कांदा-बटाटा दर स्थिर , टोमॅटो 200 रुपयांनी महागला
जवारी बटाटा, गूळ, लसूण दर टिकून, रताळी शंभर रुपयांनी कमी तर पांढरा कांदा दोनशे रुपयांनी घसरला
सुधीर गडकरी/ अगसगे
बेळगाव कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये शनिवारच्या बाजारात महाराष्ट्र कांदा, कर्नाटक नवीन कांदा, कर्नाटक जुना कांदा, इंदोर बटाटा, आग्रा बटाटा, तळेगाव बटाटा यांचा दर प्रतिक्विंटल स्थिर झाला. तसेच बेळगाव जवारी बटाटा, गूळ, लसूण यांचा दरदेखील टिकून राहिला. रताळी दरात मात्र क्विंटलला शंभर रुपयांनी भाव कमी झाला. पांढरा कांदा दरात क्विंटलला दोनशे रुपयांनी घसरण झाली. भाजीमार्केटमध्ये कोथिंबीरसह काही भाजीपाल्यांच्या दरात किंचित घसरण झाली आहे. तर गोल भोपळा, शेवगा शेंगा, कोबी, जवारी मटर यांच्या दरातही वाढ झाली आहे. आणि टोमॅटो प्रती ट्रे चा भाव दोनशे रुपयांनी वाढला आहे.
शनिवार दि. 22 रोजी एपीएमसीमधील कांदा मार्केटमध्ये महाराष्ट्र जुन्या कांद्याच्या एकूण 70 ट्रका कांदा आवक होती आणि कर्नाटक जुन्या कांद्याच्या 3 ट्रका व कर्नाटक नवीन कांद्याच्या 20 ट्रका, पांढरा कांद्याच्या 2 ट्रका आल्या होत्या. तर परराज्यातील इंदोर बटाट्याच्या 6 ट्रका आणि आग्रा बटाट्याच्या 8 ट्रका, तळेगाव बटाट्याची 1 ट्रक विक्रीसाठी दाखल झाल्या होत्या. महाराष्ट्र जुन्या कांद्याचा दर क्विंटलला 1500 पासून 2400 पर्यंत, कर्नाटक जुना कांदा दर 1200 पासून 2000 पर्यंत, कर्नाटक नवीन कांदा दर 200 पासून 1000 रुपये, पांढरा कांदा दर 2000 पासून 3000 रु. झाला आहे. इंदोर बटाटा भाव 1800 पासून 2300, आग्रा बटाटा भाव 1000 पासून 1800 रुपये, तळेगाव बटाटा भाव 2500 ते 2600 रुपये झाला आहे, अशी वरील संपूर्ण माहिती व्यापारी महेश कुगजी यांनी दिली.
मार्केट यार्डमधील बटाटा, रताळी मार्केटमध्ये रताळ्याची सुमारे 30 हजार आवक होती. आवक विक्रीसाठी दाखल झाले होते आणि जवारी पांढऱ्या बटाट्याची सुमारे चार हजार पोती आवक आली होती. सध्या रबी हंगाम असल्याने रताळी काढणीला वेग आला आहे. कारण रताळी काढलेल्या जमिनीमध्ये कडधान्य पेरणीला पोषक वातावरण आहे. त्यामुळे बळीराजा रताळे काढणी, कडधान्य पेरणी, भात कापणी, मळणी अशा सुगीच्या कामात गुंतला आहे. सध्याही रताळी पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली आदी ठिकाणी निर्यात होत आहेत. या ठिकाणी खाण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. रताळी दर क्विंटलला 1300 पासून 1600 पर्यंत झाला तर जवारी पांढऱ्या बटाट्याचा भाव 250 पासून 2000 रुपये झाला, अशी माहिती अडत व्यापारी हेमंत पाटील यांनी दिली.
टोमॅटो दरात वाढ
एपीएमसी भाजीमार्केटमध्ये भाजीपाल्यांच्या आवकेत किंचित प्रमाणात घट होत आहे. त्यामुळे काही पालेभाज्यांच्या दरात थोड्या प्रमाणात का होईना घसरण झाली आहे. तर टोमॅटो, शेवगा शेंगा, कोबी, गोल भोपळा यांच्या दरात वाढ झाली आहे व कोथिंबीर शेकडा भाव दोनशे रुपये आणि कमी झाला आहे. सध्या रब्बी हंगाम असल्याने सकाळच्या थंडीमुळे, धुक्यामुळे भाजीपाला उत्पादनावर घट झाली आहे. एपीएमसी भाजीमार्केटमधून टोमॅटो इतर ठिकाणी निर्यात होत आहे. त्यामुळे टोमॅटो दरात वाढ झाली आहे, अशी माहिती भाजी व्यापाऱ्याने दिली.