कांदा वधारला, टोमॅटो घसरला : भाजीपाला दर स्थिर
टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका : आवक कमी, ग्राहकांची मागणी वाढल्यामुळे कांदा दरात वाढ
सुधीर गडकरी / अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कांदा दर प्रत्येक क्विंटलला पाचशे रु पयांनी वधारला. त्यामुळे पुन्हा सर्वसामान्यांच्या बजेटवर भर पडणार आहे. आग्रा, तळेगाव, इंदोर बटाटा भाव स्थिर आहे. रताळी दर देखील क्विंटलला स्थिर आहे. भाजी मार्केटमध्ये भाजीपाल्यांचा दर स्थिर आहे. मात्र, टोमॅटोच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. मागील शनिवार दि. 11 रोजीच्या एपीएमसीच्या बाजारात कांदा दरात घसरण झाली होती. यावेळी कांदा भाव
प्रतिक्विंटल 2000 ते 3200 ऊपये क्विंटल भाव झाला होता. मंगळवारी मकर संक्रांती असल्यामुळे बुधवार दि. 15 रोजी मार्केट यार्डमध्ये कांदा आवकेत मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली होती. त्यामुळे कांदा दर 2000 ते 3500 रु पये झाला होता. काल शनिवारी 18 रोजी देखील कांदा आवक कमी झाल्यामुळे आणि परराज्यात मागणी असल्यामुळे. कांदा भाव पुन्हा 500 रु पयानी वाढला. यावेळी कांदा दर 2000 ते 4000 हजार रुपये क्विंटल भाव झाला. यामुळे यंदा कांद्याचा दर कमी होण्याची शक्यता कमी आहे.
दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये कांद्याचा भाव क्विंटलला 800 पासून 2000 पर्यंत असतो. मात्र यंदा 4000 रुपयेपर्यंत दर टिकूनच आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक बजेटवर तसेच हॉटेल व्यावसायिकावरही याचा मोठा परिणाम झाला आहे.
शनिवारी मार्केट यार्डमध्ये महाराष्ट्र कांदा 2000 ते 4000 रुपये, पांढरा 2000 ते 3500 रुपये इंदोर बटाटा 2000 ते 2400 रुपये आग्रा बटाटा 1500 ते 1800 तळेगाव 1800 ते 2100 रुपये भाव झाला असल्याची माहिती कांदा व्यापारी महेश कुगजी यांनी दिली.
रताळी सात हजार पिशव्या आवक
सध्या सौंदत्ती रेणुका देवीचे यात्रा सुरू असल्याने बेळगाव तालुक्यामधून यल्लम्मा देवीचे भक्त मोठ्या प्रमाणात सौंदत्तीला टप्प्याटप्प्याने रवाना झाले आहेत. त्यामुळे तालुक्यातील रताळी काढणे संत गतीने सुरू आहे. त्यामुळे रताळी आवक कमी प्रमाणात आहे. मागील आठवड्यात 32000 पिशव्या रताळ्याची आवक झाली होती. काल शनिवारी केवळ सात हजार पिशव्या आवक झाली आहे. ही रताळी देशातील विविध बाजारात निर्यात केली जातात. याचा भाव आजच्या बाजारात 1400 पासून ते 2000 रुपये प्रतिक्विंटल चालू असल्याची माहिती अडत व्यापारी हेमंत पाटील यांनी दिली.
बटाटा भाव स्थिर
सध्या नवीन इंदोर, आग्रा व तळेगाव बटाटा विक्रीसाठी येत असला तरी तो थोड्या प्रमाणात पाकड आहे. जुन्या इंदोर बटाट्याला देखील ठराविकच खरेदीदार आहेत. इंदोर बटाट्यालाच सर्वत्र मोठ्या प्रमाणात मागणी असते. देशभरातील विविध बाजारात इंदोर बटाटा विक्रीसाठी जात आहे. बेळगाव मध्येदेखील गेल्या एक महिन्यापासून विक्रीसाठी येत आहे. त्याचा भाव स्थिर आहे
जवारी बटाटा आवक बंद
पावसाळ्यातील जवारी बटाटा हळूहळू येत होता. मात्र, गेल्या आठ-दहा दिवसापासून पूर्णपणे बंद झाला आहे. शेवटच्या टप्प्यात रब्बी हंगामासाठी शेतकरीच बियाणे म्हणून ज्वारी बटाटा खरेदी करीत होते. हा बटाटा रब्बी हंगामामध्ये लागवड केल्यानंतर उन्हाळ्यामध्ये याची काढणी होते. या बटाट्याला देखील गोव्यासह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणी असते. विशेष म्हणजे लाल जमिनीतील बटाट्याला सर्वत्र मागणी असते. या बटाट्यालाच खरेदीदार जास्त पसंत करतात. तालुक्याच्या उत्तर भागामध्ये रब्बी हंगामातील बटाटा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. हा बटाटा येण्यास अद्याप 15 ते 20 दिवस लागणार आहेत. या वेळीच तालुक्यातील जवारी बटाटा खवय्यांना मिळणार असल्याची माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिली.