कांदा दरात वाढ : रताळीही 1000 रुपयांनी महागली
बटाटा-लसूण दर स्थिर : भाजीपाला दरही टिकून : टोमॅटो दरात प्रति ट्रे 100 रुपयांची वाढ : आवक घटल्याने दरवाढीचा परिणाम
सुधीर गडकरी/अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कांदा आवकेत घट निर्माण झाल्याने कांद्याचा दर क्विंटलला दोनशे रुपयांनी वधारला. तसेच पांढऱ्या कांद्याचा दरदेखील क्विंटलला तीनशे रुपयांनी वाढला. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे रताळी आवकेत घट निर्माण झाल्यानेच रताळ्याचा दर क्विंटलला एक हजार रुपयांनी वधारला. कर्नाटक कांदा, इंदोर बटाटा, आग्रा बटाटा यांचा दर टिकून आहे. लसूण दरसुद्धा क्विंटलला भाव स्थिर आहे व भाजीमार्केटमध्ये भाजीपाल्यांचे दरसुद्धा टिकून आहेत. मात्र टोमॅटो दरात प्रति ट्रे ला शंभर रुपयांनी वाढ झाली आहे.
शनिवार दि. 24 मे रोजी झालेल्या एपीएमसीच्या बाजारात महाराष्ट्रातून कांद्याच्या सुमारे 50 ट्रक तर कर्नाटकातून सुमारे दहा ट्रक कांदा, पांढऱ्या कांद्याच्या दोन ट्रक विक्रीसाठी दाखल झाले होते. सध्या महाराष्ट्र व कर्नाटकात गेल्या चार पाच दिवसापासून अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे कांद्याची आवक थोड्या प्रमाणात कमी होती. याचा परिणाम दरावर झाला आहे. महाराष्ट्र कांदा भाव क्विंटलला 1200 ते 2200 रुपये, कर्नाटक कांदा दर 1000 पासून 1600 रुपये, पांढरा कांदा भाव 1200 पासून 2100 रुपये झाला व इंदोर बटाटा दर 2300 ते 2500, आग्रा बटाटा भाव 1700 ते 2000 रुपये क्विंटल भाव झाला असल्याची वरील संपूर्ण माहिती व्यापारी महेश कुगजी यांनी दिली.
रब्बी हंगामामध्ये लागवड करण्यात आलेल्या जवारी बटाट्याचे उत्पादन सध्या मंदावले आहे. गेल्या तीन चार महिन्यापासून मार्केट यार्डमध्ये तालुक्यातील व काळ्या जमिनीतील बटाटा मार्केटमध्ये विक्रीसाठी येत होता. या बटाट्याला राज्यासह बेळगाव परिसरात खाण्यासाठी याचा मोठा वापर केला जातो व हा बटाटा चवदार असल्याने याचे वेफर्स बनवण्यासाठी देखील वापर केला जातो. मात्र सध्या तालुक्यातील जवारी बटाटा आवक जवळपास संपत आली असून शनिवारी मार्केट यार्डमध्ये बटाटा आवक पूर्णपणे ठप्प झाली होती, अशी माहिती अडत व्यापारी हेमंत पाटील यांनी दिली
कांदा दरात दोनशे रुपयांनी वाढ
गेल्या तीन चार महिन्यापासून कांद्याचा दर टिकून होता. त्यावेळी कांदा दर 1000 पासून 1800 रुपयेपर्यंत होता. मात्र सध्या कर्नाटक, महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे कांदा साठेबाज व्यापारी कांदा थोड्या प्रमाणात विक्रीसाठी बाहेर काढत आहेत. तसेच शेतकरीही येत्या काही दिवसात कांदा दरात वाढ होणार असल्याचे अंदाज बांधून कांदा कमी प्रमाणात विक्रीसाठी मार्केट यार्डमध्ये आणत आहेत. त्यामुळेच त्याचा परिणाम होऊन मार्केट यार्डमध्ये शनिवारी कांद्याचा भाव क्विंटलला 200 रुपयांनी वाढला आहे, अशी माहिती कांदा व्यापाऱ्याने दिली.
लसूण दर टिकून
सध्या बाजारपेठेमध्ये लसूणचा दर गेल्या एक महिन्यापासून टिकून आहे. यापूर्वी लसूणचा भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. सध्या गेल्या दोन-तीन महिन्यापूर्वीपासून नवीन लसूण आवक बाजारात दाखल झाली आहे. त्यामुळे लसूण उत्पादन देखील उत्तमप्रकारे झाल्याने लसणाचा दर टिकून आहे, अशी माहिती लसूणच्या व्यापाऱ्याने ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
टोमॅटो दरात किंचित वाढ तर इतर भाज्यांचे दर स्थिर
सध्या तालुक्यात पाऊस मोठ्या प्रमाणात पडत आहे. त्यामुळे शेतातील भाजीपाला आवक खराब झाला आहे. यामध्ये कोथिंबीर, मेथी, शेपू, लाल भाजी व इतर भाज्यादेखील थोड्या प्रमाणात पाण्यामुळे खराब होत आहेत. तसेच टोमॅटोदेखील खराब झाले आहेत. त्यामुळेच टोमॅटोचा दर ट्रे मागे शंभर रुपयांनी वाढला आहे. गोव्यामध्येसुद्धा मंगळवार दि. 20 मे पासून अवकाळी पाऊस जोरात सुरू झाला आहे. त्यामुळे गोव्यातून देखील भाजीपाल्याला थोड्या प्रमाणात मागणी येत आहे. यामुळेच भाजीमार्केटमध्येसुद्धा कमी असूनसुद्धा गोव्यात भाजीपाल्याला मागणी मंदावल्याने दर टिकूनच आहे, अशी माहिती भाजी व्यापाऱ्याने दिली.
रताळी दरात एक हजार रुपयांनी वाढ
सध्या गेल्या चार-पाच दिवसांपासून तालुक्यामध्येसुद्धा अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतीची संपूर्ण कामे ठप्प झाली आहेत. ते आताच रताळी काढणी देखील मंदावली आहे. त्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील रताळी आवक मार्केट यार्डमध्ये सुमारे 150 पोतीच एव्हढीच झाली होती. त्यामुळे रताळी दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. त्यातच सध्या अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे रताळी भाजून व उकडून खाण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे रताळ्याला मागणी वाढली आहे. त्यामुळेच रताळ्याचा भाव एक हजार रुपयांनी वाढला असल्याची माहिती अडत व्यापारी हेमंत पाटील यांनी दिली.