कांदा-बटाटा दर स्थिर : रताळी आवक सुरू
पावसामुळे शेतवडीत पाणी तुंबल्याने भाजीपाल्यांच्या दरात वाढ : गूळ दरात चढउतार
सुधीर गडकरी/ अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात महाराष्ट्र कांदा भाव प्रति क्विंटल 3000 ते 3900 रुपये झाला. तर कर्नाटक कांदा भाव 2800 ते 3800 रुपये झाला. मागील बुधवार दि. 14 रोजी आणि आजच्या बाजारात कांदा भाव टिकून आहे. यामुळे कांदा दर स्थिर आहे. इंदोर बटाटा भाव क्विंटलला 2700 पासून 3100 रुपये झाला. रताळी आवक विक्रीसाठी येत असून याचा भाव क्विंटलला 3000 पासून 3500 रुपयांपर्यंत सर्सास भाव झाला. गुळाचा भाव 5000 पासून 5500 रुपये क्विंटल आहे. यामुळे वरील सर्व पदार्थांचे दर स्थिर आहेत.
पावसामुळे भाजीपाल्याच्या शेतवाडीमध्ये पाणी तुंबून राहिल्याने 50 टक्के भाजीपाला खराब झाला आहे. यामुळे पालेभाज्यांच्या दरात थोड्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर इतर भाजीपाला दर स्थिर आहेत.
महाराष्ट्र आणि कर्नाटकातून सध्या जुना कांदाच विक्रीसाठी येत आहे. याच्या आवकेत दिवसेंदिवस घट निर्माण होत आहे. महाराष्ट्र नवीन कांद्याचे उत्पादन येण्यास अद्याप 4 महिन्यांचा कालावधी आहे. तर कर्नाटक कांद्याचे नवीन उत्पादनाला 1 महिन्यानंतर सुरुवात होणार आहे. यामुळे सध्या जुन्या कांद्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. आवकेत घट निर्माण झाल्याने दरात वाढ झाली आहे.
बुधवारी कांदा भाव 500 रु. वाढ
कर्नाटक व महाराष्ट्रामध्ये जुन्या कांद्याच्या आवकेत घट झाली आहे. यामुळे राज्यासह देशामध्ये कांदा दरात बुधवार दि. 14 रोजी वाढ झाली. याचाच परिणाम बेळगाव मार्केट यार्डमध्ये झाला आणि कांदा भाव क्विंटलला 500 रुपयांनी वधारला. गेल्या 2-3 महिन्यांपासून कांदा भाव क्विंटलला 2000-3200 रुपये होता. मात्र आवकेत घट निर्माण झाल्याने बुधवारी कांदा भाव सर्सास 3000-3800 रु. झाला तर काही दुकानांमध्ये चुकून 4000 रु. देखील क्विंटलला भाव केले.
बुधवारचा भावच शनिवारच्या बाजारात
बुधवारी कांदा दरात वाढ झाल्यामुळे व्यापाऱ्यातून खळबळ माजली. यापुढे पुन्हा भाव वाढणार की कमी होणार असा अंदाज खरेदीदार बांधत होते. आपल्याला हवा तितकाच कांदा खरेदीदारांनी खरेदी केला होता आणि शनिवारच्या बाजाराकडे व्यापाऱ्यांसह खरेदीदारांचे लक्ष लागून होते. शनिवारी सवालामध्ये कांदा भाव बुधवारचाच टिकून राहिला. यामुळे येत्या काळात कांदा दरात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांतून व्यक्त झाला.
बटाटा भाव स्थिर
इंदोर बटाटा नवीन उत्पादन डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येतो. सध्या तेजी-मंदी करणारे खरेदीदार यापूर्वीच शितगृहामध्ये साठवून ठेवलेला बटाटा बेळगावसह इतर ठिकाणी विक्रीसाठी पाठवत आहेत. आग्रा बटाटा देखील शितगृहामधीलच येत आहे. इंदोर बटाट्याला गोवा, कारवार, कोकणपट्टासह बेळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. आग्रा बटाट्याला किरकोळ विक्रीसाठी आणि ठराविक हॉटेलमध्ये मागणी असते. इंदोर बटाटा खाण्यासाठी चांगला असतो व भाजी चांगली होते. यामुळे हॉटेल, मेस, खानावळ आणि वेफर्स बनवण्यासाठी याचा मोठा वापर केला जातो. तर आग्रा बटाटा जरा गोड असतो. यामुळे यालाही गोवा व इतर ठिकाणी मागणी असते, अशी माहिती बटाटा व्यापाऱ्यांनी दिली.
बुधवारी रताळी आवक दाखल
मुसळधार पावसामुळे रताळी उत्पादन जमिनीमध्ये अडकून राहिले होते. यामुळे गेल्या दीड महिन्यापासून मार्केटयार्डला एकही रताळी पोती आवक विक्रीसाठी आली नव्हती. आठवडाभरापासून आता उघडीप पडल्याने पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी रताळी काढून विक्रीसाठी बुधवारी मार्केट यार्डला आणली होती. बुधवार, गुरुवार व शुक्रवारी रताळ्याचा भाव क्विंटलला 4000-4500 रुपये होता. मात्र शनिवारी दरात घसरण झाली. सध्या रताळ्याचा भाव 2000-2500 रुपये झाला आणि मलकापुरी रताळी भाव 3000-3800 रुपयांपर्यंत करण्यात आला. या रताळ्यांना खाण्यासाठी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. तसेच तेथील खरेदीदार देखील थोड्या प्रमाणात रताळी खरेदी करतात, अशी माहिती रताळी व्यापाऱ्यांनी दिली.
पालेभाज्यांच्या दरात वाढ
भाजीमार्केटमध्ये हिरव्या पालेभाज्यांच्या आवकेत घट निर्माण झाली आहे. कारण यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतवाडीमध्ये पाणी तुंबून राहिले आणि भाजीपाला उत्पादन कुजले आहे. सध्या कोथिंबीर आणि मुळा याच्या आवकेत मोठ्या प्रमाणात घट निर्माण झाली आहे. शेपु, मेथी, लाल भाजी, पालक, पुदीना यांच्या शेकडा दरात वाढ झाली आहे. तर मटर बेळगाव परिसरातून आवक येत आहे. तसेच बिन्सचे उत्पादन बेळगाव तालुक्यामध्ये चांगल्याप्रकारे आले आहे. तसेच सध्या श्रावण महिना असल्यामुळे गोव्यासह, कारवार, कोकणपट्ट्यातून भाजीपाल्याला मागणी वाढली आहे. यामुळे देखील दरात वाढ झाली आहे, अशी माहिती भाजी व्यापाऱ्यांनी दिली.