For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एपीएमसी बाजारात कांदा भाव एक हजार रुपयांनी घसरला

06:01 AM Dec 10, 2023 IST | Tarun Bharat Portal
एपीएमसी बाजारात कांदा भाव एक हजार रुपयांनी घसरला
Advertisement

 सर्वसामान्यांना दिलासा तर शेतकरी वर्गातून नाराजी : इंदोरचा नवीन बटाटा विक्रीसाठी दाखल

Advertisement

सुधीर गडकरी/ अगसगे

केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारात कांदा निर्यातीवर पूर्ण प्रमाणात निर्बंध घातल्याचा परिणाम शनिवारी एपीएमसीच्या बाजारात कांदा भाव प्रति क्विंटलला एक हजार रुपयांनी घसरला. तर इंदोरचा नवीन बटाटा विक्रीसाठी दाखल झाला. तसेच तळेगाव (पुणे) नवीन बटाटा देखील विक्रीसाठी येत आहे. जुना इंदोर बटाटा जवळपास संपला आहे. कांदा दरात घसरण झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असला तरी शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. रताळी भाव क्विंटलला स्थिर आहे.

Advertisement

मागील शनिवार व बुधवारी कांदा भाव क्विंटलला 3000 ते 5000 रुपये झाला होता. केंद्र सरकारने इतर देशामध्ये निर्यात होणारा कांदा मार्च 2024 पर्यंत पूर्णपणे बंदी घातल्याने आज शनिवारच्या बाजारात मार्केट यार्डमध्ये कांदा भाव 2000 पासून ते 3700 पर्यंत झाला. यामुळे कांदा दर घसरल्याने यापुढे कांदा दर नियंत्रणात येणार आहे. इंदोर नवीन बटाटा भाव 1400 ते 1500 तर जुना इंदोर बटाटा भाव 1800 ते 2100 रु., रताळी दर 300 ते 1600 रु झाला. तर महाराष्ट्र जुना कांदा भाव 2800 ते 4000 रुपये झाला. कर्नाटक कांद्याचा भाव एक हजार रुपयांनी घसरला. तर महाराष्ट्र जुना कांद्याचा भाव 500 रुपयांनी घसरला, अशी माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिली.

कांदा दरात घसरण

गेल्या तीन महिन्यांपासून कांदा भाव अर्धशतकावर ठाण मांडून बसले होते. यंदा पाऊस नसल्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली. तसेच बहुतांश कर्नाटक शेतकऱ्यांनी कांद्याऐवजी ऊस लागवड केली आहे. याचा परिणाम कांदा भाव 3000 ते 5000 रुपये झाला होता. यंदा कांद्याने सर्वसामान्यांना खरेदी करताना रडवले होते. तर कांद्याचे पदार्थ बनवणे बंद झाले होते. केंद्र सरकारने सध्या महागाई आटोक्यात आणण्यासाठी भारतामधून इतर देशांमध्ये निर्यात होणारा कांदा निर्यातीवर मार्च 2024 पर्यंत पूर्णपणे बंदी घातल्याने याचा परिणाम होऊन मार्केट यार्डमध्ये कांद्याच्या सवालामध्ये कांदा दर प्रति क्विंटलला एक हजार रुपयांनी घसरला, अशी माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिली.

बुधवारच्या बाजाराकडे लक्ष

आंतरराष्ट्रीय निर्यात बंदी होताच कांदा भावात एक हजार रुपयांनी घसरण झाली. सध्या महाराष्ट्रातील नवीन कांद्याचे उत्पादन देखील काढण्यात येत आहे. तो कांदा बेळगाव बाजारात विक्रीसाठी आल्यास कांदा दरात पुन्हा कपात होण्याची शक्यता आहे. खरेदीदारांनी आपल्या गरजेपुरता कांदा शनिवारी खरेदी केला आहे. बुधवारच्या बाजारात कांदा भाव काय होणार कोणालाच माहिती नाही. यामुळे व्यापारी, खरेदीदारांचे लक्ष बुधवारी कांदा भाव काय होणार हे आवक व खरेदीदारांवर अवलंबून राहणार आहे, अशी माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली.

शेतकऱ्यांतून नाराजी

गेली दोन वर्षे कांद्याला योग्य भाव मिळाला नव्हता. यामुळे शेतकरी वर्ग कांदा उत्पादनाकडे पाठ फिरविला होता. यंदा पाऊस नसल्यामुळे उत्पादनात घट निर्माण झाली आहे. कांदा उत्पादनासाठी शेतकरी दरवर्षी लाखो रुपये कर्ज काढतो. यंदा कांदा भाव 3000 ते 5000 रुपये क्विंटल भाव मिळत होता. यामुळे मिळालेल्या अल्प उत्पादनाला योग्य भाव मिळत होता. यामुळे शेतकरी आनंदी होता. मात्र आता केंद्र सरकार सर्वसामान्यांच्या हिताच्या दृष्टीने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने कांदा भावात घसरण झाल्यामुळे शेतकरी मात्र नाराज झाला आहे.

इंदोर नवीन बटाटा बाजारात

यंदाच्या हंगामातील इंदोरचा बटाटा शनिवारी प्रथमच एक ट्रक एस. बी. पाटील यांच्या दुकानामध्ये विक्रीसाठी दाखल झाला. नवीन इंदोर बटाटा पाहण्यासाठी खरेदीदारांची गर्दी झाली. सध्या कचवड आहे. यामुळे या बटाट्याची मोजक्या खरेदीदारांनी खरेदी केली. जुना इंदोर बटाट्याला मागणी जास्त आहे. येत्या 15-20 दिवसांत नवीन इंदोर बटाटा पाकड येणार आहे. जुना इंदोर बटाटा जवळपास संपला आहे. यापुढे खरेदीदारांना नवीन इंदोर बटाटा खरेदी करावा लागणार आहे.

तळेगाव (पुणे) बटाटा आवक दाखल

गेल्या आठ दिवसापासून महाराष्ट्रातील तळेगाव (पुणे) येथील नवीन बटाटा देखील विक्रीसाठी येत आहे. हा बटाटा देखील कचवड आहे. बटाट्यावरच्या साली गेल्यामुळे दोन-तीन दिवसात बटाटा नरम होऊन काळपट होतो. म्हणून खरेदीदार गरजेनुसार तळेगाव बटाटा खरेदी करीत आहेत, अशी माहिती अडत व्यापाऱ्यांनी दिली.

बियाण्याचा जवारी बटाटा भाव वाढला

सध्या तालुक्यामध्ये रब्बी हंगामातील जवारी उन्हाळी बटाटा लागवड सुरू झाली आहे. यासाठी जवारी मिडियम व मोठवड आकाराचा बटाटा शेतकरी बियाणे म्हणून खरेदी करीत आहेत. सध्या जवारी बटाटा आवक आटोक्यात येत असल्यामुळे बियाण्यांचा बटाटा खरेदीसाठी मार्केट यार्डमध्ये शेतकरी गर्दी करू  लागले आहेत. यामुळे बियाण्याचा भाव वाढला आहे. प्रति क्विंटल बियाण्यांचा भाव 1200 ते 2000 रुपये भावाने खरेदी करीत आहेत.

भाजीमार्केटमध्ये भाजीपाल्याचे भाव स्थिर आहेत, अशी माहिती भाजी व्यापाऱ्यांनी दिली. तर रताळ्याचा भाव देखील स्थिर आहे. रताळ्याचा भाव क्विंटलला 300 ते 1600 रुपये आहे, अशी माहिती रताळी व्यापाऱ्यांनी दिली

Advertisement
Tags :

.