For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कांदा दरात दोनशे रुपयांची घसरण : बटाटा दर स्थिर

06:20 AM Oct 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
कांदा दरात दोनशे रुपयांची घसरण   बटाटा दर स्थिर
Advertisement

रताळी दर 900 पासून 1500 रुपये : मोजक्या भाजीपाला दरात वाढ : इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर : गूळ भाव टिकून

Advertisement

सुधीर गडकरी/ अगसगे

बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात कांदा दरात क्विंटलला  दोनशे रुपयांनी घसरण झाली आहे. इंदोर बटाटा, आग्रा बटाटा, तळेगाव बटाटा यांचा दर क्विंटलला स्थिर आहे. रताळी दर क्विंटलला 900 पासून 1500 रुपये झाला आहे. भाजीमार्केटमध्ये काही मोजक्या भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. तर इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत. गुळाचा भाव टिकून आहे.

Advertisement

शनिवार दि. 11 रोजी एपीएमसीमध्ये महाराष्ट्र जुन्या कांद्याच्या 70 ट्रक व कर्नाटकातील जुन्या कांद्याच्या दहा ट्रका व कर्नाटकातील नवीन कांद्याच्या सुमारे 70 ट्रका कांदा विक्रीसाठी आला होता. तालुक्यातील रताळ्याची आवक सुमारे 10,000 पिशव्या झाली होती. आणि जवारी बटाट्याची सुमारे 6000 पिशव्या आवक विक्रीसाठी होती.

महाराष्ट्र कांद्याचा दर क्विंटलला 800 पासून 1900 पर्यंत झाला. कर्नाटक जुना कांदा दर 800 पासून 1500 पर्यंत झाला. कर्नाटक नवीन कांदा दर 200 पासून 1200 पर्यंत झाला. पांढरा कांद्याचा दर 2500 पासून 2700 रुपयांपर्यंत झाला. इंदोर बटाटा दर 1800 पासून 2200 पर्यंत झाला. आग्रा बटाटा भाव 1200 पासून 1600 रुपयापर्यंत झाला. तळेगाव बटाटा दर 1200 पासून 1600 पर्यंत झाला आणि कांदा आवकेत वाढ झाल्याने कांद्याचा क्विंटलला दर दोनशे रुपयांनी कमी झाला, अशी माहिती व्यापारी महेश कुगजी यांनी दिली.

सध्या उघडीप पडल्याने तालुक्यामध्ये रताळी आणि जवारी बटाटे काढण्याकडे शेतकऱ्यांची वर्दळ वाढली आहे. सध्या मजुरांचा तुटवडा आहे. त्वरित बटाटे काढून ज्वारी पेरणीसाठी तयारी करून घेत आहेत. या कामामध्ये बळीराजा गुंतला आहे. त्यामुळे मार्केट यार्डमध्ये शनिवारच्या बाजारात रताळ्याची सुमारे दहा हजार पिशव्यांची आवक झाली होती आणि जवारी बटाट्याची सुमारे 6000 पोती रताळी आवक विक्रीसाठी झाली होती. जवारी बटाटा भाव आणि रताळी दर सध्या टिकून आहेत. शनिवार दि. 11 रोजीच्या बाजारात रताळ्यांचा भाव क्विंटलला 900 पासून 1500 रु. झाला आहे. तर जवारी बटाटा दर 300 पासून 2000 रुपयेपर्यंत झाला आहे. रताळी खरेदीसाठी परराज्यातील काही ठराविक खरेदीदार मार्केट यार्डमध्ये दाखल झाले आहेत. सध्या ही रताळी उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली, हरियाणा, पंजाब, हैदराबाद, महाराष्ट्र आदी ठिकाणी बेळगावहून निर्यात होत आहेत. त्या ठिकाणी त्या रताळ्यांचा खाण्यासाठी मोठ्याप्रमाणात वापर होतो, अशी माहिती अडत व्यापारी हेमंत पाटील यांनी दिली.

इंदोर बटाटा दर टिकून

इंदोरमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये नवीन बटाटा काढणीला सुरुवात होते व डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दरवर्षाप्रमाणे बटाटा बेळगाव मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी दाखल होतो. सध्या शीतगृहांमध्ये ठेवलेला इंदोर बटाटा मागणीनुसार बेळगाव मार्केट यार्डमध्ये येत आहे. तालुक्यातील जवारी व इंदोर, आग्रा, तळेगाव बटाटा विक्रीसाठी एपीएमसीमध्ये येत आहे. गेल्या महिन्यापासून इंदोर, आग्रा, तळेगाव बटाटा दर टिकून आहे, अशी माहिती व्यापाऱ्याने दिली.

 काही मोजक्या भाजीपाल्यांचे दर वाढले

एपीएमसी भाजीमार्केटमध्ये भाजीपाला आवक समतोल प्रमाणात येत आहे. आठ दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील भाजीपाला शेतीमध्ये पाणी साचून काही प्रमाणात भाज्या खराब झाल्या आहेत. त्यामुळे काही मोजक्या भाजीपाल्यांच्या आवकेत घट झाली आहे. त्यामुळे काही भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. बीन्स, मटार, गोल भोपळा, मेथी, शेपू, अल्ले आदी भाजीपाल्यांच्या दरात किंचित प्रमाणात वाढ झाली असून इतर भाजीपाल्यांचे दर टिकून आहेत, अशी माहिती भाजी व्यापाऱ्याने दिली.

डिसेंबरमध्ये महाराष्ट्र नवीन कांद्याची आवक

डिसेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रातील नवीन कांदा काढणीला सुरुवात होणार आहे. हा कांदा मागणीनुसार देशभरातील विविध राज्यांमध्ये आयात होणार आहे. त्यामुळे यापूर्वी साठवून ठेवलेला जुना महाराष्ट्र कांदा शेतकरी व तेजी-मंदी व्यापाऱ्यांचा कांदा विक्रीसाठी येत आहे. कारण डिसेंबरमध्ये महाराष्ट्रातील नवीन कांद्याची आवक सुरू होणार आहे. यावेळी जुन्या कांद्याला मागणी मंदावते. त्यातच कर्नाटकातील नवीन कांदा आवकसुद्धा गेल्या महिन्यापासून बेळगाव मार्केट यार्डमध्ये येत आहे. त्यामुळे काही खरेदीदार कर्नाटक नवीन कांद्याचा दर कमी असल्याने नवीन कांदा खरेदीकडे वळले आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र कांद्याला थोड्या प्रमाणात मागणी कमी झाल्याने आणि आवकेत वाढ झाल्याने शनिवारच्या बाजारात कांद्याचा दर प्रति क्विंटलला दोनशे रुपयांनी घसरण झाल्याची माहिती कांदा व्यापाऱ्याने दिली.

Advertisement

.