकवेळा कांदा रस्त्यावर टाकून आंदोलने केली. मात्र राज्य व केंद्र सरकारने याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे कर्नाटकातील शेतकरी वर्ग ऊस उत्पादनाकडे वळला. केवळ 40 टक्के शेतकरी कांदा लागवड करीत आहेत. यामुळेच शेतकऱ्यांनी कांदा उत्पादन घेणे कमी केले आहे.

बुधवारी झालेला कांद्याचा भाव प्रतिक्विंटल

  • गोळी-  2700 ते 3000 रुपये
  • मिडीयम-3700 ते 4000 रुपये
  • मोठवड- 4000 ते 4300 रुपये
  • गोळा-  4350 ते 4500 रुपये
Advertisement
Tags :

.