कांदा दरात 300 रुपयांनी वाढ, बटाटा 100 रुपयांची घसरण
नागपंचमी सणामुळे महाराष्ट्र-कर्नाटकातून कांदा आवक प्रमाणात दाखल
सुधीर गडकरी/ अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेत शनिवारच्या बाजारात कांदा भाव प्रतिक्विंटल 300 रुपयानी वधारला तर बटाटा भाव क्विंटलला 100 रुपयांनी कमी झाला आहे. गुरुवारी व शुक्रवारी नागपंचमी सण असल्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकातून कांदा आवक थोड्या प्रमाणात दाखल झाली होती. त्यामुळे कांदा दरात वाढ झाली आहे. इंदोर व आग्रा बटाट्याची आवक काही प्रमाणात वाढ झाल्याने दर क्विंटलला 100 रुपयांनी कमी झाले आहे. भाजीमार्केटमध्ये पावसामुळे काही प्रमाणात भाजीपाला खराब झाल्याने आवकेत घट निर्माण झाली आहे. कोबी, मेथी व शेपू, गोल भोपळा, शेवग्याच्या शेंगा, वांगी यांच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली असून इतर भाजीपाला दर स्थिर आहे. रताळी मार्केटयार्डमध्ये एक पोतेही आले नाही. गेल्या दोन, तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र शेतामधील कच्चा भाजीपाला पाण्यामुळे खराब झाला आहे. विशेष म्हणजे टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कोबी पिकामध्ये पाणी जाऊन कोबीदेखील खराब झाले आहे. मात्र आता उघडीप पडल्याने शिल्लक राहिलेला भाजीपाला काढणी करून त्वरित विक्रीसाठी भाजीपाला मार्केट आणण्यात येत आहे. भाजीमार्केटमध्ये सध्या अथणी परिसरातील भाजीपाला बेळगाव भाजीमार्केटमध्ये येत आहे. यापुढे देखील पावसाने उघडीप दिल्यास उत्पादनात योग्य हंगाम मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. मागील शनिवारी झालेल्या बाजारात कांदा भाव क्विंटलला 1800 ते 3200 पर्यंत झाला होता. कांदा 1800 ते 3600 पासून, कर्नाटक कांदा 1500 ते 3100 पर्यंत, इंदोर बटाटा 2800 पासून 3200, आग्रा बटाटा 2500 पासून 2900 पर्यंत झाला होता. बुधवार दि. 7 रोजी देखील मार्केट यार्डमध्ये वरीलच भाव झाले. तर शनिवार 10 रोजी मात्र कांदा दरात 300 रुपयांनी वाढ झाली आणि बटाटा दरात 100 रुपयांनी घसरण झाली, अशी माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिली. मार्केटयार्डमध्ये आठवड्यातून दोनवेळा म्हणजे शनिवार आणि बुधवारी कांदा-बटाटा सवाल होतो. यादिवशी गोवा, बेळगाव जिल्हा आणि कारवार, निपाणी, कोकणपट्टा आदी ठिकाणचे खरेदीदार मार्केटयार्डमध्ये उपस्थित असतात. भाजीमार्केटमध्ये रोज सकाळी 5 पासून दुपारपर्यंत भाजीमार्केट असते. तर सोमवारी सुटी असते.
नागपंचमी सणामुळे कांदा आवकेत घट
कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये नागपंचमी सण मोठ्या भक्तीने साजरा केला जातो. या याचप्रमाणे या दिवशी शेतकरी वर्ग हा सण मोठ्याने साजरा केला जातो. त्यामुळे थोड्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाला होता. काही दुकानांमध्ये तर कांद्याची आवक नव्हती. मोठ-मोठ्या दुकानांमध्ये विक्रीसाठी पाठवलेल्या व्यापाऱ्यांची कांदा आवक होती. नेहमीप्रमाणे कांद्याला मागणी होती आणि खरेदीदार देखील नेहमीप्रमाणे उपस्थित होते. आवक कमी आणि मागणी रोजच्याप्रमाणे असल्यामुळे कांदा दरात प्रति क्विंटल 300 रुपयांनी वाढ झाली आहे, अशी माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली.
बटाटा भाव शंभर रुपयांनी कमी
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून इंदोर आणि आग्रा बटाटा भाव टिकून होता. शितगृहामध्ये साठवून ठेवलेला इंदोर आणि आग्रा बटाटा विक्रीसाठी येत आहे. इंदोरमध्ये बटाटा लागवड केली असून डिसेंबर महिन्यामध्ये काढणीला प्रारंभ होतो. सध्या कर्नाटकासह आग्रा बटाटा विक्रीसाठी जात आहे. शनिवारी मार्केटयार्डमध्ये इंदोर बटाटा ट्रका दररोज मागणीनुसार विक्रीसाठी येत आहेत. यामधील काही बटाटा दुकानामध्ये शिल्लक होता आणि शनिवारी पहाटे देखील इंदोर बटाट्याच्या ट्रका आल्यामुळ बटाटा आवकेत वाढ होऊन इंदोर बटाटा भाव क्विंटलला शंभर रुपयांनी कमी झाला, अशी माहिती बटाटा व्यापाऱ्यांनी दिली.
रताळी आवक ठप्प
गेल्या महिन्याभरापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रताळी जमिनीमध्येच अडकून आहेत. शेती चिखलमय झाली आहे. यामुळे यामध्ये नांगरता येत नाही. यामुळे रताळी उत्पादन घेता येत नाही. यामुळे रताळी उत्पादन शेतामध्ये अडकून आहे. तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये रताळी उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. दुसऱ्या टप्प्यातील रताळी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात केली आहे. याचे उत्पादन गणेश चतुर्थीनंतर बाजारात येण्याची शक्यता आहे. पूर्वी लागवड केलेली रताळी काढणी पावसामुळे ठप्प झाली आहे. सध्या तीन-चार दिवसापासून उघडीप दिली आहे. बुधवारी रताळी आवक येण्याची शक्यता आहे, अशी माहिती रताळी व्यापाऱ्यांनी दिली.